सोसतांना हासणे नाहीच सोपे
वेदनांना पाळणे नाहीच सोपे I
जाणकारांच्या मुरब्बी बैठकी या
मुखवट्याला राखणे नाहीच सोपे I
ती प्रिया माझी म्हणोनी काय झाले
चेह-याला दावणे नाहीच सोपे I
हात हाती रम्य राती चालतांना
भावनांना रोखणे नाहीच सोपे I
मातले सारे इथे ते राजकाजी
शांततेने राहणे नाहीच सोपे I
शिक्षणाच्या मुक्त बाजारी इथेची
अर्थसत्ता टाळणे नाहीच सोपे I
दुग्धगंगा वाहते नेमेच जेथे
भेसळीला छपवणे नाहीच सोपे I
पाटबंधारे असे कां कोरडे ते
राष्ट्रवादी भोग ते नाहीच सोपे I
ठेव ध्यानी चार बाळे फार नाही
भक्त सांगे आचरण नाहीच सोपे I
ईशसेवा क्रॉसखाली चालते रे
मर्म कर्मी जाणणे नाहीच सोपे I
मी असे हो स्वच्छ म्हणतांना इथेची
डाग काळे लपविणे नाहीच सोपे I
ही गजल माझी म्हणोनी छापताना
काव्यचोरी लपविणे नाहीच सोपे I
- प्रकाश पटवर्धन
२०४२०१५.
वाह मस्तच!
ReplyDeleteखुप छान!
ReplyDelete