Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Tuesday, July 15, 2014

0 कला जगत : भाग ४ : व्हेअर इगल्स डेअर

मित्रांनो,

मागच्या आठवड्यात मी कामांच्या घाईगडबडीत पुस्तकांविषयी लिहायचे राहून गेले. एवढ्या मोठ्या चुकीला शिक्षा मिळाली पाहिजे असे एका जाडजुड पुस्तकाने निषेधपर पत्रके वाटून आवाहन केले. काहींनी ह्यात हो चा सूर आळवून माफीनामा मागितला. काहींनी कट्टी करण्याची भीती दाखवली, काहींनी शेल्फमधून धपाधप खाली उड्या मारल्या, मला नेमके काय करावे ते सुचेना. म्हणून प्रथम माझ्या प्रिय पुस्तकमित्रांची माफी मागते हवं तर माफीनामा प्रसिद्ध करते पण बाबांनो असे रागावू नका. कान पकडून सॉरी.......

प्रत्येक माणूस वेगळा म्हणून माणसाच्या वाचनातील आवडीनिवडी भिन्न असणार हे मला ठाऊक आहे. रहस्यमय कादंबऱ्यांचा एक विशिष्ट चाहतावर्ग असतो. सुरुवातीपासून शेवटापर्यंत उत्कंठा ताणून धरलेली असते. आपण पुस्तक वाचताना बांधलेला अंदाज खरा ठरला तर त्यात काही मजा उरत नाही. रहस्य हे सहजासहजी उलगडता येणार नाही अश्या पद्धतीने कथा गुंफलेली असते. अलीस्टेर म्याक्लीन ह्या स्कॉटिश लेखकाचे ‘व्हेअर इगल्स डेअर’ पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. पुस्तक हातात घेतले आणि समोर काहीच दिसेना. वेगवान घडामोडी, रहस्य आणि उत्कृष्ट कथानक ह्या जमेच्या बाजू. वाचकांच्या मनावर जबरदस्त पकड निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे.

दुसरे महायुद्ध सुरु असते, थंडीच्या मौसमात एका रात्री ब्रिटीश स्पेशल फोर्सकडून सात माणसे आणि एक महिला ह्या सर्वांची एक एक टीम शिखरावर जर्मनीजवळ उतरवण्यात येते. ह्या मोहिमेचा एक गुप्त हेतू असतो कि सहजासहजी पोहचू न शकणाऱ्या “कॅसल ऑफ द इगल” ह्या जागी आणि जर्मनीच्या गुप्त हेडक्वार्टरमध्ये जाऊन अमेरिकन जनरलची सुटका करायची असते. अमेरिकन जनरल हा जर्मनीच्या ताब्यात असतो आणि त्याची उलटतपासणी घेतली तर त्याने ‘डी – डे’ चा प्लान सांगू नये म्हणून मोहीम आखली जाते. सार्जंट हर्रोड, लेफ्टनंट स्क्याफेर, कर्रकिओला, स्मिथ, क्रिस्तीयांसन, टोरेंस, स्मिथी आणि एलीसोन प्याराशुटने शिखरावर उतरतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत ही टीम मोहिमेस सज्ज होते. मोहिमेविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येते.

प्याराशूटने उतरले कि कुणीतरी हर्रोडचा खून करतो. त्या पाठोपाठ आणखी दोन जणांचे खून होतात. मोहीम मोडून काढण्यासाठी शत्रुपक्ष जबाबदार आहे कि कुणी घरचा भेदी आहे जो नकळत शत्रूशी मिळालाय?.धाडशी मोहीम सहजासहजी पार पडणार नाही. प्रत्येक जण प्रचंड तणावाखाली वावरतो आणि खरी मोहीम अत्यंत गुंतागुंताची होऊन बसते. विश्वास कुणावर ठेवावा कि नाही हेच प्रत्येकाच्या डोळ्यात दिसू लागते. मोहीम यशस्वी होते कि नाही जनरलची सुटका होते का? आणि कटकारस्थाना मागचा खरा सूत्रधार कोण असतो हे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा ‘व्हेअर इगल्स डेअर’.

पुढच्या आठवड्यात पुन्हा मी नवीन पुस्तकासोबत तुमच्या भेटीला येईन तोपर्यंत वाचा खा, प्या, आणि मस्त मजा करा.

तुमची सखी

 विजया यादव. 

No comments: