प्रदूषण –
प्रदूषण
म्हणजे काय? एक छोटासा प्रश्न पण उत्तर मात्र कर्मकठीण! अगदी प्रश्नाच्या एकूण
अक्षराइतके कागद खरडले तरी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढणारे. असो. आपण सामान्य
माणसाशी निगडीत प्रदूषणाचा विचार प्रामुख्याने करू म्हणजे त्याची व्याप्ती
नियंत्रित होईल.
साध्या
शब्दात सांगायचे झाल्यास प्रदूषण म्हणजे निसर्ग वा वातावरणाची हानी होईल अशी
कोणतीही मानवी व नैसर्गिक क्रिया किंवा निसर्गाने मानवी अस्तित्वासाठी पूरक अश्या
ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत, त्याच्या रचनात्मक, लाभप्रद व स्वस्थ उपयोग करण्याच्या
मानवी अधिकारावर गदा आणणाऱ्या बाबी म्हणजे प्रदूषण. मानवी अस्तित्वाच्या तीन
मुलभूत नैसर्गिक गरजांचा – जमीन, पाणी आणि वायू - विचार करू या.
१. जमीन – भौतिक जगात जमिनीचे महत्व अनन्य साधारण
आहे. महाभारतातील कौरव-पांडव युद्ध हे कौरवांनी ‘सुईच्या अग्रावर राहील इतकीही
जमीन’ पांडवांना देण्यास नकार दिल्यामुळे झाले होते, ह्यावरून लक्षात यावे.
जमिनीचे प्रदूषण हे
फार जुने आहे व वर्षानुवर्षे जमिनीच्या गैरवापरामुळे ते उद्भवले आहे. साहजिकच
त्याची व्याप्ती आणि गंभीरता तेव्हडीच भयानक आहे. रचनात्मक, व लाभप्रद कामासाठी
योग्य असलेला जमिनीचा पट्टा बरीच वर्षे तसाच पडीक राहिल्यासही तो ओसाड होतो/ठरतो
अन तो तसाच राहतो. म्हणून अशा जमिनींवर दर पावसाळ्यात सामाजिक वनीकरण सुनिश्चित
करणे गरजेचे आहे.
शहरीकरण,
महामार्गाच्या, धरणाच्या योजनामुळे तसेच कारखान्यासाठी लागणारी जमीन मिळविण्यासाठी
होणारी वृक्षतोड वा ओसडीकरण अशा प्रदूषणास जबाबदार आहे. शहरीकरण व कारखानदारीमुळे
मोठ्या प्रमाणावर सांडपाणी नदी, नाल्यात, तलावात वा समुद्रात सोडले जाते. जमिनीत
झिरपलेले असे पाणी आपल्याबरोबर द्राव्य स्वरुपातील द्रवित प्रदूषके प्रथम जमिनीत व
नंतर तेथून पाण्याद्वारे पिकात शोषली जाऊन, आपले अन्नही प्रदूषित करतात, हे विशेष.
झाडा-झुडपांची मुळे मातीला धरून ठेवतात. वृक्षतोडीमुळे हिरवळ वा वनक्षेत्र कमी झाल्यामुळे
जमिनीची धूप होते, डोंगरावरील मातीचे बॉन्डेज कमी वा नष्ट झाल्यामुळे कडे
कोसळण्याचे प्रकार वाढतात. पावसाचे पाण्याबरोबर सैल झालेली माती पाणी मुरताच
ढासळते व आपली जागा सोडून उतारावरून खाली येते. हिमाचल मधील ढगफुटी व दरडी कोसळण्याच्या
घटना मानवाने स्वार्थापोटी केलेल्या निसर्गाच्या लयलुटीची कहाणीच सांगतात. जसजसे
डोंगर-कडे बोडके होत जातील तसतश्या ढगफुटी, दरडी कोसळणे, पूर येणे इ. घटना वाढत
जातील व त्याची तीव्रताही वाढत जाईल. ती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय-योजना करणे
जरुरीचे आहे.
शेती हा सर्वात
प्राचीन व्यवसाय. वाढत्या जनसंख्येच्या प्रमाणात अन्न-धान्याचे उत्पादन हा एक
प्रकारे मानवाच्या समोरील गहन प्रश्न आहे. मधल्या काळात अधिक उत्पादनाच्या रेट्याखाली
मानवाने पुरातन शेतीची संकल्पना सोडून आधुनिक पद्दतीने शेती करण्यास सुरवात केली.
कोणतीही पद्धती विचारात घ्या, त्याचे काही फायदे तर काही तोटे असतात. आधुनिक शेती
त्याला अपवाद कशी बरे असेल? उत्पादन वाढीच्या बाबतीत हि पद्दत खूपच परिणामकारक
सिद्ध झाली असली तरी तिचे तोटेही तेव्हडेच गंभीर होते. रासायनिक खतांचा व
कीटकनाशकांचा उपयोग कालांतराने वाढत गेला व अतिवापरामुळे जमिनीचा कस कमीकमी होऊ
लागला, त्यात वर्षाकाठी ३-३ पिके घेतल्यामुळे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा
उर्वरित भाग/गाळ जमिनीत रहात गेला व जमिनी प्रदूषित होऊ लागल्या. हीच प्रदूषके
पाण्याबरोबर पिकात शोषली जाऊन आपले अन्नही प्रदूषित करु लागले.
मानवाला दिवसभराच्या
श्रमानंतर विश्रांतीची गरज भासते मात्र अशी गरज त्या जमिनीला का मिळू नये, हा
विचारही त्याच्या मनात येत नाही कारण आजचा मानव निसर्गाला सहचर न मानता आपल्यासाठी
निर्मिलेल्या अनेक वस्तूपैकी एक समजून कोणत्याही गोष्टीचा विधिनिषेध न ठेवता
अक्षरशः ओरबाडतोय. पूर्वीच्या शेतीत पिकांची अदलाबदल केली जायची, शेत-जमिनीच्या
तुकड्यांना एक एक करून आळीपाळीने विश्रांती दिली जायची किवा त्यावर लावलेले गवत वाळल्यावर
मातीत खत म्हणून मिसळले जायचे. अशा त-हेने त्याची पत व कस टिकविण्याचा प्रयत्न
केला जायचा. सर्वार्थाने निसर्गाची सोयरिक केली जात होती, माणसासारखा व्यवहार केला
जात असे. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोळा हा सण. वर्षभर शेतात राबणाऱ्या ह्या
जनावराच्या दो-या, वेसण, इ. सारे जुने टाकून नवे वापरले जायचे, असे सजवलेले बैल
गावभर मिरवणुकीने नेले जात. पुरणाची पोळी त्याला खाऊ घातली जात असे. नारली
पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून श्रीफळ अर्पण केले जाणे हाही त्याचाच एक
भाग. निसर्गाबद्दलची हि कृतज्ञतेची भावना होती. निसर्ग नियमांना प्रमाण मानून
मानवाने आपली प्रगती केली, त्यांना तुडवून नाही.
प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान 0.06o
C ने वाढले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे ग्लेसिअर, हिमशिखरे, इ. वरील बर्फ
वितळण्यास सुरवात झाली आहे. ह्याचा परिणाम नद्यांना पूर येणे, जीव आणि वित्त हानी
होणे, जमिनीचा कसदार असा वरचा शेतीला उपयुक्त थर वाहून जाणे, समुद्राची पातळी
उंचावणे, समुद्राचे भूभागावर अतिक्रमण, असे गहन प्रश्न निर्माण होत आहेत. मुंबई
सारखी शहरे जलमय होण्याचा धोका नाकारता येत नाही.
गेल्या वर्षापासून नेपाळ मधून भारतात येणा-या नद्यांचे जल-स्तर वाढल्याने,
बिहार मधील कोसीसारख्या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत आहेत व त्याच्या
विध्वंसाच्या बातम्या आपण पेपर मध्ये बघत आहोत. उत्तराखंड नंतर आता काश्मीर
घाटीमध्ये गेल्या पन्नास वर्षातील जबरदस्त पूर आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हिमालयातील वितळणा-या बर्फाचा तर हा प्रताप नाही ना?
आपल्या वसाहती, शहरातून निघणारा कचरा व सांडपाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषणास
जबाबदार आहे. अल्युमिनम, प्लास्टिक, लाकूड, कागद, गाड्यात वापरली जाणारी तेले,
इंजिन ओईल, केरोसीन, इ. प्रदूषणास हातभार लावतात. गृहनिर्माण प्रकल्पही जमीन, पाणी
तसेच वायू प्रदुषणास कारणीभूत ठरतात.
अणुभट्ट्यातील किरणोत्सारी पदार्थ दूरगामी परिणाम करतात. विविध कॅन्सरची
शक्यता वाढते. जपान मधील अणुभट्टीच्या अपघाताचे परिणाम आजही जाणवतात.
भारतीय संस्कृती सकाळी उठल्यावर, जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी जन्मभूची ‘समुद्र
वसने देवी......पाद्स्पर्षे क्षमस्वमे’ श्लोकाच्या पठणाद्वारे क्षमा मागायला
शिकवते. निसर्गाच्या सान्निध्यात मानवी जीवन फुलते तर निसर्गाविना ते कोमेजते हे आमचे
पूर्वज जाणत होते. मानवाने केलेल्या प्रदूषणाला कमी करायचे असेल तर आपण खालील कामे
करु शकता -
· पर्यावरणाबद्दल जागरुकता समाजात निर्माण करायला
हवी;
· तीन R चा अवलंब रोजच्या जीवनात करावयास हवा :
-
Reuse – पुन: उपयोग करणे;
-
Recycle- पुन: उत्पादित करणे;
-
Reduce – उपयोग कमी करणे.
· पेकेज्ड वस्तूंचा उपयोग टाळणे व शक्य नसल्यास
कमी करणे. ह्यामुळे प्लास्टिक आवरणाचा कचरा कमी होऊ शकतो;
· शेती नैसर्गिक पद्धतीने रासायनिक खाते व कीटकनाशके
न वापरता करणे;
· आजूबाजूला उघड्यावर घाण न करणे तसेच कचर्याची
योग्य विल्हेवाट लावणे;
· डम्पिंगची जागा गावापासून दूर असावी.
प्रकाश पटवर्धन
निसर्ग ! निसर्ग! निसर्ग!
निसर्ग ! निसर्ग! निसर्ग!