Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, June 29, 2014

0 मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग ३


अवयवदान खालील व्यक्ती करू शकतात –

o मृत व्यक्ती – ब्रेन-डेथ नंतर सर्व अवयवाचे दान करू शकतात, उदाहरणार्थ, हार्ट, लंग्स, लिवर, पन्क्रिअस, किडनी, डोळे, हार्ट वाल्व्स, स्कीन, हाडे, बोन-मोरो,कनेक्टीव टिश्यू, मिडल कान,आणि रक्त वाहिन्या;

o जीवित व्यक्ती – एक किडनी, पन्क्रिअसचा काही भाग (अर्धा भाग कार्य करण्यास पुरेसा असतो), लिवर (काढलेला भाग काही काळानंतर पुन:निर्मित होतो);

वरील विवेचनावरून सहज लक्षात येईल कि एक दाता किती रुग्णांचे जीव वाचवू शकतो अन आम्ही अश्या रोग्यांना निव्वळ मानसिक आधार म्हणून भेट देतो – just lip sympathy.
खालील गोष्टी ध्यानात घेतल्यास अवयवदाना संबंधीच्या भ्रामक कल्पना व गैरसमज दूर होऊ शकतील:

१. प्रत्येक व्यक्ती दाता होऊ शकतो व त्यात वय, जात-पात, किंवा मेडिकल हिस्टरी आडवी येत नाही;

२. भारतातील कोणताही धर्म अवयवदानाला विरोध करीत नसून असे दान मानवी सेवा मानली जाते;

३. आपण आजारी असाल, दवाखान्यात उपचारासाठी भरती केलेले असाल तर आपला जीव वाचविणे हाच सर्वप्रथम प्रयास असेल. अवयव, डोळे, टिश्यू इ.चे दान आपले मृत्यूनंतरचे सत्कर्म असेल;

४. आपण जर एखाद्या अवयव प्रत्यारोपणाची वाट पाहत असाल तर, सर्वात महत्वाचे असेल आपल्याला झालेल्या रोगाची तीव्रता, किती काळापासून त्रास भोगत आहात अन अन्य मेडिकल माहिती; येथे आपले आर्थिक वा सामाजिक स्थान नगण्यच ठरते;

५. अवयव, डोळे, टिश्यू दानासाठी दात्याला वा त्याच्या कुटुंबाला कोणताही खर्च करावा लागत नाही.

६. अवयव व टिशू नेहेमी जास्तीत जास्त काळजी घेऊन निर्जंतुकीकरण व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने काढले जातात. शस्त्रक्रियेच्या जखमा नीटपणे बंद केल्या जातात आणि त्या जखमांचे निट ड्रेसिंगही केले जाते.

अवयवदानाबाबतचे गैरसमज, अंधश्रद्धा, मार्गदर्शनाचा अभाव,इ. मुळे ह्या मोहिमेस हवा तेव्हडा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.आनंदाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमाने ‘म्युनिसिपल ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘मोटो’ ची स्थापना होऊ घातली आहे व असे केंद्र स्थापन करणारी देशातील पहिली महापालिका असेल. ह्या केंद्राद्वारे मृत्योपरांत अवयवदानासाठी कौन्सेलिंग करणे, ब्रेन-डेड पेशंट शोधणे, त्या संबंधी माहितीचे संकलन, इ. कार्ये केली जाणार आहेत, हे विशेष.

अवयव दानासाठी आपले नाव रजिस्टर/नोंदवायचे असल्यास आपण ‘ऑन लाईन’ फॉर्म भरू शकता. तसेच अवयवदानासंबंधी सामान्य माहितीही खालील साईटवर मिळू शकते:

१. http://donatelifeindia.org/

२. मोहन फौंडेशन: http://mohanfoundation.org/ ( टोल फ्री नंबर-1800 4193737)

३. शतायू: http://shatayu.org.in/

४. गिफ्ट युवर ऑर्गन: http://giftyourorgan.org/

५. गिफ्ट ए लाईफ : http://giftalife.org//


प्रकाश पटवर्धन


मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग 2
मरावे परी अवयव रुपी रहावे : भाग १

Saturday, June 28, 2014

2 कबीराचे दोहे : भाग 8

जलाल्लुद्दिन रुमी तेराव्या शतकातील पर्शियातील एक सुप्रसिद्ध सुफी संत आणि कवी. तो 'बल्ख' प्रदेशातला म्हणजे सध्याचा अफगाणिस्थानचा. आपल्या एका कवितेत तो म्हणतो. 

प्रियकराने दरवाजा ठोठावला आणि आतून प्रेयसीचा आवाज आला 'कोण आहे?" 
त्यावर प्रियकर म्हणाला, " मी आहे".  प्रियकराला वाटले आता दरवाजा उघडला जाईल. परंतु आत एक भीषण शांतता पसरली. प्रियकर बाहेर वाट  पाहत उभा राहिला. थोड्या वेळाने त्याने  पुन्हा दरवाजा वाजवला. आतून काहीच उत्तर आले नाही..पुन्हा वाजवला  पण उत्तर नाही. प्रियकर आता दरवाजा उघडला जाईल म्हणून वाट पाहत उभा राहिला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता तर तो जोरजोरात ओरडून सांगू लागला, प्रिये, मी आहे दरवाजा उघड. थोड्या वेळाने आतून आवाज आला. येथे दोन जण सामावू शकत नाहीत. आता त्याच्या लक्षात आले कि दरवाजा काही उघडला जाणार नाही. 

प्रियकर मागे फिरला. विचारात गुंग. त्याला कळत नव्हते 'येथे दोन जण सामावू शकणार नाहीत' म्हणजे काय? विचार करत  करत उत्तराच्या शोधात जंगलात भटकला, साधना केली, उपासना केली, अनेक अग्निदिव्यातून  गेला. आणि एक दिवशी परत आला.  दरवाजा वाजवला. आतून तोच आवाज आला, 'कोण आहे?"  प्रश्न  तोच होता परंतु उत्तर बदलेल होत. उत्तर आलं 'तूच आहेस'. आणि एकदम दरवाजा उघडला. 


कबीरदासजी  म्हणतात, 
प्रेम गली अति संकरी ता  में  दो न समाय, 
जब मै था तब हरी नाही, अब हरी है मै नाही. || 

कबीरदासजी म्हणतात, या प्रेमाच्या मार्गात दोघे कधीच सामवू शकत नाहीत. 'तू' आणि  'मी ' कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. प्रेम तेव्हांच होत जेव्हा ' मीलुप्त होतो. संपूर्ण समर्पण होऊन 'मी ' अस्तित्वहीन होत. समुद्रात पाण्याचा थेंब  पडल्यावर समुद्राचे पाणी व ‘तो’ थेंब वेगवेगळे दाखवता येईल कां? पाण्याचा तो थेंब अन समुद्राचे पाणी एकजीव होते. त्या पाण्याच्या थेंबाचे स्वतंत्र अस्तित्वच नाहीसे होते. समुद्राशी एकजीव व्हायला त्या थेंबाला त्याचं 'मी' पण 'स्वत्व’ सोडावं लागत. समुद्रात पाण्याचा थेंब आहे परंतु त्याने आपल्या वेगळे पणाचा त्याग केलाय. समुद्र आहे तेव्हा पाण्याचा थेंब नाही आणि थेंब आहे तेव्हा समुद्र नाही.
 
परमात्म्याची भक्ती करतांना, त्याच्या ठायी पूर्ण समर्पण असावे लागते. त्या सर्वेश्वराची सेवा करतांना सर्वसंग परित्याग करावा लागतो, आपपरभावाची तिलांजली द्यावी लागते. परमात्म्याकडे नेणारा मार्ग ‘संकरी’ म्हणजे निमुळता आहे कारण तेथून एका वेळी एकच जण जाऊ शकतो. म्हणून संतसज्जन म्हणतात हे सारे मानवीय बंध येथेच सोडा, मोकळे व्हा, एकट्यानेच पुढचा प्रवास करायची तयारी करा, म्हणजे हाच मार्ग प्रशस्थ होईल. आपण आनंदाने व सहजपणे जगदिशाच्या पायी रहाल.

 दत्तात्रय पटवर्धन 
 

Friday, June 27, 2014

0 शब्द

शब्द माझ्या भावना, शब्द माझी प्रार्थना,
शब्द सारे रेखती, माझ्या मनीच्या कल्पना

आसवांचे रूप होता, निशब्द माझे शब्द होती,
ते कधी आनंददर्शी, तर कधी ते दु:खस्पर्शी.

व्यक्त होती ते कधी ह्या हासऱ्या नयनातुनी,
अन कधी ते व्यक्त होती नेत्र अंगारातुनी.

ती तिची तिरकी नजर अव्यक्त हो सांगा कशी,
सात-जन्मी योजना, कशी सांगते एका क्षणी.

शब्द शब्दातून वदती, वाद-वादातून खुपती,
शब्द देती टोचण्या, अन सांत्वनीही तेच येती.

शब्द तुमचे चित्रकर्ते, शब्द तुमचे भाग्यकर्ते,
शब्द योजा योजनेने, वापरा हो काळजीने.

शब्द तुमचेची तुम्हाला नेती कधी गगनावरी,
अन कधी अनावधाने, आणती ते भूवरी.

शब्द जरी सारे सरस्वतीसुत असले तरी,
उतरती ते जनी, प्रतिभा असे जेव्हा मनी.

हि असे जादू निराळी, मानवाच्या जिन्दगीची,  
गोंधळाचा त्रास होई, खायला एकांत पाही.

-    प्रकाश पटवर्धन.

Thursday, June 26, 2014

0 बाप्याचे तत्वज्ञान

काल मी संध्याकाळी कोम्पूटर  सुरु केला.  एव्हढ्यात दारावरची बेल वाजली. दरवाजा उघडला, पाहतो तर समोर बाप्या दत्तक म्हणून उभा. सरळ आत आला.
मी विचारले, ' काय रे कसा आलास? तो म्हणाला, ' एक प्रश्न विचारायचा होता.' मी म्हणालो, ' बाप्या, तुझे प्रश्न राहू देत. आता मला त्रास देऊ नकोस. बाप्या विचारतो,'अरे तू नाराज आहेस का? काही प्रोब्लेम आहे का?
या प्रश्नासरशी मी एकदम सुरु होतो व म्हणतो, 'बाप्या, हा देव पहा ना, फक्त आपल्या सारख्या सामान्य माणसांनाच दुख्ख देतो? दुख्खांचे पहाडाच आपल्या समोर ठेवतो. मध्येच वाटले तरं  एखादी सुखाची झुळूक देतो आणि आपण  खुश होऊन त्याच्या वर शिक्कामोर्तब करतो. अरे, हा देवच आहे न जो आपल्या डोक्यात समानतेच्या विचारांचे वारे वाहू देतो. आणि स्वतः पहाना समानतेच्या नावाने  बोंब. अरे बाप्या पहाना , हे मोठे लोकं चारा खातात, किती आनंदात तुरुंगात जातात कारण जमवलेली रबडी घरीच सोडून  जातात न! परत आल्या वर रबडी खाऊन आनंदात जगतात. आता घरात रबडी असताना हे चारा का खातात?  हा वेगळा प्रश्न. देव यांच्या समोर  दुख्खाचे डोंगर उभे करत नाही. आणि मजेची गोष्ट पहा. यांना तुरुंगातून सुटीही मिळते. आणि आम्ही ऑफिस मध्ये मर मरून कामे करतो आणि एक दिवसाची सुट्टी  मागतो तरं उत्तर मिळते, 'अहो किती कामे पडली आहेत ती कोण करणार? यांना तरं १४ दिवसांची सुट्टी मिळते ,  म्हणे सुटी वाढवूनही मिळते.'

बाप्या म्हणतो, ' अरे , तू असा निराश का होतोस? सुख दुक्ख्ख हे सर्वांनाच असते. आपले रामदास स्वामी नाही का म्हणत , जगी सर्व सुखी असा कोण आहे? अरे, हे जीवन सुख दुख्खाच्या वेगवेगळ्या झटानचे  कोलाज आहे. यांच्या कडे तुकड्या तुकड्यात पहिले तर असेच भकास वाटेल. पण सर्वांचा एकत्रित विचार केला तर काहीतरी उतुंग, उत्तमच. अरे हाच तर Gestalt चा नियम न!

अरे बाप्या, मला काहीही सांगू नको. देव, फक्त या श्रीमान्ताचाच आहे. आपल्या साठी फक्त याच्या जवळ दुख्ख आणि दुख्ख. याची दुख्खाची पोतडी खाली होते ती फक्त आपल्याच दारात.

बाप्या म्हणतो, हि सुख दुख येतच राहतात. दुक्ख हे कितीही लहान  असले तरी ते आपल्याला पर्वता एव्हडेच दिसते आणि सुख हे अगदी पर्वता एव्हडे असले तरी ते आपल्याला झुळुकी सारखेच दिसते.
हाच तर Eienstein चा सापेक्षतावादाचा नियम.


बाप्या तुझा Eienstein  मला नको शिकवुस. यावर बाप्या म्हणतो, ' मीच शिकवणार, कारण मी अभ्यास खाऊन खाऊन पचवला आहे. तुम्ही नुसता गिळला आहे आणि परीक्षेच्या दिवशी उत्तरपत्रिकेवर ओकलाय. त्यामुळे तुम्हाला ८०% व मला जेमतेम ३५%.. मी पचवल्यामुळे ओकताना काहीतरी नवीनच आलं होत आणि ते तुमच्या समझण्याच्या बाहेरच होत. आणि तुम्ही ओकाल्यावर जसाच्या तसं बाहेर आलं होत  म्हणून ८०%..

मी काही ऐकत नाही म्हणून बाप्याने शेवटचे अस्त्र टाकायचे ठरवले. म्हणाला ऐक मी तुला एक पत्र वाचून दाखवतो. Arhur Ashe  हा एक उत्कृष्ट टेनिस पटू, wimbledon विजेता. १९८३ मध्ये याची हार्ट शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी त्याला चुकून  एड्स संक्रमित रक्त दिल्या गेल. त्याच्या चाहत्याची त्याला जगभरातून पत्रं येऊ लागली. एकाने  विचारले 'देवाने तुझीच का या विदारक आजारासाठी निवड केली.या पात्राच उत्तर देताना Arthur Ash  लिहतो, ' जगात ५० मिलिअन पेक्षा  जास्त मुले टेनिस खेळायल सुरवात करतात, ५ मिलिअन खेळायला शिकतात, ५,००,००० प्रोफेशनल टेनिस खेळतात, ५०००० सर्किट मध्ये येतात, ५००० Grand  Slam मध्ये पोहचतात, ५० Wimbledon  मध्ये पोहचतात, ४ semi  final  मध्ये, २ final मध्ये. आणि ज्या वेळेस मी Wimbledon  Cup  हातात घेऊन उंचावत होतो तेव्हा मी नाही विचारलं देवाला 'Why Me ?'

माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. 


 दत्तात्रय पटवर्धन 

Monday, June 23, 2014

0 वळून पाहताना : भाग ८



१९७१च्या युद्धानंतर ‘सीआचेन ग्लेसिअर’ हा शब्द भारत-पाक वर्तुळात खूपच गाजला. तिथल्या बाल्टिक भाषेत  Sia    म्हणजे गुलाबाची एक प्रजाती जी त्या भागात मोठ्या प्रमाणावर उगवते आणि chun म्हणजे कोणतीही वस्तू जी अमाप प्रमाणात मिळते. तसाच ‘ला’ या शब्दाचा अर्थ खिंड असा होतो. ‘सियाचेन’ हा काराकोरम पर्वतातील ग्लेसिअर प्रांत आहे जो पूर्णत: मानवरहित तसेच undemarcated; जणूकाही अस्पर्श! ह्या ७० कि.मी./४३ मैलाचा साल्तोरो रिजच्या प्रांतातून तीन खिंडी जातात – १. “साई ला” (१८८३६ फु), २. “बिल्फोंड ला” (१७८८० फु), आणि ३. “ग्योंग ला” (१८६६५ फु). काराकोरामचा हा सर्वात लांब, आणि जगातील दुसरा सर्वात लांब नॉन-पोलर ग्लेसिअर आहे. ह्या भागात दोन्ही देशांचे एकूण १५० आउट-पोस्ट आहेत, उंची समुद्र सपाटी पासून २१,००० ते २२,००० फुट असून तापमान (-)५० ते (-) ७० पर्यंत जाते. दोन्ही देशांचे अंदाजे ३,००० सैनिक येथे असून सुमारे २०० अमेरिकी डॉलरचा खर्च दिवसागणिक आहे.

      साहजिकच एका छोट्याश्या बर्फाळ तुकड्यासाठी एव्हडा मोठा खर्च कशासाठी, असा विचार तुझ्या मनात आला असेल.  समीर, हा पट्टा सामरिकदृष्टा अतिमहत्वाचा आहे. चीन व पाकीस्थान मधून लडाखमध्ये प्रवेश होतो तो ह्याच तीन खिंडीतून. सियाचेंनवर भारतीय नियंत्रण असल्यामूळे चीन, पाकिस्थानला ह्या भागातील कोणत्याही लढाईत/संघर्षात मदत करू शकत नाही तसेच उत्तर लडाखला उर्वरित भारतापासून वेगळे पाडण्याच्या संभाव्य पाकीस्थानी प्रयत्नावर नियंत्रण येते. ह्या लष्करीदृष्ट्या महत्वाच्या बाबी शिवाय आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे ह्या ग्लेशिअर खाली नैसर्गिक तेल व वायूचे मोठे साठे असल्याचा कयास! म्हणून ह्या भागावर नियंत्रण म्हणजे अशा उर्जा साठ्यांचे स्वामित्व! अक्साई प्रांतात पाकिस्थानच्या मदतीने चीनने बाल्तीस्थानात आपले अस्तित्व वाढवण्याची क्रिया सुरु केली आहे व त्यासाठी पश्चिम तिबेटपासून ते इस्लामी प्रश्नी संवेदनशील अशा झिन्झीआंग प्रांतातून जाणाऱ्या मार्गाचा (Surface Communication Network)  त्वरेने सर्व सीझनमध्ये वस्तू आणि सैन्याच्या दळणवळणासाठी विकास करीत आहे. विशेष म्हणजे ल्हासा ते काश्गरपर्यंतचा हा मार्ग भारत-चीनच्या सीमेला समानांतर जातो. अशा परिस्थितीत चीनला ह्या क्षेत्रात भारताची समीपता व वाढते अस्तित्व चिंताजनक वाटणे साहजिक आहे.     

सियाचेनच्या एकूण भागापैकी २/३ भाग भारताच्या ताब्यात आहे. येथील हवामानामुळे येथे दोन-चार महिन्यापेक्षा जास्त काल अगदी येथील वातावरणात रुळलेल्या (acclimatized) सैनिकाना रहाता येत नाही, त्याना तेथून हलवावे लागते. अशा रोटेशनमुळे गेल्या १५ वर्षात आपल्या  जवळ-जवळ ६५०,००० सैनिकाना ह्या वातावरणात कार्य करण्याचा अमुल्य अनुभव मिळाला आहे व भारतीय सेना हि जगातील उत्तम अशा अत्यंत उंच पर्वतीय भागातील सेनापैकी (High altitude troops) एक मानली जातेत्यात ‘लडाख स्काउट’ ने (लदाखवंशी सैनिकांची तुकडी), आपल्या कार्यक्षमतेने युद्धात ठसा उमटवला आहे.

      दिनांक १३ एप्रिल, १९८४ ला भारतीय सेनेने एका गोपनीय सुचनेवरून पाकीस्थानच्या संभाव्य ऑपरेशनला नाकाम करण्यासाठी ‘ऑपरेशन मेघदूत’ राबविले व यशस्वी केले. ‘टाईम्स मागेझीन’ प्रमाणे अंदाजे १००० स्क्वे.कि.मी.चा भाग आपल्या नियंत्रणाखाली आला. कुमाऊ रेजिमेंट आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे इतक्या शीघ्र कारवाई केली की चालून येणाऱ्या पाकिस्थानी सेनेला फक्त सर्व शिखरावर भारतीय सेनेने केलेला कब्जा पहावा लागला. दोन्ही देशांचे सुमारे २००० सैनिक कामी आले. तेव्हापासून सतत आजपर्यंत २९ वर्षे हा संघर्ष सुरु आहे. हा भाग जगातील सर्वात उंच युद्ध-क्षेत्र ठरले. त्यानंतर पाकिस्थानने अनेक वेळा विफल प्रयत्न केले. त्यातील बहुचर्चीत होता १९८४ चा प्रयत्न. हि योजना ‘बिलाफोल्ड ला’ ताब्यात घेण्यासाठी होती पण घमासान (हातघाईच्या) लढाई नंतरही विफल राहिली. एका, दिवसा केलेल्या चढाईत ४५७ मी.चा  सरळ बर्फाळ कडा नायब सुभेदार बाना सिंगने सर करून परम विशिष्ठ सेना मेडल मिळवले. ह्या पराक्रमाची खुण म्हणून ह्या २२,००० मी. उंचीवरच्या आउट-पोस्टला बाना सिंगचे नाव देण्यात आले – बाना पोस्ट! ह्या हल्ल्याची योजना परवेझ मुशर्रफ यांची होती, हे विशेष.

      ह्या नंतरही पाकीस्थानने १९९०, १९९५, १९९६ आणि १९९९च्या सुरवातीला – लाहोर सामिटच्या आधी – प्रयत्न केले.
१९९५च्या प्रयत्नान पाकिस्थानने अंदाजे ४० सैनिक गमावले होते तर १९९६ साली भारताने एक एम.आय/१७ हेलीकॉपटर गमावले. २००३ नंतर ह्या क्षेत्रात युद्धबंदी लागू झाली व त्यानंतर ह्या क्षेत्रात आता शांतता आहे.  

         सियाचेनच्या संदर्भात भारतीय सेनेने अनेक मानबिंदू स्थापित केले आहेत. ‘पोईट सोनंम’ – जगातील सर्वात उंच हेलिपॅडची (२१,०००फु) निर्मिती झाली. भारतीय सैनिकांना आवश्यक साधन सामुग्री पुरविण्यासाठी भारताने ‘ध्रुव’ हेलीकॉपटर ची निर्मिती केली तसेच संपर्कासाठी सर्वात उंच ‘टेलीफोन बूथ’ स्थापन केला. विगत काळात भारतीय सेनेने आपल्या अतीव प्रयत्नांनी इतक्या उंची वरील युद्ध-क्षेत्री जिवंत रहाण्याची व लढायची अनोखी पद्धती अमलात आणली आहे. १९८० च्या दशकात अतिविषम हवामानाप्रमाणे फ्रोस्ट-बाईट व जोखीमभऱ्या दऱ्यामुळे हजारो सैनिकांचे जीव जात. परंतु गेल्या दशकाच्या अंतापर्यंत हा आकडा दरवर्षी २०-२२ पर्यंत खाली आला आहे. गेल्या आठ वर्षात मात्र सियाचेन मध्ये एकही मृत्यू झालेला नाही, हे विशेष. त्याचप्रमाणे दरवर्षी फक्त १०-१२ सैनिकांना अन्य तळावर हलवावे लागते.

     आपण ह्याच मुशर्रफ साहेबांनी आपल्यावर लादलेल्या ‘कारगील युद्धा’चा विचार करू.  Till then.


प्रकाश पटवर्धन 


Thursday, June 19, 2014

5 मरावे परी अवयव रुपी राहावे : भाग 2


अवयव-दान कां व कशासाठी?

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण अवयव-दान ज्या रोग्याला करतो त्याच्या तसेच त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात नेहमीकरता उच्च स्थान निर्माण करतो. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या अवयवावर जीवित असते ती व्यक्ती, तिचे कुटुंबीय, मित्र, समाजात आपला उल्लेख नेहमी आदराने करतील. सा-या समाजात ह्या एकाच दानाने आपली वेगळी ओळख निर्माण होते, आपला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अनेक व्यक्तिंच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. त्यांच्या जीवनात मानवतेच्या आणि सामाजिक कार्याचा आनंद निर्माण करू शकतो व समाजास हे सत्कार्य करण्यासाठी प्रेरित करू शकतो, ते वेगळेच.

अगदी स्वार्थी-विचार जरी केलात तरी फायदा आपलाच असणार आहे. अवयव-दाता म्हणून कीर्ती तर मिळेलच पण वेगळ्या अर्थाने दान दिलेल्या अवयवाद्वारे मृत्युनंतरही जगण्याचे भाग्य प्राप्त होईल आणि त्या व्यक्ती जीवित असेपर्यंत आपण समाजात आठवणरूपाने रहाल.

अवयवदानाचा दुष्परिणाम पुढील जन्मी त्रासदायक ठरतो किंवा देवाने आपणास जो देह दिला आहे तो मृत्यूनंतर त्याला तसाच परत करणे, इ भ्रामक समजुती बऱ्याच वेळा अवयव वा देहदानापासून दूर सारतात.

मात्र ह्या सगळ्या बाबी गौण आहेत. दोन वेगळ्या प्रकारच्या गैरसमजुतींचा येथे प्रामुख्याने विचार करावासा वाटतो. एक म्हणजे, अवयव काढण्यासाठी केलेल्या शल्यकर्माचे पैसे वा खर्च दात्याला करावा लागतो पण असा खर्च दात्याला करावा लागत नाही – किबहुना तो खर्च हॉस्पिटल अथवा अवयव ग्रहण करणाऱ्या व्यक्ती करतात. असाही एक समज आहे कि अवयवदाता पुढे कधी आजारी पडला तर डॉक्टर वा सर्जन दुर्लक्ष करतील. असे होणे नाही कारण अवयवदानाच्या वेळचे आणि नंतरचे डॉक्टर वा सर्जन वेगवेगळे असतील तसेच अवयवदात्याचे महत्व त्यांच्यापेक्षा अन्य कोण चांगले जाणू शकेल.

अन्य महत्वाची कारणे –
o आपण अवयव दान संमत्तीवर कोणत्याही वयात – अगदी लहानपण ते ६५ वर्षाच्या जेष्ठ नागरीकापर्यंत – सही करू शकतात;
o दात्याच्या कुटुंबाला अवयव-दानाच्या शल्यकर्माचा खर्च द्यावा लागत नाही;
o दरमहा अंदाजे ९०,००० व्यक्ती अवयव प्रत्यारोपणासाठी वाट बघत असतात, तर त्यापैकी जवळपास २० जण वेळीच अवयव न मिळाल्यामुळे दगावतात;
o अंदाजे ९५% नेत्रदान अंधांना दृष्टी देण्यात सफल झाले, हे विशेष.

अवयवदान म्हणजे शस्त्रक्रियेने एका व्यक्तीच्या देहातून अवयव काढून तो दुस-या व्यक्तीच्या देहात आरोपित करणे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर अवयवदान म्हणजे आपले अवयव काढून दुसऱ्या व्यक्तीला देण्यासाठी दिलेली संमती होय.

मृत्योपरांत अवयवदानाचे प्रमाण हे जीवित व्यक्तीच्या अवयव दानापेक्षा अधिक आहे. पण जीवित व्यक्तीही रक्त, प्लेटलेट्स, स्टेम सेल्स, सारख्या अवयवांचे/टीशूजचे दान करू शकतात.

२००७ ते २०१२ च्या पांच वर्षातील अवयवदान मोहिमेकडे पहिले तर ध्यानात येईल कि ९०% दाते हे मध्यमवयीन होते. त्यापैकी ७०%. लोकांचा ब्रेन-डेथ हा रस्ते अपघातातील, २०% उंचावरून पडल्यामुळे तर १०% शिंगांनी भोसकल्यामुळे झाले होते. जिवंतपणी किडनीसारखे अवयव दान करणा-यात स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक आहे. व ते पुरुषांच्या तुलनेत २०:८० आहे. पुरुषांनी स्त्रीयांकडून हा वसा घेणे अत्याधिक जरुरीचे आहे.

अवयव दानाचे कर्म केवळ माणुसकीच्या नात्याने व्हावे म्हणून ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन कायदा, फक्त जवळच्या नातलगांना म्हणजेच पती-पत्नी, मुलगा-मुलगी, माता-पिता, भाऊ-बहिण, आजी-आजोबा, नात-नातू, काका-काकू, मामा-मामी, इ. ना कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहार न करता असे दान करण्यास परवानगी देते. तसेच अन्य अश्या व्यक्ती ज्यांनी पेशंट बरोबर वास्तव्य केलेले असेल, त्यानाही ह्या नियमाप्रमाणे अवयवदान करता येऊ शकेल, मात्र त्यात कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार नसावा. अवयवदानास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अवयव-दात्याना ‘स्वतंत्रता दिवस वा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात गौरविण्यात याव, असाही प्रयत्न सुरु आहे.

प्रकाश पटवर्धन 

 

Wednesday, June 18, 2014

4 शायरीचा गुलदस्ता : भाग 7

अरबस्तानातील नज्द प्रांतातील घटना आहे. तेथे 'कैस' नावाचा
रहिवाशी राहत होता. तो लैलाच्या प्रेमात पडला. हि प्रेम कहाणी आपण सर्वाना परिचित आहेच. हा कैस लैलाच्या प्रेमात आत्यंतिक प्रेमामुळे वेडा झाला. 'जुनू' या शब्दाचा अर्थ आहे 'भावना' 'emotions '  माणूस अशा भावनावेगात वेडा होतो हे सर्वश्रुत आहेच. तर हा लैलाचा प्रेमी आत्यंतिक प्रेमाच्या भावनेत वेडा झाला . म्हणून लोक त्याल 'मजनू' म्हणू
लागले. हा मजनू एकदा असाच लैलाच्या विचारात हरपून एका नमाज अदा करणाऱ्या  माणसाच्या समोरून गेला. त्या प्रार्थना करण्या माणसाने त्याला हटकले कि तू माझी प्रार्थनेत बाधा टाकलीस. त्यावर माफी मागून मजनू म्हणाला, मी जर लैलाच्या प्रेमात हरपून तुला पाहू शकलो नाही तर तू त्या निर्मात्याच्या प्रेमात हरवलेला असताना मला कसा पाहू शकलास.

तेव्हा पासून 'शराब' हा शब्द प्रतीकात्मक म्हणून 'प्रेम' तसेच 'परमात्म्याप्रती  समर्पण' म्हणून वापरला जाऊ लागला. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती शराब पिउन आपला भान विसरून जातो, त्याप्रमाणे परमात्म्याच्या प्रेमात पडून एखादा भक्त आपले भांविसारतो. आणि
हे एखाद्या निरक्षराला (layman  ) समजवण्या साठी  'शराब' या शब्दाचा उपयोग केला जातो.

गालिब म्हणतो,

वाईज न तुम पीयो,  ना किसीको को पिला  सको,
क्या बात है तुम्हारी शराब-ए-तहूर कि

शराब-ए-तहूर  : A mythical river of wine that flows in the heaven.
हे धर्मोपदेशक, हि  मदिरा ना तू पिऊ शकतोस न आम्हाला पाजू शकतोस. काय रे ती कामाची.
नाहीतर आमची मदिरा (प्रेमरूपी ) आम्हीही पितो आणि इतरानाही पिऊ देतो.
इथे गालिब साहेब कर्मकांडावर आधारित पूजा पद्धतीवर आघात करत आहे.

आता जौक साहेब काय म्हणतात ते पहा,

जौक जो मदरसो के बिगडे हुए है  मुल्ला,
उन्हे मैखाने ले आओ , संवर जाएंगे |

'जौक' या मदरस्यामध्ये बिगडलेल्या पुरोहितांना आपल्या मादिरालयात (जेथे प्रेमरूपी मदिरा पिउन परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे )
तेथे घेऊन ये म्हणजे जरा सुधारेल तरी. इथे पुरोहिताला त्याच्या संकुचित विचारसरणीतून (ज्या विचारसरणीने माणसा माणसात भिंत उभी केली आहे,)  बाहेर काढण्याचा
विचार आहे.

हा एक शेर पहा,

मेरी शराब कि क्या कदर तुझको ए वाईज,
जिसे मै पी के दुआ दु वो जन्नती हो जाये |

शायर सरळ प्रश्न विचारतो कि, माझ्या मदिरेची (प्रेमरूपी) ए शेख तुला काय किंमत जी पिउन मी मदहोश झाल्यावर जर कोणाला आशीर्वाद देईल तर तो स्वर्गातच जाईल. 


दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव 

शायरीचा गुलदस्ता भाग ४,  शायरीचा गुलदस्ता भाग ३,  शायरीचा गुलदस्ता. भाग २ ,  
 शायरीचा गुलदस्ता. भाग १

Thursday, June 12, 2014

3 कबीराचे दोहे : भाग ७

 बाप्याबरोबर मी असाच भटकंती करीत होतो, गप्पांमध्ये रंगलो होतो, किती अंतर चालून आलो ते गप्पांमुळे कळलेच नाही. एकदम थकवा जाणवला म्हणून एके ठिकाणी बसलो. गप्पा सुरूच होत्या. बाप्या असल्यावर विषय अमाप! तेव्हड्यात बाप्याचे लक्ष खजुराच्या झाडाकडे गेले. बाप्या म्हणाला चढतो वर, खजूर तोडून खाऊ. 
मीही होकार भरला. बाप्या झाडावर चढायला तर लागला पण तो जसजसा वर जायला लागला तसतशी भीती वाटू लागली - पाय सटकला तर, चक्कर आली तर? खजुर तर नाही वरून पाय प्लास्टरमध्ये. तो मनातल्या मनात देवाची करुणा मागू लागला.
 
आपणही बाप्यासारखेच करत असतो नाही - संकटात देवाचे स्मरण करतो, देवाकडून काही अपेक्षा असली  कि प्रार्थना करतो. बाप्याही तेच करत होता. म्हणाला, देवा, खजूर तोडून सुरक्षित खाली पोहचू दे, मी तुझ्या मंदिरात ५ रुपये दान करेल. बाप्याला हुरूप आला, आता तर देवाजवळ प्रार्थना केली होती. पुन्हा सरसर झाडावर चढू लागला. जसा खजूरा जवळ पोहचू लागला त्याच्या  मनात विचार आला. प्रयत्न मी करतोय, जोखीम मी घेतोय, आणि मी देवाला ५ रुपये चढावा का चढवूजसा हा विचार त्याच्या मनात आला बाप्या धडामकन खाली पडला. तशातही आकाशाकडे पाहून म्हणतो, " अरे देवा, थोडी गम्मतही सहन होत नाही? मी तर गमतीने म्हणालो होतो." "अरे (खजूर मिळाले असते) मी तर ५ काय १० रुपये चढवणार होतो.

कबीरदासजी म्हणतात,
 फल कारण सेवा करे, करे न मनसे काम | 
कहे कबीर सेवक नही, चहे चौगुना दाम || 

        मनुष्य सेवा  करतो, देवाची प्रार्थना करतो ती फक्त बदल्यात काही मिळण्याच्या उद्देशाने. रोज देवाला प्रसाद चढवतो, भोग चढवतो तोही देव खात नाही हे माहित असते म्हणून. देवाने जरी चुकून कां होईना थोडासा प्रसाद खाल्ला तर... मनात भाव नसतो, भक्ती नसते. सारा स्वार्थाचा मामला! कबीरदास म्हणतात असा मनुष्य सेवक होऊच शकत नाही कारण तो त्या सेवेच्या बदल्यात चौपट फळाची अपेक्षा करतात. 

 

Wednesday, June 11, 2014

2 सलाम मलाला.

३ जानेवारी २००९ रोजी बी बी सी वर एका डायरीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आणि जगाचे लक्ष त्या
डायरी कडे वेधले गेले.. प्रत्येकाच्या तोंडी त्या डायरीचाच विषय. काय होत या डायरीत? पाकिस्तानातील
"स्वात" प्रांतातील दहशतवाद्यांचा नंगानाच. या दहशतवाद्यांनी सामान्य जनतेच जगण कठीण करून
टाकलेलं. स्त्रियांवर बंधन टाकण्यात आली. मुलीना शाळेत जाण्यास मनाई केलेली. आता या दहशतवादी
कारवाईचा विरोध कोण करणार. आणि अशात एक शाळेत जाणारी मुलगी, जिने आपल्या वडिलांकडून
रवींद्रनाथ टोगोरांची कविता 'where the mind is without fear' ऐकलेली,  एक दिवस आत्मविश्वासाने
सांगते "मला शिकण्याचा अधिकार आहे, खेळण्याचा अधिकार आहे,  गाण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे,
मतं मांडण्याचा अधिकार आहे, आणि माझा अधिकार कसा कोण हिरावून घेऊ शकतो.".हे तर अगदी
लोकमान्य टिळक यांच्या सारखेच ना 'स्वातंत्र हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे"  तिची हिम्मत पाहून
तिच्या मैत्रिणीही शिक्षण घेण्यास  तयार होतात. हि बातमी सर्वदूर पसरते आणि एक दिवस शाळेची बस घराकडे परतत असताना अचानक थांबते. बस मधील मुली अवघ्या १३-१४ वर्षाच्या बाहेर डोकावून पाहतात. एक बुरखाधारी दाढीवाला माणूस बसमध्ये घुसतो. आणि जोरात ओरडून विचारतो " कोण आहे ती मुलगी जी अल्लाच्या सैनिकांविरुद्ध, तालीबानिविरुद्ध अपप्रचार करते. तिला याची शिक्षा मिळायलाच हवी. ती मुलगी आत्मविश्वासाने  उभी राहते आणि सांगते, "ती मुलगी मीच" आणि तो  दहशतवादी गोळी झाडतो.
त्या मुलीच्या डोक्याला गोळी लागते. तिच्या दोन मैत्रिणीही घायाळ होतात. दहशतवादी निघून जातो.. परंतु या मुलीला वेळीच चांगले उपचार मिळतात व ती पुन्हा उभी राहते. तालिबानींच्या हिंसेला आव्हान करते. परंतु आता ती एकटी नसते तिच्या बरोबर जग असत. आता तर तिची  ख्याती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तराला पोहचते. पुढे या शाळकरी मुलीला पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार "सितारा-ए-शुजात" मिळतो,  २०१२ मध्ये अमेरिकेच्या 'foreign  policy magazine ' मध्ये वैश्विक विचारवंतांच्या यादीत तिच्या नावाचा समावेश होतो. आयर्लंड मध्ये दिल्या जाणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार" तिच्या नावाने घोषित होतो. कोण हि बंडखोर मुलगी ? तिचे नाव आहे मलाला. 'मलाल' या शब्दापासून मलाला हा शब्द आलेला आहे. मलाल म्हणजे दुक्ख किव्वा शोक. मलाला म्हणजे दुक्खी, शोकमग्न.

याच मलाला वर संजय मेश्राम यांनी "सलाम मलाला" हे  पुस्तक लिहील आहे. संजय मेश्राम यांनी या पुस्तकात मलालाची  प्रेरक कहाणी सांगितलेली आहे.  तसेच स्वान्त या प्रांताचा इतिहास व  सध्याच्या परिस्थितीच वर्णन केलेलं आहे. संजय मेश्राम यांनी पाकिस्तानातील सध्याच्या परिस्थितीचा हि उल्लेख केलेला आहे. तेथील संवेदनशील व्यक्तींच्या मनात उठणाऱ्या भावनांचा हि वेध लेखकाने केलेला आहे. १४ वर्षाच्या मुलीच्या नजरेतून तालिबानचा थरार ज्या डायरीतून अनुभवायला येतो त्या डायरीचा  मराठी अनुवाद करून लेखकाने प्रतुत पुस्तकात दिलेला आहे.  मलाला ज्या शाळेत जात होती त्या शाळेच्या दर्शनी भिंतीवर उर्दूत "हे अल्ला! मला खूप खूप  ज्ञान  दे " बाजूलाच पश्तू भाषेत लिहलेल आहे " शिक्षा म्हणजे प्रकाश"
या पुस्तकाचा प्रवास :   कोण आहे मलाला, स्वान्तचा प्रवास- शांतता ते दहशत, मलाला आणि बी. बी. सी. स्वान्तच्या लोकांचे स्थलांतर, पुरस्कार, मलालावरील जीवघेणा हल्ला अस करता करता मलालाच्या डायरी  वर संपतो.


पुस्तकाचे नाव : सलाम मलाला
लेखक : संजय मेश्राम.
मनोविकास प्रकाशन
प्रकाशन तारीख : १५ सप्टेबर २०१३.
प्रथम आवृत्ती.
मुल्य  : रु.१००
पृष्ठे : १२३.


दत्तात्रय पटवर्धन

Tuesday, June 10, 2014

1 वळून पाहताना : भाग 7



एका जुन्या हिंदी बोलपटातील प्रसिध्द गाण्याप्रमाणे “दिलने जिसे पाया था, आंखोने गवया है’ सारखी स्थिती भारताची सिमला अग्रीमेंट नंतर झाली. प्रत्येक युद्धात वीर सैनिकांनी जे मिळविले होते ते राजकारण्यांनी मातीमोल केले. एका पेनच्या फटकाऱ्याने ३३०० वीरांच्या बलिदानाने जिंकलेली सुमारे १३,००० वर्ग कि मी पश्चिम पाकिस्तानची भूमी (काही सामरिक महत्वाची ठाणी सोडून) व सुमारे ९०,००० हून जास्त पाकिस्तानी युद्ध-कैदी आणि २०० युद्ध-गुन्हेगार सैनिकहि कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आले. मात्र झुल्फिकार भूत्तोनी, इंदिराजीना, मी युद्धकैद्यांना व भारताने जिंकलेले पाकिस्तानी क्षेत्र न सोडवता परत गेलो तर जिवंत राहणार नाही, माझा मुडदा पडेल, माझे अस्तित्व आपल्या हाती आहे अश्या प्रकारची विनवणी सतत केली होती व त्या बदल्यात मी पाकिस्थानला परतल्यानंतर लाईन ऑफ कंट्रोलला आंतरराष्ट्रीय सीमारेषा करेन हा अलिखित  शब्द पाळला नाही. आम्ही नेहमीच आमच्या शत्रूकडे मानवतेच्या द्रीष्टीने पाहिले. भारताच्या इतिहासात अशी अनेकानेक उदाहरणे आहेत कि अशी माणुसकी घातक ठरते तरी आम्ही त्यापासून काही धडा घेत नाही हाही इतिहासच आहे. राणा प्रताप काय, चाऊ एन लाय काय, भुत्तो काय नी मुशर्रफ काय! सारे माणुसकी, मानवतेच्या संकल्पनेपासून कोसो दूर. कधी बदलणार हा इतिहास अन कधी उभा ठाकेल आमच्यातला तो ‘चाणक्य’.
       सिमला अग्रीमेंट पश्चिम पाकीस्थानच्या पथ्यावर पडले. बांगलादेशाच्या निर्मितीमुळे हजारेक कि मी दूरच्या प्रदेशाचा व्याप सांभाळण्याचा नावडता प्रश्न परस्पर सुटला तसेच पंजाबी व बंगाली ह्या दोन वेगळ्या संस्कुतीचा प्रश्नही मिटला. काहीच्या मते, पाकिस्थानी जनतेच्या मनात भारत हा आक्रमक देश असून तो काहीही करून पाकीस्थान नष्ट करू पहात आहे हा गैरसमज या युद्धामुळे दृढ झाला.
       मात्र १९७१च्या युद्धामुळे किवा सिमला अग्रीमेंटमुळे भारताचा काही फायदा झाल्याचे दिसत नाही. न आपण  ‘काश्मीर प्रश्ना’ चा गुंता सोडवू शकलो, न पाकीस्थानच्या पृथकरणामुळे पाकिस्तानी आक्रमणाची भीती लुप्त झाली. ७१ च्या युद्धामुळे आपण एक नवे राष्ट्र निर्माण केले तरी हे युद्ध खऱ्या अर्थाने “निर्णायक” ठरू शकले नाही कारण - जरी भारतीय सुरक्षेची स्थिती अत्यल्प प्रमाणात सुधारली असली तरी आपण पाकिस्थानवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्यात विफल ठरलो. एका अर्थी हा राजनयिक पराभव ठरतो.
      दक्षिण आशियात वर्चस्व स्थापन करण्यासाठी व भारताची डोकेदुखी वाढविण्यासाठी चीन सतत कार्यरत आहे. भारताला सर्व बाजूनी घेरण्याची चीनची योजना सर्वश्रुत आहेच. त्याचाच हा भाग. पाकीस्थानही अमेरिकेला काट-शह म्हणून चीनला त्यांची भूमी खुली करत आहे. गाडर बंदर असो व सियाचीनचा भाग असो, वा अक्साई चीनचा मार्ग असो, सारे भारताचे सामरिक प्रश्न जटील करण्यासाठी चालले आहे.

      शेवटी काय तर ‘शून्यापासून पुढे सुरु’. दक्षिण आशियात श्रेष्ठत्वाची स्पर्धा आणखी तीव्र करण्याच्या उद्देशाने चीन पाकीस्थानला हाताशी धरत असून सर्व क्षेत्रात मदतीचा आभास निर्माण करीत आहे. नुकतेच चीनचे पंतप्रधानांनी चिन-पाकिस्थानच्या मैत्रीची तुलना “higher than mountains and deeper than the ocen.”  अशी केली.
मात्र ‘हिंदी-चीनी भाई भाई’ तील फोलपणा आम्हाला समजण्यासाठी १९६१ साल उजाडावे लागले हे पाकिस्तानने ही लक्षात ठेवणे त्यांच्या अस्तित्वासाठी श्रेयस्कर ठरेल.