Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, August 2, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १२

Kabir doha

मी आणि बाप्या रोज सकाळी फिरायला जातो. दिल्ली निवडणुका चा काळ होता. प्रत्येकाच्या तोंडावर निवडणूक हाच विषय होता. त्यातल्या त्यात अरविंद केजरीवाल  म्हणजे प्रत्येकाचा आवडता विषय.
बाप्या म्हणाला, "३०-४० वातानुकुलीत लावून थंड झालेल्या शीला दीक्षित सरकारला कोणी सत्तेवर बसवण्यास तयार नाही.  मग आता उरले आहेत दोनच पक्ष आप  आणि भाजप."

मी म्हणालो," बाप्या, यात कोणता पर्याय योग्य. भाजप तर तसा जुना पक्ष, अनुभवलेला. अरविंद केजरीवाल  नवीन आणि तडफदार, इमानदार. प्रयत्न करायला हरकत नाही. नाहीतरी आपण आजपर्यंत प्रयत्नच करीत होतो ना ?"
बाप्या म्हणाला," काहीच हरकत नाही परंतु जनता मात्र एखाद्या घडाळ्याच्या लंबाका प्रमाणे भाजप आणि आप या दोन टोकांकडे  हेलकावे घेत आहे."  "बघावे निवडणुका झाल्यावर काय होते ते!"

ठरल्या प्रमाणे निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. नियमा नुसार घडाळ्याचा लंबक मध्यावर येउन थांबला. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल नाही.

बाप्या म्हणाला, " आतातर गंमतच झाली. शीला दीक्षित सरकार तर ठरल्याप्रमाणे थंड बस्तानात जाऊन पडली. आप आणि भाजप मध्यावर येउन थाबली." "आता काय होईल ? पुन्हा निवडणुका कि अजूनकाही ----"

मी म्हणालो, " राजकारणात काय घडेल हे देवालाही सांगणे कठीण. कॉंग्रेस आप ला समर्थन देईल आणि पुन्हा  निवडणुकीचा खर्च होऊ नये म्हणून आम्ही असे करतोय,  त्याबद्दल शेखी मिरवतील." "कॉंग्रेस मात्र, ज्या केजरीवालांनी  भ्रष्टाचारी, लुच्चे लफंगे या पदव्या दिल्या, त्यांनाच खांद्यावर बसवून मुख्यमंत्री पदावर बसवतील आणि केजरीवाल  ते मान्य करतील."

पुढे घडले तसेच. केजरीवाल  मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जादूची छडी फिरवावी आणि सर्व कामे व्हावीत अशा थाटात कामास सुरवात केली. पाण्याचा मुद्दा हातात घेतला, लगेचच वीज पुरवठ्याचा मुद्दा घेतला. त्याच बरोबर लोकपाल विधेयक टेबल वर आणले असे अनेक मुद्दे  एका झटक्यानिशी  हातावेगळी करण्याचा प्रयत्न केला.    मग काय व्हायचे तेंच झाले. एक ना धड भाराभर चिंध्या. सत्ता सोडून जावे लागले. एकही कार्य पूर्ण झाले नाही.

यावर मी बाप्याला म्हणालो मला एक कथा आठवते., " एकदा एका माकडांच्या समूहाने ठरवले कि आपण शेती करायची. मानवाने जंगल तोड केल्यामुळे आपल्याला अन्नाचा तुटवडा होतो. (राजकारण काय फक्त कॉंग्रेस आणि भाजप नेच करायचे?) त्यांनी जमीन मिळवली व  नांगरली. त्यात पेरणी केली. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी माती उकरून पाहिली कि कोंब फुटले का? पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. कोंब फुटण्याची इतकी घाई झाली कि रोजरोजच्या उकराण्याने ती बीजे अंकुरित झाली नाहीत आणि नष्ट झाली. " "असेच काहीसे केजरीवाल  यांच्या बाबतीत झाले."

बाप्या म्हणाला, "आमचा कबीर दास जर यांनी वाचला असता तर नक्कीच शहाणपण आलं असतं,"

"कबीरदास म्हणतात,              धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ  होय |                          
                                               माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय  ||

कबीरदासजी म्हणतात, अरे मना  ( मन खुप चंचल असल्यामुळे मनाला उद्देशून) जरा धीर धर , इतका अधीर नको होउस. माळ्याला शंभर घडे पाणी द्याव लागतं. देखभाल करावी लागते. वाट पहावी लागते तेव्हा कुठे ऋतू (योग्य वेळ ) आल्यावर  त्या वृक्षांना फळ येत.

असा हा कबीर दोहा आमचे केजरीवाल यांनी  आत्मसात  केल्या असत्या तर त्यांच्यावर असा विदारक प्रसंग उद्भवला नसता.
दत्तात्रय पटवर्धन 

No comments: