Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, May 31, 2014

0 वळून पाहताना भाग ५


आधीची दोन्ही युद्धे काश्मीरला मध्यवर्ती ठेऊन दोन्ही देशात लढली गेली तरी १९७१ चे भारत-पाक युद्ध बऱ्याच अंशी आधीच्या युद्धापेक्षा वेगळे होते. ते काश्मीर प्रश्नाशी निगडीत नव्हते. तसेच अमेरिकेचा ह्यात आधीपासून सहभाग होता व प्रेसिडेंट निक्सन आणि त्यांचे विदेश मंत्री किसिंजर यांचा याह्याखानच्या पूर्व पाकिस्तानातील कारवाईस पूर्ण पाठींबा होता. पंजाबी मुसलमानांची बंगाली मुसलमानांबद्दल असलेली गौणत्वाची भावना, बंगाली संस्कृती हि हिंदू संस्कृती समान असल्याचा पूर्व पाकिस्तानी भाव, इ मुळे पश्चिम पाकिस्तान त्यांना जसे ठेवेल तसे त्यांनी रहावयाचे हा अलिखित नियमच होता. याह्याखानानी एका वार्तालापात सैनिकी अधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले होते, ”Kill three millions of them (Bangladeshi) and the rest will eat out of our hands.” त्यामुळे त्या वर्षीच्या निवडणुकात अवामी लीगला मिळालेले बहुमत व शेख मुजीब उर रहमान देशाचे भावी प्रमुख होणार हि कल्पनाही पंजाबी मुसलमानांना – प्रामुख्याने भूत्तोना - म्हणजेच पश्चिम पाकिस्तानला असह्य वाटत होती. भारताच्या बाजूच्या विचाराचे सरकार आले तर पाकिस्तानचे काय हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला होता. ह्या काल्पनिक भीतीने ‘ऑपरेशन सर्चलाईट’ ला जन्म दिला.

       सुरवातीला पूर्व पाकिस्तानमध्ये एकाच वेळी सर्व प्रमुख शहरे ताब्यात घ्यायची आणि तेथील साऱ्या पृथकतावादी, राष्ट्रीयतावादी, अवामी लीगवादी म्हणजेच सर्व विरोधी मग ते राजकीय असोत कि सैनिकी – एका महिन्यात पूर्णपणे संपवायचे. पाकिस्तानी आर्मीने भारत प्रेमी व मुजीब-प्रेमीची कत्तल करून सारा पूर्व पाकिस्तानचा प्रांत पाकिस्तानधार्जिणा करण्याचा मोठा अघोरी घाट घातला होता. २५ मार्च, १९७१ ला कारवाई सुरु झाली. मृत्यूचा, अत्याचाराचा व हिंसेचा अनिर्बंध हैदोस घातला गेला जो चेकोस्लोवाक किवा रवान्दाच्या नरसंहारालाही लाजवेल असा होता. जहान आराच्या शब्दात सांगायचे झाले तर, “Even if a lower range of 1.5 million deaths was taken, killings took place at a rate of between 6,000-12,000 per day, through the 267 days of carnage.”  ह्या नरसंहारात ९९१ शिक्षक, १३ पत्रकार, ४९ फिजिशिअन्स, ४२ वकील, व १६ लेखकांना कंठस्नान घालण्यात आले. ह्या सर्व बुद्धीजीवी हुतात्म्याच्या स्मरणार्थ १४ डिसेंबर, हा ‘शहीद बुद्धीजीबी दिवस’ म्हणून बांगलादेशी पाळला जातो. बांगलादेशी आकडेवारीनुसार २००,००० बलात्काराच्या तर असंख्य war-babies च्या केसेस नोंदविल्या गेल्या. ५६३ स्त्रिया पाकिस्तानी ब्रौथेल मध्ये डांबल्या गेल्या. जवळ-जवळ ६०% हिंदूनां भारतात प्राण वाचविण्यासाठी निर्वासित म्हणून जगावे लागले ज्याची नोंद ‘एव्हड्या कमी काळात निर्वासितांची झालेली सर्वात मोठी एकमार्गी वाहतूक’ म्हणून इतिहासात झाली आहे. गैर-मुस्लीम नरसंहारात भारतीय सीमेलगतच्या खुलना जिल्ह्यातील चूकनगरचा (८,०००-१०,०००) सर्वात मोठा नरसंहार मानला जातो. हि सारी अधर्मी कृत्ये धर्माच्या नावावर! आपल्या स्वत:च्या बंधू-भगिनीवर अत्याचार करताना, माणूस माणसाला मारताना, त्यांचा जीव घेताना एव्हडा आंधळा कसा होऊ शकतो?  धर्मांधता, दुसरे काय! भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा असहनीय भार होता व तो जास्त काल शिरावर घेणे शक्य नव्हते. याची कल्पना पाकिस्तानसह सर्व प्रमुख देशाना वेळोवेळी देण्यात आली होती. सारे राजनयिक प्रयत्न विफल ठरत होते. अलेक्झांडर बर्कमान यांचे शब्द, “War means blind obedience, unthinking stupidity, brutish callousness, wanton destruction and irresponsible murder” यथार्थ ठरत होते. भारत-पाक युद्धाचे ढग आता क्षितिजावर स्वच्छपणे दिसू लागले होते. 

       स्व. इंदिराजी धोरणी होत्या. ह्या सगळ्याची परिणीती युध्दात होणार व अमेरिकेचे सहाय्य पाकला असणार हे ध्यानात घेऊन, त्यांनी ऑगस्ट ९ ला रशियाशी २० वर्षाचा परस्पर सामंजस्याचा करार केला जो ह्या व नंतरच्या युद्धात निर्णायक ठरला. ह्या युद्धात सेनाधिकाऱ्याशी चर्चा व त्यांच्या अनुभवी सल्ले आपल्या तत्कालीन पंतप्रधानांनी मानले हे विशेष. १९६२ च्या भारत-चीन युद्धात व ह्या युद्धातील महत्वाचा हाच तो फरक! 

 प्रकाश पटवर्धन

No comments: