Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, October 12, 2014

0 वॉरेन हेस्टिंग्ज : झुंजार राज्यकर्ता आणि कुशल प्रशासक.


waren hastings
अरविंद जोग यांनी वॉरेन हेस्टिंग्स चा जीवनपट उघडून पाहिला आणि त्यांच्या लक्षात आले कि ज्याची प्रतिमा जनमानसात एखाद्या खलनायकाची बनून राहिली आहे ती तशी नाही. तो एक कुशल नायक होता हे त्यांना जाणवले आणि म्हणून त्यांनी वॉरेन हेस्टिंग्ज  च्या जीवनाचा चरित्रपट साध्या सोप्या गोष्टीरूप शैलीत वाचकांच्या समोर ठेवण्याचा घाट बांधला.
वॉरेन हेस्टिंग्ज अगदी बालपणी पोरका झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच त्याच्या शैक्षणिक घोडदौडीला खीळ बसली. त्याच्या सांभाळ करणाऱ्या पालकांनी त्याला इस्ट इंडिया कंपनीत लेखनिक म्हणून नोकरीला लावले. व तो १७५० मध्ये "लंडन" या जहाजातून भारतात आला. हा लेखनिक भारताच्या गवर्नर जनरल या पदापर्यंत कसा पोहचला, या मार्गात आलेल्या अनेक अडचणींना त्याने कसे धीराने तोंड दिले? हा इतिहास जोगांनी अत्यंत सोप्या भाषेत मांडलेला आहे.
वॉरेन हेस्टिंग्ज ने सर्व प्रथम उर्दू व् पर्शियन भाषा शिकून घेतली. पुढे त्याने भगवतगीतेचे इंग्रजीत भाषांतर करून त्याला छान प्रस्तावना लिहिली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला मुर्शिदाबादच्या दरबारात ब्रिटीश रेसिडेंट म्हणून जावे लागले. तेथे त्याला कलकत्ता कौन्सिलचे काम जवळून बघता आले. त्याच्या लक्षात आले कि कंपनीतील अनेक पदांवरील पदाधिकारी हे आपले खिसे भरण्यात मग्न आहेत.. भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे कि कोणालाही इस्ट इंडिया कंपनीची काळजी नाही. हे चित्र बघून त्याला मनोमनी अत्यंत वाईट वाटत असे. पुढे तो १७७२ मध्ये हिंदुस्तानचा पहिला गवर्नर जनरल झाला. परंतु हे पदही एखाद्या सह्याजीराव सारखे होते त्याला खास अधिकार नव्हते. कौन्सिल सदस्यांना विशेष अधिकार होते व हे सर्व स्वतःचे खिसे भरून गब्बर होण्याच्याच प्रवृतीचे होते. त्यामुळे ते वॉरेन हास्टिंग्जला प्रत्येक चांगल्या निर्णयात विरोध करीत असत. ते त्याची निर्भत्सना करण्याचा एकही क्षण सोडत नसत. नंद्कुमाराचे प्रकरण, अवधच्या बेगामांवरील अत्याचार, चैतसिंग प्रकरण  अशा  अनेक प्रकरणात हेस्टिंग्जवर आरोप ठेवून कशाप्रकारे बदनाम करून कावेबाज पणे त्याला अडकवण्याचे प्रयत्न झाले ते कळते. वॉरेन हेस्टिंग्ज चे प्रयत्न असायचे कि कशा प्रकारे कंपनीची प्रतिष्ठा जनमानसात वाढेल. मेकौले म्हणतो कि , हेस्टिंग्जहून  अधिक चांगले, अधिक कार्यक्षम गवर्नर जनरल भारताला लाभले असतील, पण हिंदुस्तानी जनतेत इतका लोकप्रिय असलेला गवर्नर जनरल झाला नाही.
जर क्लाइव ने बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला तर वारेन ने तो अधिक मजबूत केला. क्लाइवने  आपल्या दुसर्या आमदानीत कायदे करून भ्रष्टाचार , लाचलुचपत तसेच इंग्रज अधिकाऱ्यांच्या खाजगी व्यापार थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु निव्वळ कायदे करून जनता सुधारत नाही. कायद्याप्रमाणे वागायची जनतेला सवय लागावी लागते आणि यासाठी राज्यकर्त्यांनी आपल्या वागणुकीतून जनतेला आदर्श घालून द्यावा लागतो. या गोष्टीसाठी  हेस्टिंग्ज इतका दूसरा योग्य माणूस सापडला नसता.
वॉरेन हेस्टिंग्ज ने बंगालमध्ये अनेक सुधारणा केल्या, त्याने व्यवस्थित अभ्यास करून शेतसाऱ्याचे  दर निश्चित केले. शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरीच पावले उचलली. डक सेवा सुरु केली. राज्यकारभाराचा खर्च कमी करण्यासाठी आर्थिक सुधारणा केल्या.

१७८५ मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज  इंग्लंडला परतला. त्यानंतर त्याच्या विरोधकांनी त्याच्यावर कारवाया केल्या, त्याच्यावर पार्लमेंट मध्ये आरोप केले. त्यावर चौकशी आयोग नेमला गेला. पुढे तो दोषमुक्त झाला.
एकंदरीत वॉरेन हेस्टिंग्ज च्या जीवनाचा वादळी पट लेखकाने शिस्तबद्ध रीतीने लहान लहान प्रकरणातून उलगडून दाखवला आहे.

  मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस,
लेखक : अरविंद वामन जोग,
मूल्य : ३०० रुपये
पृष्ठे : ३२०.

दत्तात्रय पटवर्धन
 

No comments: