Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, August 10, 2014

0 आजची प्रसार माध्यमे


रविवार आणि बाप्याची हजेरी हे अगदी ठरलेल. मी बाप्याला विचारलं " आजच्या काळात हि अत्याधुनिक प्रसारमाध्यमे आहेत जसे इलेक्ट्रोनिक मेडिया , प्रिंट मेडिया . परंतु पूर्वीच्या काळात अशी काही प्रसारमाध्यमे  होती का? "
बाप्या म्हणाला होती ना! आमचे संत , हीच तर प्रसारमाध्यमे होती. जी कथा कीर्तने करून मनोरंजन तर करीतच परंतु समाज प्रबोधनाचे कार्य करून ज्ञानदीप प्रज्वलित हि करीत असत. आता हेच पहाना संत एकनाथ समाज प्रबोधन करीत पंजाब पर्यंत पोहचले होते. त्याचा इतका प्रभाव पडला कि त्यांच्या  अभंगांना शीख धर्मग्रंथात कायमचे स्थान मिळाले आहे. परंतु त्याकाळची प्रसारमाध्यमे आणि आजची यात जमीन आसमान इतका फरक आहे."
मी म्हणालो, "ते कसे?"
त्यावर बाप्या तयार,  म्हणाला, "एक घटना सांगतो. एकदा पोप महोदय अमेरिकेला भेट द्यायला निघाले होते. त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले कि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जरा विचारपूर्वक उत्तरे द्या. शक्यतो 'हो' किवा 'नाही' अशा प्रकारची असावीत. मित्रांचा विचार घेऊन पोप महोदय अमेरिकेला पोहचले. विमानतळावरच  पत्रकारांनी घेरले. एकाने विचारले, "Sir, are you going to visit nudist clubs in America?" यावर पोप महाशयांनी क्षणभर विचार केला आणि प्रती प्रष्ण विचारला, "Are there nudist clubs in America?" दुसऱ्या दिवशी पोप महाशय पेपर चाळायला बसले तर प्रत्येक पेपर वरील मथळा होता, "Pope asks, are there nudist clubs in America?" आजची पत्रकारिता हि अशी आहे."

आतातर बाप्या अजूनही फार्मात येउन म्हणतो, "आमच्या संतांची प्रसारमाध्यमे म्हणायची,

आम्हा हे कौतुक जगा द्यावी नित |
करावे फजित चुकती  ते ||
तुका म्हणे येथे खरयाचा विकरा,
न सरती येरा खोट्या परी ||

संत तुकाराम म्हणतात येथे होतो तो फक्त खरयाचा विकरा. येथे खोट्याला तिळमात्रही जागा नाही. अशा प्रकारे हि प्रसार माध्यमे समाजाच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावीत होती."

मी म्हणालो, "बाप्या,  मला गालिबचा एक शेर आठवतो.

सादिक हु अपने कौल में 'ग़ालिब' ख़ुदा गवाह,
लिखता हु सच की , झूठ की आदत नहीं मुझे ||

सादिक म्हणजे सत्यनिष्ठ, सत्यवादी, न्यायनिष्ठ , शुद्ध, पवित्र, वफादार, कुठे गेली ही माणसं ?"

बाप्या म्हणाला, अरे, इतक्याही दूर कशाला जातो. आताचीच  प्रिंट मीडिया ची सुरवात झाली तेव्हाची गोष्ट. शंकरराव किर्लोस्कर यांनी १९१६ मध्ये 'किर्लोस्कर खबर' हे मासिक सुरु केले त्यावेळेस संपादनाविषयी त्यांनी लिहिले आहे, "मासिकाच्या संपादनाची खुबी मी हेरली ती अशी, कि हे काम व भोजन वाढणाऱ्या गृहिणीचे काम यात विशेष अंतर नाही.एक कागदाचे पान तर दुसरे केळीचे दोन्हीवर निरनिराळ्या रुचीचे व रसांचे साहित्य व चटण्या-कोशिंबिरी वाढायच्या असतात पण त्यांची जागा व प्रमाण ठराविक पाहिजे. रोजच्या भात-भाजीच्या जोडीला एक पक्वान्न हवे आणि हे सर्व पदार्थ अगदी ताजे तवाने गरमागरम पाहिजेत. भोजनाने पोट व मन तर भरलेही  पाहिजे , पण ते आरोग्याला हितकारक ठरले पाहिजे "

" पण आज परिस्थिती उलटी आहे. चटणी-कोशिम्बिरीच्या जागी आरोग्याला हितकारक अशा बातम्या दिल्या जातात  आणि अगदी थोड्या प्रमाणात. अहितकारक बातम्या जसे  वासनाकांड, गैरप्रकार, गैरवर्तन, अफवा, प्रक्षोभक, अशा  पानाच्या मधोमध आणि पोटभर वाढली जातात."

आतातरी या प्रसार माध्यमांनी आमच्या संतांचा वारसा घेऊन खरयाचा विकरा करावा आणि खोट्याला फजित करावे आणि म्हणावे "नाचू कीर्तनाचे रंगी , ज्ञानदीप लावू जगी |"

 दत्तात्रय पटवर्धन 

बुद्धिबळातील प्यादे.
केजरीवाल आणि राजकारण.
संस्थांनी माणसे : नरेंद्र चपळगावकर
बाप्याचे तत्वज्ञान
सलाम मलाला.
 

No comments: