Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Thursday, July 10, 2014

1 वळून पाहताना : भाग १०




सैनिकी भाषेत कारगिल युध्दाला जरी ‘संघर्ष’(conflict) म्हंटले जात असले तरी ‘जगातील अति उंचीवरील पहाडी संघर्ष’ म्हणून साऱ्या जगातील सैनिकी शाळा तसेच संस्थानामधून अभ्यासासाठी एक विषय म्हणून शिकवला जातो, हे विशेष. अफगाणिस्तानात रशिया व नंतर अमेरिकेशी झालेली युद्धे जरी अति उंचीवरील पहाडी प्रकारात मोडत असली तरी कारगिल युद्धाला वेगळे महत्व आहे. असो.

     कारगिल युद्धात काही महत्वाचे मुद्दे समोर आले असून त्यापासून आपण कांही धडे घेणे जरुरी आहे. ते मुद्दे –

१.      पूर्वी ही अति उंचीवरील ठाणी हिवाळ्याच्या अति प्रतिकूल हवामानात सैनिक सोडून देत असत पण सीमा सुरक्षा दलाचे जवान महिन्यातुन/तीन महिन्यातून एकदा ह्या भागात टेहेळणी करीत असत. मात्र, अशा प्रकारच्या टेहेळणीत बहुदा फारसे आक्षेपार्ह मिळत नसल्यामुळे व कपातीच्या दृष्टीकोनातून, ही पद्धत बंद करण्यात आली असावी. दुर्दैवाने ह्यामुळे पाकला सहजतेने अशा ठाण्यांवर कब्जा करता आला. हिवाळ्यापासून तब्बल सात महिने असा प्रांत टेहेळणीविना सोडणे योग्य नाही. योजना सुरु ठेवल्या पाहिजेत कारण कारगिल सारखी परिस्थिती उद्भवल्यास टेहेळणी बंद केल्यामुळे होणाऱ्या बचतीच्या अनेक पटीत खर्च तर होतो पण जवानांची अमुल्य आयुष्येही  गमवावी लागतात ते वेगळेच. कारगिलच्या युद्धात सुमारे ४१३ जवान कामी आले तर ५८६ जवान जखमी झाले.
२.      इंटेलिजन्स विभागाच्या कार्याची महती वेगळी सांगायला नको. द्वितीय महायुद्धात प्रथम जर्मनीची सरशी काय किंवा नंतरच्या काळातील दोस्त राष्ट्राची सरशी काय, दोन्हीत इंटेलिजन्स विभागाचा बहुमोल वाटा होता.
घुसखोरीच्या बाबतीत इंटेलिजन्स नेहमीच्या पेक्षा बराच खालच्या स्थरावर होता. १९८४ सियाचीन युद्धानंतर वचपा काढण्यासाठी जवळच्या कारगिल सारख्या विभागात अशी कारवाई होण्याची शक्यता आय.बी. कडून कधीही सूचित करण्यात आली नव्हती. प्रथम घुसखोरांचा आकडा मात्र १००, काही दिवसानंतर ८०० तर वास्तवात तो हजारात होता. ८०० जणांशी आणि हजारोशी लढणे ह्यात नक्कीच फरक असणार. नव्या टेक्नोलोजीचा अवलंब करणे युध्द तसेच आतंकवादी घुसखोरीच्या संदर्भातही जरुरी आहे. ध्यानात घ्या, ह्या युद्धात प्रतिदिन सुमारे १२,००० आर्टिलरी शेल्स फायर करण्यात आले.
३.      पाकीस्थान हा अण्वस्त्रधारी पण अविचारी शेजारी आहे, गेल्या साठेक वर्षाचा आपला अनुभव आहे कि तो आंतरराष्ट्रीय जनमताचा कोणताही विचार न करता कोणतेही व केव्हाही अविचारी कृत्य करू शकतो. त्यावेळी त्याला ‘ताश्कंद, सिमला, सारखी अग्रीमेटस रोखू शकत नाही. अशा अविचारी कृत्याचा थंड डोक्याने मुकाबला करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.              

४.      कारगिल पासून आपण बोध घेतला पाहिजे कि पाकिस्थानला कल्पना आलेली आहे कि ते भारता बरोबर युद्ध जिंकू शकत नाही. तसेच त्यांची इकॉनॉमिक स्थिती युद्धाचा खर्च पेलण्यास अक्षम आहे. दुसऱ्या शब्दात, पाकीस्थान सरळ सरळ युद्ध करण्यापेक्षा छद्म युध्द करण्याची शक्यता जास्त वाटते, मग ते घुसखोरीच्या, आतंकवादी हल्यांच्या किंवा अन्य अशाच कोणत्याही पद्धतीचा अवलंब करू शकतो. अशा कारवाया वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून केल्या जातील. देशाच्या विविध प्रांतात सुरु असलेला आतंकवाद असेल, आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यासाठी खोट्या नोटा मोठ्या प्रमाणात प्रचलित करण्याची धूर्त चाल असेल, अमली पदार्थाच्या तस्करीद्वारे आमच्या तरुणांना व्यसनाधीन करायचे असेल, वा परस्परांमध्ये जातीय तेढ निर्माण करून सारा एकसंघ समाज भंग करायची योजना असेल. साऱ्या-साऱ्यासाठी आम्ही तयार राहणे जरुरी आहे. कोणत्याही प्रकारची लापरवाही व संतुष्टी चालणार नाही.

५. चीनच्या सीमावर्ती क्षेत्रातील दळणवळण व्यवस्थेला पूरक अशी व्यवस्था निमार्ण कारणे व ती सर्व सिझन्स मध्ये कार्यरत व विश्वसनीय असेल अश्या अत्युच्च दर्जाची असणे अत्यावश्यक आहे. आज काश्मिरात श्रीनगर-लेहला जोडणारा एकमेव महामार्ग क्र.१ आहे. त्यास पूरक आणि पर्यायी महामार्ग निर्मिती करणे जरुरीचे आहे. ह्या सेवा सर्व सीमावर्ती प्रदेशांच्या संरक्षणासाठी जरुरी आहेत.   

     या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून योग्य ती पाउले उचलली पाहिजेत, म्हणजे अशा हल्ल्यातील अनपेक्षिततेचा प्रभाव (surprise effect) कमी होऊन प्रतिहल्ला त्वरित करणे शक्य होईल. युद्ध-सज्जता आणि प्रतिहल्ल्याची कला ह्याबाबतीत इस्राईलचे उदाहरण सर्वोत्तम असेल. शक्य असल्यास मोसाद ह्या त्यांच्या इंटेलिजन्स संघटनेवरील पुस्तक मिळाले तर जरूर वाचावे. सर्वात लाहान पण सर्वात परिणामकारक अशी ती जगातील एकमेव इंटेलिजन्स संघटना आहे.

    आता क्रम आहे ‘सर क्रीक’ बद्दल पुढील जाणून घेण्याचा. तो पर्यत ‘चांगभलं’ ! 

प्रकाश पटवर्धन 

1 comment:

  1. मोसाद बद्दल जाणून घ्यायचं असेल तर 'इस्त्राएलची मोसाद' हे पंकज कालुवाला लिखित पुस्तक जरूर वाचावे. इस्त्राएलचा इतिहास, मोसादने केलेले विविध ऑपरेशन्स यांची माहिती या पुस्तकात आहे

    ReplyDelete