“एकीचे
बळ” असा नारा देत माणूस समूहाने राहू लागला. अडचणींचा सामना करत जगणं सोपं व्हावं
म्हणून समाजाची निर्मिती झाली. भावनिकदृष्ट्या प्रबळ होऊन जगण्यास तेवढाच हातभार.
आपण कुठल्यातरी साच्यात बसायला हवे हा अट्टाहास. जगाच्या नकाशावर मी भारतीय एवढीच
काय ती ओळख. मी माझ्या देशात कुठेही गेले कि मी अमुक एका राज्याचं प्रतिनिधित्व
करते. देशपातळीवर माझ्या धर्माचा विचार केल्या जातो. धर्माची गणितं अगदी सहज
चुटकीसरशी सोडवली जातात. आपण अपना पराया हा भेद उघड करू लागतो. मी माझ्या राज्यात
हिंडूफिरू लागले तेंव्हा विभाग, जिल्हा आणि सरतेशेवटी माझ्या मुळ गावापर्यंत येऊन
ठेपते. गावाच्या वेशीपासून आत प्रवेश केल्यानंतर माझी जात ही माझी ओळख. आपली ओळख
कितीही पुसता यावी म्हणून प्रयत्न केला तरी तो तोकडा ठरतो. आपली ओळख जोपर्यंत
कुणास ठेस पोहचवत नाही तोपर्यत सगळे आलबेल असते पण जेंव्हा ह्या भेदाची झळ बसते
तेंव्हा आपल्याला ही तकलादू ओळख नकोशी वाटते.
धर्म, जात आपल्या जगण्याचा भाग आहे आपलं जगणं
नव्हे. माणसाला किमान माणूस म्हणून जगता यावे ही माफक अपेक्षा. काळे, गोरे हा
वर्णभेद जगाला अराजकतेच्या सीमेवर पोह्चोवतोय. आज मी अत्यंत संवेदनशील ‘हॉटेल
रवांडा’ हा वास्तववादी सिनेमा पाहिला. हॉटेल रवांडा हा अमेरिकन ऐतिहासिक नाट्यमय
सिनेमा आहे. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक टेरी जॉर्ज आहेत. हा सिनेमा रवांडाला १९९४ साली
घडलेल्या वंशहत्येवर आधारित आहे.
रवांडा मधील ‘हुटू’ आणि ‘टूटसी’ ह्या दोन
जमातींमधल्या संघर्षाचे पर्यावसन युद्धात होते. राजकारणी हे भ्रष्टाचार करण्यात
गुंतून पडतात. ‘पॉल रसेसबगीना’ (डॉन केड्ल) हा ‘मिली कॉलिन्स’ ह्या हॉटेलमध्ये
म्यानेजर पदावर काम करतो. तो हुटू आहे परंतु त्याची पत्नी तातियाना (सोफी ओकोनिडो)
ही टूटसी आहे. हुटू कट्टरवाद्यांचा जॉर्ज रूटगंडा हा स्थानिक नेता पॉलच्या हॉटेलला
धान्याचा पुरवठा करत असतो. तो टूटसी लोकांचा भयंकर द्वेष करतो.
देश अराजकतेच्या गर्तेत सापडतो. पॉलच्या
शेजारी राहणाऱ्या लोकांना नाहक मारून टाकले जाते. पॉलच्या मुलाचा मित्र मारल्या जातो
आणि त्याचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात सापडतो. स्वतःच्या मुलावर जीवापाड प्रेम
करणारा पॉल हादरतो. युद्ध संपल्यानंतर आर्मीचे लोक एक दिवस पॉल आणि शेजाऱ्यांना
त्रास देतात. आपलं घरटे मोडू नये ह्यासाठी तर आपण जीवावर उदार होतो. माझी माणसे
जगायला हवीत ह्या विचाराने तो लाच महागडे मद्य भेट देऊन कुटुंबाचा जीव वाचवतो. तो
सगळ्यांचे जीव वाचवून त्यांना हॉटेलमध्ये आश्रय देतो.
संयुक्त राष्ट्रसभेच्या कॅम्पमध्ये जागा
अपुरी पडू लागते म्हणून माणसांचा लोंढा हॉटेलकडे वाढतो. आपल्या कुटुंबापुरता विचार
करणारा पॉल विलक्षण बदलतो. तो आश्रितांची काळजी घेतो जणू प्रत्येकाला वाचवणे
तितकेच महत्वाचे. शांतीसेनेचे प्रमुख कर्नल ऑलिवर हे वाटाघाटी करण्यात अपयशी
ठरतात. वंशहत्या थांबवणे कठीण होऊन बसते. छोट्या छोट्या टूटसी मुलांना मारण्यात
येते जेणेकरून त्यांचा वंश नष्ट होईल. परकीय गोऱ्या लोकांना सहीसलामत सोडवण्यासाठी
सेनेची मदत मिळते. फक्त रवांडीयन लोक उरतात लाचार, अगतिक.
तातियाना पॉलला सोडून जा म्हणून विनवते. तो
नकार देतो. जियेंगे तो साथ, मरेंगे तो साथ साथ. एका रात्री हॉटेलच्या गच्चीवर तो
पत्नीला घेवून जातो. त्याच्या चुकांची कबुली देतो आणि तिला म्हणतो जर हुटू
कट्टरवादी ह्या हॉटेलमध्ये शिरले तर इथून उडी मारून जीव दे. तो भावपूर्ण क्षण आपला
ताबा घेतो...... शांतीसेना काही लोकांना रेफ्युजी म्हणून देशाबाहेर जाण्यास मदत
करते. गाड्यांमधून रेफ्युजी बाहेर पडल्याची बातमी कट्टरवाद्यांपर्यंत पोहचवली जाते
आणि त्या सगळ्याना पुन्हा परतावे लागते. पॉल शेवटच्या प्रयत्नात रवांडा आर्मी जनरल
ऑगस्टिन बिझीमुंगुला लाच देवू शकत नसल्यामुळे ब्लाकमेल करतो. त्याला युद्धातील
गुन्हेगार म्हणून कारवाईची भीती घालतो. सरतेशेवटी तो त्याच्या कुटुंबाला आणि
इतरांना सुरक्षित स्थळी हलवतो. पॉल १२६८ लोकांचे प्राण वाचवतो. सिनेमाला आफ्रिकन
शिंडलर लिस्ट नाव देण्यात आले. युद्धसंहारामध्ये लक्षावधी लोक मारल्या गेले.
सिनेमा पाहताना मी कैक वेळा अश्रूंच्या
सरींमध्ये चिंब भिजले. मी पार हादरून गेले. मी माझ्या कातडीच्या रंगाचा विचार करू
लागले. दंग्यात हजारो निष्पाप लोकांचे असेच बळी गेले असतील. मी उद्याचा दिवस बघू
शकणार नाही हे त्यांच्या ध्यानीमनी नसेल. थोड्या वेळात परत येतो असे सांगून घराबाहेर पडलेला माणूस पुन्हा कधी माघारी फिरला
नाही. त्यांची चिमुकली त्यांच्या वाटेकडे डोळे लाऊन बसतात. आपल्या मनात द्वेषाची
बीजे कोण पेरत इतके का कमकुवत आहोत आपण. आपण सगळे मिळून देवाला साकडं घालू, बाबा
रं माणूस बनून जगू दे. बाकी काही नको.
विजया यादव
माणुस जातपात, धर्म, रंगरुप, देव-दानव ह्या सगळ्यांचा उपयोग स्वार्थासाठी पुरेपुर करुन घेतो, अगदी समताही त्याला अपवाद ठरत नाही. अन्यथा वर्डस्वर्थला 'नरेची केला हीन किती नर' म्हणावे लागले नसते. परिक्षण भावले. धन्यवाद.
ReplyDeleteडॉ. सुलभा ब्रह्मनाळकर आपल्या पुस्तकात " गोफ जन्मांतरीचे" यात लिहितात, " हजारो वर्ष पूर्वी मनसे टोळ्या करून राहत. दोन टोळ्यात अन्नासाठी स्पर्धा असे. टोळीच्या यशासाठी स्वतंत्र मताने वागणे सोपे, सोयीचे व फायद्याचे ठरले आणि समूह मानसिकता मेंदूत दृढ झाली. आणि मग या सामुहिक मानसिकतेमुळेच सामुहिक स्पर्धा निर्माण झाली ती आजतागायत दृढ आहे. परीक्षण उत्तमच.
ReplyDelete