Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, May 30, 2014

1 शायरीचा गुलदस्ता भाग ३



कुठून तरी शांत वातावरणात कानावर गुलाम अलीचे स्वरात शब्द पडतात "'हंगामा है क्यो बरपा, थोडीसी जो पी ली है" अन अकबर इलाहाबादीची प्रकर्षाने आठवण होते. वरील गझल ऐकली कि शायराबद्दल वेगळीच समजूत होते. एखादा मोगल-कालीन पियक्कड शायर आसावा, दुसरे काय! मित्रानो, अकबर इलाहाबादी  हे स्वातंत्रपूर्व काळातील 
फनकार, कधीही मदिरेलाशिवलेला, देशभक्त, आपल्या जगावेगळ्या पेश करण्याच्या पद्धती ने उर्दू साहित्यात मान्यता पावलेला असा अलौकिक शायर!

मित्रानो, दोन उपमा घेऊन इंग्रजांची चाल व त्याचा अभिप्रेत अर्थ आपल्या जनतेपर्यंत पोहोचविणारा, हा साहित्य-सूर्य, हिंदू-मुस्लीम ऐक्याचा प्रणेता होता.
 
हि गझल वा तिचा अर्थ कळण्यासाठी, तत्कालीन इतिहासाची  थोडी पूर्वपीठीका पहावी लागेल. स्वातंत्रपूर्व काळात एक वेळ अशी आली होती कि 'हिंदू-मुस्लिम' वैर शिगेला पोहोचले होते. इंग्रजांना जे हवे होते तेच होत होते म्हणून इंग्रज आगीत तेल ओतत होते. अशा परिस्थितीत अकबर इलाहाबादी हे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नामुळे काही जहाल मुस्लिम संघटना त्यांच्या विरुद्द  टीका करू लागल्या कि "या इलाहाबादीला हिंदुनी पाजली (bribed ) आहे आणि त्या नशेत हा अस काही अनर्गल  बडबडत आहे". या टीकेला उत्तर देताना त्यांनी समस्त टीकाकारांना प्रश्न केलेला होता ‘हंगामा है क्युं बरपा सा, थोडीसी जो पी ली है........’

या गजलेचा मतला असा आहे कि, 

हंगामा है क्यो बरपा थोडीसी जो पी ली है, 
डाका तो नही डाला, चोरी तो नही की है  | 
(बरपा : सर्वदूर , everywhere) 

येथे पिणे आणि मय (मदिरा) हे 'प्रेम' आणि 'दयाळूपणा' (human kindness , love ,) साठी प्रतीकात्मक म्हणून वापरलेले आहे. 

शायर म्हणतो, बाबारे, मी प्रेमरूपी मदिरेचे थोडे प्राशन केले तर इतका आरडओरडा? मी काही डाका टाकलेला नाही वा चोरी केलेली नाही. फक्त  हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रेमातून दोन समुदायात निर्माण झालेल्या मानवतेची, सौहार्दाची किंवा आत्मियतेची मदिरा लाजवाब आहे आणि अशा अलौकिक मदिरेची नशा येणे क्रमप्राप्तच आहे.

पुढच्या शेरात हि संकल्पना मोठ्या खुबीने शायर आपल्या पुढ्यात ठेवतो- . 

"
उस मयसे नही मतलब,  दिल जिससे से हो बेगाना, 
मकसूद है उस मयसे, दिल हि मी जो खिचती है | 

अकबरर्जी म्हणतात, तुम्हाला जी ‘मय’ – मदिरा अभिप्रेत आहे ती प्यायल्यावर चढते व तुम्हाला ‘बेगाना’ करते. मात्र माझ्या हिंदू-मुस्लीम मयखान्यातील ह्या मदिरेला तुमच्या त्या बेगान्या करणाऱ्या मादिरेशी काही देणे-घेणे नाही. हि दोन समाजातील सामंजस्याची, दोन्ही कडील लोकांच्या आनंदाची मदिरा चढते पण बेगाना करीत नाही तर सरळ हृदयस्त होते, दृदयात उतरते. ते पुढे म्हणतात -

नातजुर्बा-कारीसे वाइजकी ये बाते है, 
इस रंग को क्या जाने, पूछो तो कभी पी है| 
(नातजुर्बा-कारी  : inexperience) 

त्यांच्यावरील टीका हि त्या लोकांनी कधी दोन जमातीत एकतेसाठी मानवतेचे काम न केल्यामुळे होते आहे हे जाणून ते म्हणतात, माझ्या  मदिरेची चव चाखली असती तर, ते हिच्या रंगात रंगून गेले असते तर, अशी टीका, असे शब्दच त्यांनी उच्चारले नसते, त्यांना माझं म्हणणे पटले असते. समाजाभिमुख कार्याची नशाही काही औरच असते पण....

सूरज में लगे धब्बा , फितरत के करिश्मे है , 
बुत हमको कहे काफिर, अल्लाह कि मर्जी है | 
(फितरत : प्रकृति, स्वभाव, nature , temperament . 
काफिर :  अविश्वासी , infidel)  

तसे पाहायला गेले तर ज्याप्रमाणे त्या स्वयं प्रकाशी सूर्यावर डावा ग्रहण हा निसर्गाचा करिष्मा (चमत्कार, magic  ) आहे, त्याच प्रमाणे ह्या मंडळीनी आम्हाला काफिर म्हणावं हिसुद्धा ईश्वरी इच्छाच असावी. हिंदू काय मुसलमान काय, सारे देवाची मुलं! त्याचा अंश घेऊन जगत आहेत, मग त्यात डाव-उजवं कसे व कश्यासाठी. आम्ही सर्व एकाच परमात्म्याचे अंश आहोत मग त्याने दर्शविलेल्या मार्गावर गुण्या-गोविंदाने जाण्या ऐवजी एकमेकांना कमी लेखाने, दुस्वास करणे, प्रसंगी जीवावर उठण्याची दुष्मनी कां? जरा दोस्त होऊन पहा, एकमेकांवर प्रेम करून पहा, ह्या मदिरेची मी इतकी तारीफ का करतो.


हर जर्रा चमकता  है अनवारे-इलाही से, 
हर सांस ये कहेती है , हम है तो खुदा भी ही | 

या जगात अगदी सगळे त्या परमात्म्याच्या कृपेने जगत आहोत. त्या परमेश्वराच्या छायेत आपण जगत आहोत आणि आपला पत्येक श्वास-उश्वास साक्षी आहे कि आम्ही आहोत तसाच तो सर्व शक्तिमान हि आहे, आपल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कर्माचा तो साक्षीदार आहे.  

शेवटी नझीरअली आदिल चा शेर आठवतो, 

मैने दुनिया के रवैय्ये कि शिकायत  कि थी , 
तुमने कुछ और जो समज़ा तो गलत समज़ा है | 


आजही social network  वर समाजा-समाजात द्वेष भावना पसरवणारी चित्रे/मजकूर  टाकली जात असतात,  मात्र त्याऐवजी एकमेकातील प्रेमभाव कसा वृद्धिंगत होईल याचा विचार करीत नाही. अकबर इलाहाबादी काय वा कबीरदास काय ह्याच ‘ढाई आखर प्रेम का’ ची मदिरा आकंठ पीत आले. आम्ही कधी त्यांचे अनुकरण करणार आहोत.

 दत्तात्रय पटवर्धन 
 विजया यादव 




1 comment:

  1. अकबर इलाहाबादीची ही गझल व तिचा अर्थ आजही तेवढाच समर्पक आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे.

    ReplyDelete