Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, June 3, 2014

0 वळून पाहताना भाग 6


मागील लेखात वर्तवलेल्या पूर्व पाकिस्तानातील परिस्थितीत युद्धाची बीजे होती. त्याची परिणीती याह्याखाननी २३ नोव्हेंबरला अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आणि जनतेला युद्धाला तयार राहण्याचे आवाहन करण्यात झाली. आता युद्ध अटळ होते. विविध देशा-देशात झालेला पत्रव्यवहार, चर्चा, खलबते, संयुक्त संघातील व्यवहार सारे-सारे निकामी ठरले. प्रामुख्याने अमेरिका व चीनच्या भक्कम पाठीब्यामुळे याह्याखान एका काळरात्रीला आमंत्रण देत होते. बहुदा १९६५ चा दणका विसरले होते किवा अनपेक्षिताची अपेक्षा करीत असावे – wishing against the wish. पूर्व पाकीस्थानच्या सीमेवर भारतीय सैन्याची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव झालेलीच होती. ते डिसेंबर पर्यंत नद्यांचा प्रदेश कोरडा होऊन तो रणगाडे, चिलखती गाड्याची हालचाल नीट व त्वरेने व्हावी, हिमालयातील सर्व बर्फाच्छादित झालेल्या खिंडीमुळे चीनच्या आक्रमणाची शक्यता धूसर व्हावी व दोन अघाड्यांवर लढण्याची वेळ येऊ नये, ह्याची वाट पाहत होते. तरीही अश्या कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारत-चीन सीमेवर सैन्याच्या आठ डिव्हिजन्स तैनात केल्या होत्या.

      डिसेंबर ३, रविवार सकाळी ५.४० वाजता पाकिस्तानी वायुसेनेने वायव्य भारतातील वायुसेनेच्या विविध ११ ठिकाणांवर प्रथम हल्ला केला ज्यात आग्र्यासारख्या सीमारेषेपासून ४८० किमी दूर असलेल्या ठिकाणाचा ही  समावेश होता. सहज म्हणून तुला सांगतो कि सदर हल्ला १९६७च्या इस्रायली ‘operation focus’ वर बेतलेला होता ज्यात मोठ्या प्रमाणावर इस्रायली लढाऊ विमानांनी भाग घेतला होता. पाकिस्तानच्या ह्या हल्ल्यात केवळ पन्नास लढाऊ विमाने होती. भारतीय वायुसेनेने त्याच रात्री विस्तृत प्रमाणावर प्रती-हल्ले सुरु केले. पाकिस्तानी वायुसेनेच्या अपेक्षित हल्यांपासून बचाव करण्यासाठी म्हणून उपाय-योजनाही केल्या गेल्या. भारतीय हवाई दलाने पूर्व पाकिस्थानात तैनात केलेले पाकिस्थानचे एक छोटेसे हवाई-दळ नष्ट करून पूर्व पाकीस्थानच्या  आकाशात निर्विवाद प्रभुत्व स्थापित केले. नंतरच्या काळात भारतीय हवाई दलाने ढाक्का स्थित जनरल नियाझीच्या सरकारी निवासस्थानावर हवाई हल्ला करून, एका सेनाप्रमुखाची दयनीय स्थिती केली होती कारण मनात असूनही ते स्वसंरक्षणार्थ एकही लढाऊ विमान मागवू शकत नव्हते. आपल्या पुढे आता शरणागती शिवाय दुसरा तरुणोपाय नाही अशी जनरल नियाझी व त्यांच्या सेनेची खात्री झाली होती.

      दिनांक ४ डिसेंबरला ‘विक्रांत’ ला बंगालच्या सागरात तैनात केले गेले. ‘विक्रांत’ वरील सी-हॉक फायटर बॉम्बर्सनी चितगाव, कॉक्स-बझार सारख्या तटीय शहरावरील हल्ल्यात भाग घेतला. याच काळात पाकिस्तानची ‘गाझी’ युद्धनौका आश्चर्यकारक रीतीने विझागच्या समुद्रात बुडाली. दिनांक ४-५ डिसेंबरच्या रात्री पाकीस्थानी नेव्हीला काट-शह देण्यासाठी भारतीय नेव्हीने पूर्व-पश्चिम सागरात मिसाईल बोटींचा वापर केला. हा हल्ला इतका तिखट होता कि पाक नेव्हीचे कंबरडे मोडले. त्याचे Distroyer Khaiber’, Minesweeper ‘Muhfiz’ ला जलसमाधी मिळाली तर ‘Shah Jahan’ चे अपरिमित नुकसान झाले.  दिनांक ७-८ डिसेंबरचा नेव्हीचा हल्ला ह्या युद्यात निर्णायक ठरला. कराची बंदरावरच्या हल्ल्यात तीन व्यापारी नौकासह बंदरावरील जवळ-जवळ ५०% राखीव तेल साठा नष्ट केला गेला. ह्याच वेळी भारतीय नौसेनेने बंगालच्या उपसागरात नाकेबंदी करून पूर्व पाकीस्थानला एकटे पाडले. दिनांक ९ डिसेंबरला पाकिस्तानी पाणबुडीने भारताच्या INS Kukri चा १९ अधिकारी व १७६ नौसैनिकासह घास घेतला.  हे युद्धभूमीवर झालेले भारताचे सर्वात मोठे नुकसान होते.  युद्धभूमीवर म्हणण्याचे कारण असे कि नंतरच्या काळातील नुकसान अपरिमित होते, जे जगात ‘सिमला अग्रीमेंट’ म्हणून प्रसिध्द आहे.
सिमला अग्रीमेंट व त्यानंतरचा राजकीय प्रवास मोठा विचित्र अन दुर्दैवी आहे. पुढच्या लेखात बघूच.

 प्रकाश पटवर्धन

No comments: