Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, July 4, 2014

0 संस्थांनी माणसे : नरेंद्र चपळगावकर


भारताला स्वातंत्र मिळाले त्यावेळेस भारतात जवळपास ६०० संस्थाने होती. स्वातंत्र मिळाल्यावर बहुसंख्य संस्थानं भारतात विलीन झाली. काश्मीर, जुनागड, त्रावणकोर आणि हैद्राबाद हि चार संस्थाने सहजपणे विलीन झाली नाहीत. त्यांची स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याची अभिलाषा होती. जुनागड व त्रावणकोर हि संस्थानं थोड्या प्रयत्नानंतर खालसा झाली. काश्मीर व हैद्राबाद खालसा करण्यास आम्हाला काय कराव लागलं याचा इतिहास सर्वश्रुत आहेच.

असं म्हणतात, इतिहास दोन प्रकारे सांगता येतो. महत्वाच्या घटना क्रमवारीने सांगून, त्यांची कारण मीमांसा करून अथवा इतिहास घडवणा-या व्यक्तिमत्वांचा परिचयाद्वारे. नरेंद्र चपळगावकर यांनी हा दुसरा मार्ग अवलंबिला आहे. "संस्थांनी माणसे" या पुस्तकातील व्यक्तिचित्राणातून तत्कालीन इतिहास आणि तो इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या अंतरंगावर भेदक प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे व त्या ते सफल झाले आहेत हे पुस्तक वाचल्यावर वाचकाच्या ध्यानात येते. निजाम, हैद्राबाद संस्थानाचा सर्वेसर्वा. विचार करा या अधिपतीचे राहणीमान कसे असेल. तुम्ही नक्कीच म्हणाल कि ते एखाद्या राजासारखे असेल. मात्र हा अधिपती अगदी गबाळा राहत असे. वास्तविकता हि कल्पनेपेक्षा अनेकवेळा वेगळीच असते, याचा अनुभव आपल्याला निजामाचं व्यक्तिचित्रण वाचताना येतो. त्यातलंच दुसरं पात्र-एका सामान्य घरात जन्मलेला, फाटक्या अंगाचा कासीम रिझवी. त्याची जगावेगळी क्रूरता जी त्याच्याच नातवाच्या वक्तव्यावरून कळून येते, तो म्हणतो, "इस्लाम चा अर्थ शांतता आणि निरपराध माणसांची हत्या करणे इस्लामला मान्य नाही व इस्लामचे नाव घेत आम्ही मानवी रक्त सांडण्याचे पाप करीत आहोत. काय दुर्दैव आहे! माझ्या आजोबांच्या आत्म्याला ईश्वराने शांती द्यावी. या सर्वाचा उल्लेख या पुस्तकात येतो.

दारिद्र्याशी झगडत आपल्या कर्तृत्वाने आणि सचोटीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पोहोचलेले न्या. केशवराव कोरटकर याचं व्यक्तिचित्रण आहे. हिंदू मुस्लिम भेद मनात न मानता हिंदू विद्यार्त्यावरही तेव्हडेच प्रेम करणारा नवाब ही त्यात आहे. पाकिस्तान व हैद्राबाद संस्थानाच्या हिताची जवाबदारी स्वीकारणारा पण कसलेच विशेष गुण नसलेला आणि सुदैवाने एक संधी मिळालेला व्यापारीही यात आहे. या मुस्लिम राज्यात अपवाद म्हणून पंतप्रधान झालेला आणि सांकृतिक कसरतीचा एक भाग म्हणून काही हिंदू व तेव्हढ्याच मुस्लिम स्त्रियांसह विवाह करणारा महाराजा किशनचंद यात आहे. याच संग्रहातील सर वॉल्टन या इंग्रज माणसाच व्यक्तिचित्रण, तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांची वृत्ती व एकंदर दृष्टिकोना वर लख्ख प्रकाशझोत टाकतो.

नरेंद्र चपळगावकर यांनी इतिहासाचे तपशील व आवश्यक संदर्भ देत आपल्या रसाळ भाषेत इतिहासासारखा रुक्ष विषय समर्थपणे वाचकांसमोर मांडण्याचे काम यशस्वीरीत्या हाताळल्याचे निदर्शनात येते.

संस्थानी माणसं
नरेंद्र चपळगावकर
मौज प्रकाशन
पृष्ठे : १५०
मुल्य : रु 200

 दत्तात्रय पटवर्धन 

No comments: