Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Saturday, June 7, 2014

0 मरावे परी अवयव रुपी रहावे : भाग १


     काहीं दिवसापूर्वी, एका कुटुंबातील आपल्या ब्रेन-डेड मुलाच्या अवयवदानाची बातमी पेपर मध्ये प्रसिद्ध झालेली वाचनात आली. त्या दिवशी एम्सच्या डॉक्टर्सनी दहा तास खपून तब्बल ३२ विविध अवयव आरोपणासाठी काढले. आपल्या ब्रेन-डेड पोटच्या गोळ्याचे विविध अवयव मानवतेच्या अत्युच्य भावनेतून दान देण्याच्या निर्णयामागे आपल्या मुलाला मृत्यूनंतरही अनेकानेक मुलात पाहण्याची सुप्त इच्छाहि होती, हे विशेष.

      आज कित्येक अगतिक रोगी डायलेसिस, बायपास, आंधळेपणा, इत्यादीने अनेक वर्षपासून त्रस्त आहेत, ग्रस्त आहेत, आरोपणासाठी योग्य अवयवांची उपलब्धता नसल्याने वेळ प्रसंगी प्राणास मुकत आहेत. वर्षानुवर्षे शारीरिक, सामाजिक, आर्थिक स्थरावर दिलेला लढा, सारं सारं विफल होतं, ते केवळ आरोपणासाठी अवयव न मिळाल्यामुळे! वरील सत्यकथा हेच वास्तव ध्वनित करते कि कधीही परत न येणाऱ्या जीवाचे अवयव दान वेळीच केल्यास, किती जणाचे प्राण वाचू शकतात, किती जणांना आयुष्याचे अमुल्य दान दिल्या जाऊ शकते. आपणासारख्या सुशिक्षित व सुसंकृत जनांना नक्कीच विचार करायला लावणारी हि सत्यकथा आहे.

      वेळीच कारवाई केली तर ब्रेन-डेड रोग्याच्या देहातून आपण – हार्ट, डोळे, लिवर, लंग्स, किडनी, स्कीन, इत्यादी अवयवाचे दान करू शकतो. सामन्यात: व्यक्ती ब्रेन-डेड कार्डियाक अरेस्ट नंतर १०-१५ मिनिटांनी होतो. अश्यावेळी त्या व्यक्तीला लाईफ सेविंग मशीनवर ठेऊन (अन्य सारे अवयव कार्यान्वित ठेऊन) अवयव काढून घेता येतात.

      ब्रेन-डेथ चा अर्थ असा कि त्यानंतर ब्रेन पुन: क्रियान्वित होत नाही. भारतात अवयव आरोपणासाठी २००,००० किडनी तर १००,००० लीवरची आवश्यकता आहे. ह्या क्षेत्रात कार्यरत एन.जी.ओ. च्या माहिती प्रमाणे दान केले तर हि समस्या सहज सुटू शकते. रोग्यांना दु:खात खितपत पडावे लागणार नाही, व ते लवकरात लवकर रोगमुक्त होऊ शकतील. साहजिकच भारतीय मनाची योग्य मशागत होणे गरजेचे आहे. अपघाती मृत्यू पावलेल्या नातेवाईकाचे अवयव दान देण्याने जर अन्य व्यक्तीचे प्राण वाचत असतील तर अशा दानास कोणती हरकत असावी. येथे एक बाब नमूद करावीशी वाटते कि वाहन चालविण्याच्या लायसन्सवर ते जारी करण्याच्या वेळीच अपघाती मृत्योपरांत अवयवदान संमत्तीची नोंद करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे. व्यक्तीच्या मृत्योपरांत अवयव दानाची कल्पना कितीही चांगली असली तरी स्व:ताच्या नातेवाईकाचा विचार करता सहज शक्य वाटत नाही हेही तेव्हडेच खरे! अवयव दानाला अनुकूल अशी मानसिकता समाजात निर्माण करण्यासाठी योजना बद्ध कार्यक्रमाची आवश्यकता आहे. त्यासाठी लोकांना शिक्षित करणे व एखादी सोपी सहज प्रवृत्त करेल अशी व्यवस्था शोधणे गरजेचे आहे ज्यामुळे मृत्योपरांत अवयव दान करण्यास समाज-मान्यता मिळेल.

     भारतात अवयव आरोपणाच्या सर्व सोयीनी उपलब्ध अशी अवघी १२० केंद्रे आहेत. महाराष्ट्र शासनाने आई.सी.युं. व ऑपरेशन कक्ष असलेल्या सर्व नोन-ट्रान्सप्लांट हॉस्पिटल्सना अवयव पुन:प्राप्ती अनिवार्य केली आहे. याचाच अर्थ असा कि पहिली पायरी म्हणून कमीत कमी अवयव उपलब्धी शक्य होईल.

     ह्या सर्व उहापोहानंतर एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो आणि तो म्हणजे – अवयव-दान कशासाठी?क्रमशः

प्रकाश पटवर्धन

वळून पाहताना भाग ५
वळून पाहताना भाग ४
वळून पाहताना भाग ३
वळून पाहताना ! भाग 2
वळून पाहताना ! भाग 1
No comments: