Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label कबीर एक संत. Show all posts
Showing posts with label कबीर एक संत. Show all posts

Saturday, June 28, 2014

2 कबीराचे दोहे : भाग 8

जलाल्लुद्दिन रुमी तेराव्या शतकातील पर्शियातील एक सुप्रसिद्ध सुफी संत आणि कवी. तो 'बल्ख' प्रदेशातला म्हणजे सध्याचा अफगाणिस्थानचा. आपल्या एका कवितेत तो म्हणतो. 

प्रियकराने दरवाजा ठोठावला आणि आतून प्रेयसीचा आवाज आला 'कोण आहे?" 
त्यावर प्रियकर म्हणाला, " मी आहे".  प्रियकराला वाटले आता दरवाजा उघडला जाईल. परंतु आत एक भीषण शांतता पसरली. प्रियकर बाहेर वाट  पाहत उभा राहिला. थोड्या वेळाने त्याने  पुन्हा दरवाजा वाजवला. आतून काहीच उत्तर आले नाही..पुन्हा वाजवला  पण उत्तर नाही. प्रियकर आता दरवाजा उघडला जाईल म्हणून वाट पाहत उभा राहिला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता तर तो जोरजोरात ओरडून सांगू लागला, प्रिये, मी आहे दरवाजा उघड. थोड्या वेळाने आतून आवाज आला. येथे दोन जण सामावू शकत नाहीत. आता त्याच्या लक्षात आले कि दरवाजा काही उघडला जाणार नाही. 

प्रियकर मागे फिरला. विचारात गुंग. त्याला कळत नव्हते 'येथे दोन जण सामावू शकणार नाहीत' म्हणजे काय? विचार करत  करत उत्तराच्या शोधात जंगलात भटकला, साधना केली, उपासना केली, अनेक अग्निदिव्यातून  गेला. आणि एक दिवशी परत आला.  दरवाजा वाजवला. आतून तोच आवाज आला, 'कोण आहे?"  प्रश्न  तोच होता परंतु उत्तर बदलेल होत. उत्तर आलं 'तूच आहेस'. आणि एकदम दरवाजा उघडला. 


कबीरदासजी  म्हणतात, 
प्रेम गली अति संकरी ता  में  दो न समाय, 
जब मै था तब हरी नाही, अब हरी है मै नाही. || 

कबीरदासजी म्हणतात, या प्रेमाच्या मार्गात दोघे कधीच सामवू शकत नाहीत. 'तू' आणि  'मी ' कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. प्रेम तेव्हांच होत जेव्हा ' मीलुप्त होतो. संपूर्ण समर्पण होऊन 'मी ' अस्तित्वहीन होत. समुद्रात पाण्याचा थेंब  पडल्यावर समुद्राचे पाणी व ‘तो’ थेंब वेगवेगळे दाखवता येईल कां? पाण्याचा तो थेंब अन समुद्राचे पाणी एकजीव होते. त्या पाण्याच्या थेंबाचे स्वतंत्र अस्तित्वच नाहीसे होते. समुद्राशी एकजीव व्हायला त्या थेंबाला त्याचं 'मी' पण 'स्वत्व’ सोडावं लागत. समुद्रात पाण्याचा थेंब आहे परंतु त्याने आपल्या वेगळे पणाचा त्याग केलाय. समुद्र आहे तेव्हा पाण्याचा थेंब नाही आणि थेंब आहे तेव्हा समुद्र नाही.
 
परमात्म्याची भक्ती करतांना, त्याच्या ठायी पूर्ण समर्पण असावे लागते. त्या सर्वेश्वराची सेवा करतांना सर्वसंग परित्याग करावा लागतो, आपपरभावाची तिलांजली द्यावी लागते. परमात्म्याकडे नेणारा मार्ग ‘संकरी’ म्हणजे निमुळता आहे कारण तेथून एका वेळी एकच जण जाऊ शकतो. म्हणून संतसज्जन म्हणतात हे सारे मानवीय बंध येथेच सोडा, मोकळे व्हा, एकट्यानेच पुढचा प्रवास करायची तयारी करा, म्हणजे हाच मार्ग प्रशस्थ होईल. आपण आनंदाने व सहजपणे जगदिशाच्या पायी रहाल.

 दत्तात्रय पटवर्धन 
 

Thursday, June 12, 2014

3 कबीराचे दोहे : भाग ७

 बाप्याबरोबर मी असाच भटकंती करीत होतो, गप्पांमध्ये रंगलो होतो, किती अंतर चालून आलो ते गप्पांमुळे कळलेच नाही. एकदम थकवा जाणवला म्हणून एके ठिकाणी बसलो. गप्पा सुरूच होत्या. बाप्या असल्यावर विषय अमाप! तेव्हड्यात बाप्याचे लक्ष खजुराच्या झाडाकडे गेले. बाप्या म्हणाला चढतो वर, खजूर तोडून खाऊ. 
मीही होकार भरला. बाप्या झाडावर चढायला तर लागला पण तो जसजसा वर जायला लागला तसतशी भीती वाटू लागली - पाय सटकला तर, चक्कर आली तर? खजुर तर नाही वरून पाय प्लास्टरमध्ये. तो मनातल्या मनात देवाची करुणा मागू लागला.
 
आपणही बाप्यासारखेच करत असतो नाही - संकटात देवाचे स्मरण करतो, देवाकडून काही अपेक्षा असली  कि प्रार्थना करतो. बाप्याही तेच करत होता. म्हणाला, देवा, खजूर तोडून सुरक्षित खाली पोहचू दे, मी तुझ्या मंदिरात ५ रुपये दान करेल. बाप्याला हुरूप आला, आता तर देवाजवळ प्रार्थना केली होती. पुन्हा सरसर झाडावर चढू लागला. जसा खजूरा जवळ पोहचू लागला त्याच्या  मनात विचार आला. प्रयत्न मी करतोय, जोखीम मी घेतोय, आणि मी देवाला ५ रुपये चढावा का चढवूजसा हा विचार त्याच्या मनात आला बाप्या धडामकन खाली पडला. तशातही आकाशाकडे पाहून म्हणतो, " अरे देवा, थोडी गम्मतही सहन होत नाही? मी तर गमतीने म्हणालो होतो." "अरे (खजूर मिळाले असते) मी तर ५ काय १० रुपये चढवणार होतो.

कबीरदासजी म्हणतात,
 फल कारण सेवा करे, करे न मनसे काम | 
कहे कबीर सेवक नही, चहे चौगुना दाम || 

        मनुष्य सेवा  करतो, देवाची प्रार्थना करतो ती फक्त बदल्यात काही मिळण्याच्या उद्देशाने. रोज देवाला प्रसाद चढवतो, भोग चढवतो तोही देव खात नाही हे माहित असते म्हणून. देवाने जरी चुकून कां होईना थोडासा प्रसाद खाल्ला तर... मनात भाव नसतो, भक्ती नसते. सारा स्वार्थाचा मामला! कबीरदास म्हणतात असा मनुष्य सेवक होऊच शकत नाही कारण तो त्या सेवेच्या बदल्यात चौपट फळाची अपेक्षा करतात.