Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, July 6, 2014

0 शायरीचे दालन : भाग १


(I) जिंदगी:

शायरीच्या ह्या रंगमहाली आपले स्वागत असो.

आज ‘जिंदगी’ हा विषय घेत आपण प्रवासाचा श्रीगणेश करीत आहोत. उर्दू काव्य दालनात ह्या विषयावर ब-यापैकी खोलवर विचार झालेला दिसतो. प्रत्येक शायराने आपले जीवनाबद्दलचे अनुभव वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आपल्या समोर ठेवले आहेत. काही शायर जीवनाबद्दलच्या सर्वसामान्य कल्पना वेगवेगळी उदाहरणे देऊन पेश करताना दिसतात तर कांही आपल्याला जीवनाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहायला शिकवितात - सकारात्मक वा positive thinking.

जीवन हे पंचमहाभूतापासून - पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश -बनलेले आहे अन मृत्यू म्हणजे ह्या तत्वांचे विघटन, हे आपण वर्षनुवर्षे ऐकत आलो आहोत. शायर म्हणतो :

जिंदगी क्या है, अनासीर से जहुरे तरतीब२ 
मौत क्या है, इन्ही अजजां का परीशा होना II

( अनासीर : पांच घटक;  अजजां : रूपांतरण, व्यवस्थापन.)

अवघ्या दोन ओळीत शायर किती समर्पकपणे जीवन-मृत्यूचे गारुड सोप्या रीतीने पेश करताना म्हणतो, ‘जीवन म्हणजे पृथ्वी, आप, वायू, तेज व आकाश यांचे एका विविक्षित क्रमात केलेली व्यवस्था तर मृत्यू म्हणजे ह्या पांच तत्वांचे होणारे विघटन’.

जन्म आणि मृत्यू मधील जीवन – ज्याला कबीरदास ‘पानी केरा बुद्बुदा’ म्हणतात ते कवींच्या प्रतिभेला आव्हान आहे; अगदी क्षणभंगुरते पासून ते अमरत्वा पर्यंत, सार्थकतेपासून ते निरर्थकतेपर्यत, सुखापासून ते दु:खापर्यंत सगळया स्थिती. क्षणभंगुरतेला उर्दू काव्यातही वेगवेगळी प्रतिमाने देऊन सामान्य माणसासमोर जीवनाच्या नग्न वास्तवतेत उभी केली आहे. ‘जोश’ मलिहाबादीचा हा शेर –

रानिश-ओ-रंग के एवान में लैला-ए-हयात
सिर्फ ऐक रात की मेहमान है, कोई क्या समझे II


( रानिश : गीत, एवान : महाल )

एषो-आरामाच्या ह्या महाली हयातरुपी/जीवनरुपी लैलेचे वास्तव्य हे केवळ एका रात्रीसाठी आलेल्या पाहुण्यासारखे आहे, हे लक्षात ठेव. हीच क्षणभंगुरता प्रकर्षाने ठेवताना एक शायर म्हणतो जीवन म्हणजे १०० वर्षाचा पटटा जरी असला तरी अगदी पुढच्या क्षणाची काहीच शाश्वती नाही. ‘असेन मी, नसेन मी’!

सुप्रसिद्द पाकिस्तानी शायर - अहमद ‘फराज’ – म्हणतात कि जीवन तुझ्या दारी एक क्षण थांबून पुढे जाणा-या भिका-यासारखे क्षणिक राहणारे आहे.

जिंदगी को भी तेरे दर से भिकारी की तऱह 

एक पल के लिये रुकना है, गुजर जाना है II
जां निसार अख्तर साहेब मोठ्या खुबीने ह्या क्षणभंगुरतेला पेश करत आहेत–

फुर्सते कार फकत चार घडी है यारों 
क्या एतबार-ए-वादा-ए-फर्दा करें कोई II

(कार :.काम, कार्य )

शायर म्हणतो हा ‘दोन घडीचा डाव’ फारच तोडका आहे, विचार करता करता केव्हा लुप्त होतो ते कळतसुद्धा नाही. जे काय मिळवायचे आहे ते, वेळ न दवडता मिळवण्याच्या प्रयत्नाला लाग, अश्या गैरसमजात राहू नकोस कि उभे आयुष्य पडलेले आहे अन्यथा पस्तावण्याची पाळी येईल. ‘बैल गेला अन झोपा केल्या’ गत स्थिती होईल. शायर हि पूर्व सूचना देतात कारण, सामान्य जणांची स्थिती काहीशी अशीच होते –

सुबह होती है शाम होती है
जिंदगी युंही तमाम होती है I


दर दिवशी सूर्य उगवतो, सकाळ होते, सूर्य मावळतीला येतो, संध्याकाळ होते; पुन: दिवस उजाडतो अन मावळतो. दिवसागणिक हेच होत राहते, पुन: पुन:. जणू काहीं कोलुच्या बैलाप्रमाणे एका आसाभोवती फिरत राहणार, डोळ्यावर पट्टी बांधल्यागत. आपण नेमके हेच करत असतो नां?

 क्रमश:

प्रकाश पटवर्धन 

No comments: