Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, August 25, 2014

1 निसर्ग ! निसर्ग! निसर्ग!


paryavaran
निसर्ग आणि मानव ह्यात एक अविभाज्य असे नाते पुरातनकाला पासून चालत आले आहे व ते
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’
ह्या संत वचनातून मार्मिकपणे दर्शविले आहे. खरच हि सारी सृष्टी, सभोवतालचं प्राणीजगत आणि मानव सर्वार्थाने एकमेकावर अवलंबून नाहीत का?

      निसर्ग म्हणजेच आमच्या अस्तित्वाचा स्रोत, आनंदी, समृद्ध आणि स्वस्थ जीवनाचा ओनामा! झाडे, झुडपे, प्राणीमात्र, इ. सारे आपले नातेवाईकच. त्यांच्या सह-अस्तित्वाकडे कानाडोळा केल्यास निसर्ग तसेच प्राणीमात्राच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवेल. आपल्याला आठवत असेल कि जेव्हा पहिल्यांदा मोबाईल व टॉवर्स आले तेव्हा जणू जादू केल्यागत आश्चर्यकारक पद्धतीने चिमण्या गायब झाल्या होत्या. निसर्गाचे चक्र मानवाच्या कृतींवर अवलंबून असल्याचे हे द्योतक आहे. असे म्हणतात कि माणसाच्या पृथ्वीवर येण्याच्या आधी पासून झुरळे पृथ्वीवर होती. कुत्रे, मांजरी, गायी, इ. प्राणी माणसाचे आयुष्याचे साथीदार आहेत. म्हणूनच सह-अस्तित्व महत्वाचे.

      कोणत्याही प्राण्याचे अस्तित्व निसर्गाच्या – पर्यायाने जमीन, पाणी आणि वायू शिवाय असूच शकत नाही. निसर्ग आणि मानवी अस्तित्व हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत असे म्हणतात हे किती खरे आहे याचा धांडोळा घेऊ या –

      जमीन – प्राणिमात्राला जमीन अन्न, वस्त्र, निवारा तर देतेच पण त्याच बरोबर पाणी खनिजे, खनिज तेल आणि वायूही देते. आम्ही जरी विज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली असली तरी आजही रोटी, कपडा आणि मकान ह्या तीन मुलभूत गरजा मानवी जीवनाला ग्रासून आहेत. आम्हाला जमीन शेती, चराई, जंगल, आणि वन्य-जीवांसाठी लागते तशीच ती शहरीकरण, परिवहन, आणि पर्यावरणासाठी लागते.

      पाणी/जल – प्राणिमात्र अन्नाशिवाय काही महिने जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय तो काही दिवस जीवित राहू शकतो. जगातल्या सर्व संस्कृती पाण्याच्या सानिध्यात उदयास आल्या व उन्नत झाल्या. आजही मानवी समाज जिथे पाणी उपलब्ध आहे तिथेच वाढताना दिसतो. म्हणूनच ‘जल हि जीवन है’ म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. सामान्य माणसाला पाणी पिण्यासाठी, कपडे/भांडी धुण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वैपाकासाठी लागते तसेच ते जल-वाहतुकीसाठी व जल-क्रीडेसाठी ही लागते.

      शरीराच्या विविध क्रियांसाठी पाणी जरुरी असते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे कार्य घाम, मुत्र, इ. द्वारे करण्यासाठी पाणी लागते. पाण्यामुळेच मुख, नाक, त्वचेचा ओलावा राखला जातो.

हवा – मानवी जीवनात हवेचे/वायूचे महत्व अनन्य साधारण आहे. ज्याला आपण हवा/वायू म्हणून सामान्यपणे मानतो व संबोधतो ती वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण आहे. त्यालाच आपण वातावरण असेही म्हणतो. त्याचे नायट्रोजन (७८%), प्राणवायू (२१%) व अर्गोन (१%) हे प्रमुख घटक आहेत. आपल्या सभोवती असलेल्या वातावरणाच्या आवरणामुळे सगळ्या प्राणीमात्रांचे जीवन शक्य झाले आहे. आपण श्वासोश्वासाद्वारे अंदाजे ३५ पौंड वायू दर दिवशी उपयोगात आणतो.

जमीन आणि वातावरण यांच्या घडणीतील महत्वाचा दुवा म्हणजे नायट्रोजन! प्राणवायूची उपयुक्तता सर्वाना माहित आहे. तो अन्नाचे ज्वलनास मदत करतो व कार्बनशी संयोग करून प्राणवायू पुन: वातावरणात सोडतो. कार्बन डाय ओक्साइड वनस्पती शोषून घेतात व फोटो सिन्थेसिसच्या सहायाने कार्बन व प्राणवायू वेगळा करून प्राणवायू वातावरणात पुन: सोडतात.

हे परस्पर-अवलंबित्व आमच्या ऋषी मुनींनी जाणून वातावरण आणि प्राणीमात्रांचा अनुपम असा मेळ घातला ज्यायोगे अनंत काळापर्यंत निसर्ग व प्राणी जगत गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील. देव ह्या संकल्पनेला प्रधान मानून, मध्यवर्ती मानून, त्यांनी वेगवेगळ्या देवांना कोणती विशिष्ट पाने, फुले, फळे आवडतात; देव व त्यांचे वाहन म्हणून विशिष्ट देव व विशिष्ट प्राण्यांच्या जोड्या लावल्या तर समुद्र व पर्वत देवादिकांची निवास-स्थाने केली. ह्या योजनेमुळे मानव त्या वृक्षांचे, प्राण्यांचे व नदी-समुद्राचे संवर्धन करू लागले, नद्यांचे पावित्र्य जपू लागले अन नकळत का होईना निसर्गाचे सानिध्य सुनिश्चित करू लागले. अन सुरु झाला अनंत कालचा सह-अस्तित्वाचा प्रवास!

परंतु मित्रानों, विज्ञानाच्या तुफानात मानव कालांतराने स्वकेंद्रित व स्वार्थी होत गेला. स्वत:च्या सुखसुविधा पलीकडे बघण्याची वृत्ती मागे पडू लागली व निसर्ग त्याचा पहिला बळी ठरला. आता तो मोठ्या गुर्मीत ‘अहं ब्रह्मास्मी’ म्हणू लागला. निसर्गाकडे एक उपयुक्त वस्तू म्हणून बघू लागला व त्याचे अस्तित्व हे मानवाच्या उपभोगासाठी आहे असे मानून मन मानेल तसे वागू लागला. सह-अस्तित्वाचे नाते नजरेआड झाले. जसजसा वातावरणाच्या खच्चीकरणाची मात्रा व वेग वाढू लागला तसतसे मानवावर नैसर्गिक आपतीचे घावही वाढू लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले. विध्वंस अनेक पटीने वाढला तरीही मानव एखाद्या कोलुच्या बैलाप्रमाणे डोळ्यावर झापडं बांधल्यागत विनाशाभोवती फिरतो आहे. ना कशाचा धाक, ना कशाची तमा!

आज निसर्गचक्र बदलताना जाणवते आहे, ऋतूचक्र बदलते आहे. पावसाळा लांबणीवर पडत आहे. कुठे पूर परिस्थिती तर कुठे दुष्काळाच्या झळा, कुठे अनाकलनीय कडे-दरडी कोसळणे तर कुठे वादळे, बर्फाची वादळे! निसर्गाच्या सूचक घंटा ऐकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हा विध्वंस जर थांबवायचा असेल तर निसर्गाचे पुनर्वसन करणे गरजेचे वाटते व त्यासाठी प्रदूषणावर इलाज करावा लागेल. प्रत्येकाने आपापल्या परीने जमेल तेव्हडे, जमेल तसे निसर्ग संवर्धन व पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. एक सामान्य माणूस म्हणून आपण तीन ‘आर’ चा अवलंब करू शकतो – 
१. रिपेअर करणे; २. री-युझ करणे; आणि ३. री-सायकल करणे.
  प्रदूषणाचे मानवी जीवनावरील परिणाम व आपण काय उपाय करू शकतो ह्याचा धांडोळा पुढच्या प्रकरणात घेऊ. 

प्रकाश पटवर्धन 

1 comment:

  1. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, रहिमान पाणी रखिये बिन पाणी सब सून, असे संदेश अनेक संतांनी आम्हाला दिलेत परंतु आम्ही त्यांच्या पासून केवह शिकू हेच कळत नाही.

    ReplyDelete