Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, June 19, 2014

5 मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग 2


अवयव-दान कां व कशासाठी?

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण अवयव-दान ज्या रोग्याला करतो त्याच्या तसेच त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात नेहमीकरता उच्च स्थान निर्माण करतो. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या अवयवावर जीवित असते ती व्यक्ती, तिचे कुटुंबीय, मित्र, समाजात आपला उल्लेख नेहमी आदराने करतील. सा-या समाजात ह्या एकाच दानाने आपली वेगळी ओळख निर्माण होते, आपला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अनेक व्यक्तिंच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. त्यांच्या जीवनात मानवतेच्या आणि सामाजिक कार्याचा आनंद निर्माण करू शकतो व समाजास हे सत्कार्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो, ते वेगळेच.

अगदी स्वार्थी-विचार जरी केलात तरी फायदा आपलाच असणार आहे. अवयव-दाता म्हणून कीर्ती तर मिळेलच पण वेगळ्या अर्थाने दान दिलेल्या अवयवाद्वारे मृत्युनंतरही जगण्याचे भाग्य प्राप्त होईल आणि त्या व्यक्ती जीवित असेपर्यंत आपण समाजात आठवणरूपाने रहाल.

अवयवदानाचा दुष्परिणाम पुढील जन्मी त्रासदायक ठरतो किंवा देवाने आपणास जो देह दिला आहे तो मृत्यूनंतर त्याला तसाच परत करणे, इ भ्रामक समजुती बऱ्याच वेळा अवयव वा देहदानापासून दूर सारतात.

मात्र ह्या सगळ्या बाबी गौण आहेत. दोन वेगळ्या प्रकारच्या गैरसमजुतींचा येथे प्रामुख्याने विचार करावासा वाटतो. एक म्हणजे, अवयव काढण्यासाठी केलेल्या शल्यकर्माचे पैसे वा खर्च दात्याला करावा लागतो पण असा खर्च दात्याला करावा लागत नाही – किबहुना तो खर्च हॉस्पिटल अथवा अवयव ग्रहण करणाऱ्या व्यक्ती करतात. असाही एक समज आहे कि अवयवदाता पुढे कधी आजारी पडला तर डॉक्टर वा सर्जन दुर्लक्ष करतील. असे होणे नाही कारण अवयवदानाच्या वेळचे आणि नंतरचे डॉक्टर वा सर्जन वेगवेगळे असतील तसेच अवयवदात्याचे महत्व त्यांच्यापेक्षा अन्य कोण चांगले जाणू शकेल.

अन्य महत्वाची कारणे –
o आपण अवयव दान संमत्तीवर कोणत्याही वयात – अगदी लहानपण ते ६५ वर्षाच्या जेष्ठ नागरीकापर्यंत – सही करू शकतात;
o दात्याच्या कुटुंबाला अवयव-दानाच्या शल्यकर्माचा खर्च द्यावा लागत नाही;
o दरमहा अंदाजे ९०,००० व्यक्ती अवयव प्रत्यारोपणासाठी वाट बघत असतात, तर त्यापैकी जवळपास २० जण वेळीच अवयव न मिळाल्यामुळे दगावतात;
o अंदाजे ९५% नेत्रदान अंधांना दृष्टी देण्यात सफल झाले, हे विशेष.

अवयवदान म्हणजे शस्त्रक्रियेने एका व्यक्तीच्या देहातून अवयव काढून तो दुस-या व्यक्तीच्या देहात आरोपित करणे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर अवयवदान म्हणजे आपले अवयव काढून दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी दिलेली संमती होय.

मृत्योपरांत अवयवदानाचे प्रमाण हे जीवित व्यक्तीच्या अवयव दानापेक्षा अधिक आहे. पण जीवित व्यक्तीही रक्त, प्लेटलेट्स, स्टेम सेल्स, सारख्या अवयवांचे/टीशूजचे दान करू शकतात.

२००७ ते २०१२ च्या पांच वर्षातील अवयवदान मोहिमेकडे पहिले तर ध्यानात येईल कि ९०% दाते हे मध्यमवयीन होते. त्यापैकी ७०%. लोकांचा ब्रेन-डेथ हा रस्ते अपघातातील, २०% उंचावरून पडल्यामुळे तर १०% शिंगांनी भोसकल्यामुळे झाले होते. जिवंतपणी किडनीसारखे अवयव दान करणा-यात स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. व ते पुरुषांच्या तुलनेत २०:८० आहे. पुरुषांनी स्त्रीयांकडून हा वसा घेणे अत्याधिक जरुरीचे आहे.

अवयव दानाचे कर्म केवळ माणुसकीच्या नात्याने व्हावे म्हणून ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन कायदा, फक्त जवळच्या नातलगांना म्हणजेच पती-पत्नी, मुलगा-मुलगी, माता-पिता, भाऊ-बहिण, आजी-आजोबा, नात-नातू, काका-काकू, मामा-मामी, इ. ना कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार न करता असे दान करण्यास परवानगी देते. तसेच अन्य अश्या व्यक्ती ज्यांनी पेशंट बरोबर वास्तव्य केलेले असेल, त्यानाही ह्या नियमाप्रमाणे अवयवदान करता येऊ शकेल, मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नसावा. अवयवदानास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अवयव-दात्याना ‘स्वतंत्रता दिवस वा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गौरविण्यात याव, असाही प्रयत्न सुरु आहे.

प्रकाश पटवर्धन 

 

5 comments:

  1. अवयव दान कोठे केले जाते तसेच याचे फॉर्म कोठे मिळतात याची माहिती मिळाल्यास बरे होईल.

    ReplyDelete
  2. खरच मरावे परी अवयवरुपि राहावे. कवी आपल्या कवितेतून जगतो , गायक आपल्या गायकीतून जगतो, लेखक आपल्या लेखणीतून जगतो. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या रूपातून अमर होत असतो. मला वाटत अवयव दानातून जगण्याच पुण्य कोणतच नसाव. तरी सुद्धा देहदाना बद्दल लोकाच्या मनात अनेक शंका असतात. कारण अन्त्य क्रिया केल्या जात नाही मग त्या आत्म्याला शांती कशी लाभारणार, दहावा, अकरावा, बारावा या सारख्या विधी होणार नाहीत मग कसे होईल म्हणून मन विचलित होते. अशा कल्पना दूर झाल्याशिवाय अशा दानाला गती मिळणार नाही.

    ReplyDelete
  3. जगभरातील लाखो लोकांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासत असली तरी भारतात मात्र अवयव दानाबाबत फारशी जनजागृती नसल्याने गरजू रुग्णांना मृत्यूच्या छायेतच जीवन कंठावे लागत असल्याची वस्तुस्थिती अलीकडच्या पाहणीतून उघड झाली आहे. 'ऑर्गन रिट्रायव्हल बँकिंग ऑर्गनायझेशन' या संस्थेने अवयव प्रत्यारोपणाचे तंत्र आणि प्रक्रिया भारतात वास्तवात उतरविली असून रुग्णांची प्रतीक्षा यादी, दात्यांच्या नोंदी, दाता आणि गरजू रुग्ण यांचा यथायोग्य मेळ आणि त्यांच्यातील समन्वय तसेच अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या संबंधित रुग्णालयांना ही माहितीचे पुरविली जात असली तरी अवयव दान चळवळीविषयी भारतात सामाजिक जागृती करणे अतिशय कठीण असल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे.

    ReplyDelete
  4. धन्यवाद. एका अत्यंत महत्वाच्या बाबीवर आपली प्रतिक्रिया नोंदविलित.
    @अशोकजी - संबंधित NGOs च्या साईट वर आंन लाईन नांव रजिस्टर करण्याची सोय आहेः आपला मेल आय डी दिल्यास माहिती पाठवु.
    अधर्वजी, श्राध्द हे आनेक प्रकारे करता येते. हिमालयातील मोहिमेवर मृत झालेल्याचे मृत देह मिळत नाहित, त्यांचेही आंत्यविधी होतात मग देहदाना संदर्भात कां होऊ नयेत. दूसरे असे कि गेलेल्या आत्म्याची चिंता करणे महत्वाचे असेल तर प्रत्यक्ष भोगणा-याची चिंता कां करु नये, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
    संतोषजी, आपण सर्वानी आपापल्यापरी प्रयत्नशील असले पाहिजे. समाजभान सहजसाध्य नाही पण ह्या क्षेत्रात तन' मन, धनाने 'सतीचे वाण' घेउन कार्य करणा-या महानुभावांच्या कार्यात अल्प हातभार लावावा.

    ReplyDelete
  5. किडनी प्रत्यारोपणत अजूनही हवा तसा वैद्यकीय क्षेत्राला सफलता मिळालेली नाही त्यामुळे अनेक रुग्ण बहुदा अतोनात त्रासा नंतर मृत्यु पावतात. यात अजुन संशोधन होण्याची आवश्यकता आहे. परन्तु इतर अवयव प्रत्यारोपणात बरीच सफलता मिळालेली आहे.

    आपण ही जागृती निर्माण करण्याचा खटाटोप करीत आहात तो नक्कीच प्रशंसनीय आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete