Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, May 11, 2014

2 कबीराचे दोहे भाग 2

आपल्या समाजात प्रवाहाच्या विरुध्द जाणाऱ्या प्रत्येक सुधारकाला अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे. मग ते ज्ञानेश्वर , तुकाराम, कबीर,मीरा , फरीद, व सोक्रेटीस व ग्यलेलिओ. या मंडळीना रूढीवादी लोकांना आपले म्हणणे /तत्वज्ञान कसे खरे आहे, सत्य आहे हे समजावताना आपला बळी द्यावा लागला आहे.
कबीरदासजी म्हणतात : -   

" साधो देखो जग बौराना,
साची कहे तो मारन धावे झुटे जग पतीयाना".
हे जग किती विचित्र आहे न!! खरं सांगितले कि मारायला धावते आणि खोट्याला जवळ करते. सत्य, वास्तविकता दाखवणाऱ्या वर रोष ओढवते तर खोट्यावर विश्वास ठेवते.जणू खऱ्याला कोणी वालीच नाही. आजच्या युगात सर्वधर्म समभाव थोड्याफार फरकाने कबीरदासजींच्या वरील उक्तीचे समर्थनाच करतो न!!
एकदा एका गुरूने आपल्या दोन शिष्यांना पाय चेपण्यास सांगितले. एकाने डावा  पाय तर दुसऱ्याने उजवा पाय दाबायला सुरवात केली. दोघेही गुरुचे सच्चे भक्त असल्यामुळे गुरुचे पाय मोठ्या आनंदाने व तन्मयतेने चेपत होते. एव्हड्यात गुरूने कूस बदलली व त्यांचा डावा पाय उजव्या पायावर पडला. उजवा पाय दाब्णाऱ्या शिष्यास आता पाय नीट चेपण्यात डाव्या पायाचा अडसर येऊ लागला म्हणून त्याने दुसऱ्या शिष्यास गुरूचा  उजवा पाय हलविण्यास सांगितले.  गुरूच्या सेवेत अडथळा येऊ नये म्हणून उजवा पाय दाबणार्या शिष्याने नकार दिला. आता दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली व ती शेगेला पोहोचण्यास वेळ लागला नाही. दोघांनी काठ्या उचलल्या. प्रथम डावा पाय दाबणार्या  शिष्याने गुरूच्या उजव्या पायावर प्रहार  केला. उत्तरादाखल उजवा पाय दाबनार्याने त्याच्या डाव्या पायावर प्रहार केला. मोठा विचित्र प्रकार होता. गुरूची सेवा डोळे झाकून केल्याने रूढीवादी व्यक्ती सारखे आंधळे झाले होते. त्यांच्या डोळ्यावर सेवेचा भ्रामक पडदा होता.
कबीरदासजी पुढे  म्हणतात, 
"हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहेमाना,
                                                आपस मे दोउ लडे मरत है मरम न कोई जाना"
येथे कबीराला हिंदू आणि मुसलमान हे दोन प्रतिक आहेत. ते सर्वच धर्मांना उद्देशून म्हणतात. हिंदूंचा राम अन मुसलमानांचा रहेमान -- अगदी गुरूच्या डाव्या  व उजव्या पायाप्रमाणे! यावरून दोघे वाद घालतात, भांडतात. वेळ आली तर मारतात व मरतात . दोघेही मर्म जाणून घेत नाहीत. अरे मंदिर काय व मस्जिद काय, त्या परमात्म्याचाच घर न? धर्माच मर्म सांगत सांगत सारे संत महंत आले-गेले पण आम्ही एकमेकांच्या धर्माचे वाभाडे काढण्यात धन्यता मानतो. "ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय" ,  "खरा तो  एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" असा प्रेमाचा महिमा सारेच गाताना दिसतात पण त्याचा खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करीत नाहीत. प्रेमात समर्पण भावना असते. दुसऱ्यासाठी प्राण द्यावे लागतात, प्राण घ्यावे लागत नाहीत.
सद्य परिस्थिती पाहून तर एक उर्दू शायर मोठ्या कष्टाने म्हणतो,
"कितनी नफ़रते है तास्सुब (communal ) कि हमारे दिलो मे,
हमे थोडी समज देता तो अच्छा होता,
परिंदे तो आपस मे बैर नही करते,
खुदा तू इस दुनिया को चिडियाघर बना देता तो अच्छा होता."

नवयुगात माणूस खोल समुद्रात, उंचच उंच आकाशातच नाही तर चंद्रावर घर  करण्याच्या विचारात आहे. विज्ञानाने आम्हाला प्रगतीच्या वेगवेगळ्या स्तरावर नेले असले तरी माणसातील माणुसकी जिवंत ठेऊ शकलेला नाही. दृष्टांताच्या शब्दात सांगायचे तर ---  एक संत भर दिवसाहि हातात मशाल घेऊन फिरत असे. त्याला लोकांनी विचारले कि इतक्या भर दिवसा सूर्यप्रकाशात हातात मशाल घेऊन का फिरत आहात?  संताने उत्तर दिले, 'मी माणसाच्या शोधात आहे. मला कोठेही माणूस आढळत नाही"

घरो पे नाम थे, नामो के साथ ओहदे थे,
बहुत तलाश किया , फिरभी आदमी न मिला. 

 दत्तात्रय पटवर्धन 

2 comments:

  1. दत्ताजी चांगलं लिहिताय. तुमचा ब्लॉग मराठी विश्वला जोडा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपली प्रतिक्रिया नेहमीच आमचा उत्साह द्विगुणीत करेल.

      Delete