‘जिंदगी’ वर मागील भागांत आपण
चर्चा केली. ‘जिंदगी’ नंतर सर्वात बहुचर्चित असा कोणता विषय असेल तर तो ‘बदन’,
‘देह’ होय. सहाजिकच देह नसला तर त्या जिंदगीला/जीवनाला अर्थ तो काय उरेल? मानवाची
सारी धावपळ ह्या तनुला सांभाळण्यासाठी असते. सामन्यांचे सोडा, पण संतानीही देहाला
उच्च स्थान देताना ‘आत्मा’ रामाचे मंदिर मानले आहे, वसतीस्थान मानले आहे. मन्नाडे चे ते सुप्रसिद्द चित्रपटगीत आठवा, ‘लागाचुनरी में दाग....’. कबीरदासजी ह्या देहाचे महत्व सांगतानां म्हणतात हे तलम वस्त्र
देवाने देताना जितके स्वच्छ आणि निर्मल होते तसेच परत करण्याची माझी जबाबदारी आहे.
लिबास उसका अलामत की तरह था
बदन रौशन इबादत कि तरह था.
संतानी मानवी देहाला ‘देवाचे मंदिर’ तर
आत्म्याला साक्षात पांडुरंगाची उपमा दिलेली आहे. मानव जन्माचे सोने करायचे असेल तर
‘नराचा नारायण’ व्हावा म्हणून ह्या देहाचा सदुपयोग करावा लागेल. शायर येथे तोच
उपदेश करीत आहे. देह हा त्या देवाच्या पवित्र भक्तीचा महोत्सव असला पाहिजे. त्या
पवित्र भक्तीची आभा वा तेज शरीरात प्रतीबिबित व्हावे कारण देह केवळ दैहीक सुखासाठी
नसून आत्मिक सुखाचाही सोपान आहे. म्हणून देहाचे पावित्र्य जपले पाहिजे.
शहर-ए-बदन बस रैन-बसेरा जैसा
मंजिल पे कब रुकते है बंजारे लोग.
जन्मोजन्मीच्या प्रवासातील एक
थांबा किवा स्टेशन म्हणजे ‘शहर-ए-बदन’. एक पडाव वा धर्मशाळा, थोड्या वेळ
थांबण्यापुरता, थकलेल्या मुसाफिराला विश्रांती घेण्यापुरता. गंतव्य स्थानी
पोहोचेस्तोवर बदलत राहायचे. येथे थांबण्याचा प्रश्नच येत नाही. देहाकडे पाहण्याचा
एक वेगळा दृष्टीकोण.
सजाते हो बदन बेकार ‘जावेद’
तमाशा रूह के अंदर रहेगा.
जावेद साहब तर सरळ सरळ निर्णयाप्रत
आलेले दिसतात. ते म्हणतात कि देह हा नश्वर आहे, गंतव्य नसून प्रवासातील केवळ एक
थांबा आहे, त्याची कोणतीही शाश्वती नाही, अशा देहाचे किती चोचले पुरविणार? फेशिअल
काय, स्क्रीन ग्राफ्ट काय, सौना बाथ काय, गाडी काय, घोडा काय. कळत नाही का हे सगळे
वर वरचे आहे. आंत वसणाऱ्या आत्मारामाचे काय? त्याचा विचार कधी करणार? जे काही १००
नंबरी आहे ते विसरता अन ‘वरलिया रंगा भूलता’? एकीकडे शाश्वताचा सतत विचार करीता अन
दुसरीकडे अशाश्वत अशा ‘देहाचे, शरीराचे’ लाड पुरविण्यात सारा वेळ खर्ची घालता.
स्वत:ला जगातला सर्वात बुद्धिमान, हुशार प्राणी म्हणवता, आणि अशी विरोधाभासी क्रिया
करीत राहता?
देहाचे डोहाळे कितीही पुरवले तरी
तो क्षरणजन्य आहे, ह्या बाबीकडे लक्ष वेधाताना ‘नझर’ जीर्ण-शीर्ण झालेल्या देहरूपी
वस्त्राची उपमा देताना म्हणतात कि ह्या जीर्ण-शीर्ण झालेल्या देह-वस्त्राला किती
वेळा अन कोठे कोठे ठिगळे लावशील! अरे आता तरी त्याचा मोह सोड. क्षरते ते शरीर! ते
दिवसागणिक क्षरत राहणार, जीर्ण होत जाणार! खरे तर हे जीर्ण वस्त्रच आता बदलण्याची
वेळ आली आहे.
इस
को कहां-कहां से रफू किजीये ‘नझर’
बेहेतर यहीं हैं ओढिये अब दुसरा बदन.
No comments: