Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, October 31, 2014

0 शायरीचा गुलदस्ता.भाग ९


"शमा आणि परवाना या जोडगोळीने उर्दू शायरीत धुमाकूळ घातला आहे. "शमा" हे स्त्री सौंदर्याचे प्रतिक, जितके मोहक तितकेच दाहक! शम्मच्या ठाई सौंदर्याने निर्माण झालेला अभिमान तर परवाना तितकाच दिलदार, जीव देण्यासही तयार असलेला.

पूर्वीच्या काळी शायरासमोर प्रज्वलित शमा ठेवली कि तो शायर काव्य गायनास सुरवात करीत असे अशी प्रथा होती. शमा म्हणजे ज्योत तर परवाना म्हणजे पतंग! त्यांचं अतूट असं नातं; जेथे शमा तेथे  परवाना! आता नातिक लखनवीचा हा शेर बघा –

मुहब्बत-आश्ना दिल मजहबो-मिल्लत को क्या जाने,
हुई रौशन जहाँ शम्अ परवाना वहीं आया।

-नातिक लखनवी
1.मुहब्बत-आश्ना – प्रेमी, प्रेम करणारे
2. मजहबो-मिल्लत - धर्म आणि संप्रदाय
     परवाना आणि जुगुनू दोन्हीही पतंगाचीच रूपं! पण दोघांमधील वैचारिक भिन्नता शायराने मोठ्या ताकदीनं वर्णिली आहे. परवान्याची  प्रकाशाकडे झेप. तालिब म्हणजे याचक, इच्छुक, मागणारा.  तर दुसरा म्हणजे जुगुनु स्वयंप्रकाशी. सरापा  म्हणजे नखशीकांत, आपादमस्तक, नितांत असा हा जुगुनु. आता प्रश्न पडतो कि प्रेमात स्वताला झोकून समर्पण कराव कि जुगुनु प्रमाणे स्वयंप्रकाशी राहावं. एखाद्या नवाबा प्रमाणे! इक्बालच्या ह्या पश्नच उत्तर आपणही शोधत असाल – पतंगाप्रमाणे मागेपुढे न पाहता प्रकाशाकडे झेप घेणे वा स्वयंप्रकाशी होऊन प्रकाशाची नेहमीसाठी प्राप्ती श्रेयस्कर?

परवाना इक पतंगा, जुगुनु भी इक पतंगा 
वो रोशनी का तालिब ये रोशनी सरापा  ||

'शाद' ही इक्बाल प्रमाणे विचार करताना जाणवतात. त्यांना वाटते कि जर परवाने दुसऱ्याच्या प्रकाशाकडे (कीर्ती, प्रगती, ऐश्वर्य इ.) कडे आकर्षित न होता  स्वतःच स्वयंप्रकाशित झाले तर ते स्वत: आणि शम्म अल्पायुषी होणार नाहीत. येव्हडेच नव्हे तर ते आपल्या आयुष्यात निखार आणू शकतील. 

पराई आग मे जलते न कभी परवाने 
जो अपनी आग मे जलकर निखर गये होते || 

     हा पतंगा ज्योतीच्या प्रेमात पडतो आणि प्राणार्पण करतो त्यामुळे त्याचं प्रेम, त्याग सर्वाना दिसून येतं त्यामुळे सर्वजण म्हणतात

इश्क क्या चीज है पूछिए परवाने से 
जिंदगी जिसको मयस्सर हुई जल जाने से || 

मयस्सर : मिळाली 

 प्रेमात वास्तविक दोघेही जळतात, मिलनाच्या वाटेवर आनंदाने नष्ट होणे पसंद करतात. परंतु ह्या अमूर्त प्रेमाची कदर ती कोणाला? काहीनां परवाना प्रकाशाकडे आकर्षित  होऊन शहीद होतो दिसतो म्हणून ते परवान्याला खरा प्रेमी मानातात, तर काहीना निरंतर शम्म जळताना दिसते. काही परवान्याची बाजू घेताना दिसतात तर काही शम्मची! हि शायराना-जुगलबंदी मोठी लाघवी आहे.  

'जौक' सारख्या शायराच लक्ष जातं ते शम्मच्या निरंतर जळण्याकडे व तो म्हणतो 
शमा भी  कम नहीं कुछ इश्क में परवानेसे, 
जान  देता है अगर वो तो ये सर देती है.||

      परवाना तर एका क्षणात शहीद होतो परंतु शम्मा तर त्याला आकृष्ट करण्यासाठी आधी जळते आणि परवाना  प्रेमाग्नित जळल्यावर त्याच्या विरहात रात्रभर जळत राहते.

     फातमा बेगम म्हणते

शमा ने जलकर  कहा ये परवाने से 
रातभर मै  भी जली हु, तेरे जल जाने से ||
                                                 
‘आर्जू’ लखनवी समोर मोठा गहन प्रश्न उभा थकलेला दिसतो आहे. हे प्रेम म्हणजे अफलातून रसायन आहे कि जेथे रोग आणि औषध एकच आहे. असं नसत तर जळणारा परवाना पाण्यात जाऊन नसता का पडला? -

उल्फत भी अजब शै है, जो दर्द वही दरमां,
पानी में नहीं गिरता जलता हुआ परवाना।

-'आर्जू' लखनवी

1.दरमां - दवा, इलाज, उपचार 

साकिब लखनवीच्या समोर वेगळीच समस्या आहे. हुस्न आणि इश्क़ाची हि जादू वा माया विचित्र अशी आहे, ज्यात इकडे दीप म्हणजे हुस्न परेशान तर तिकडे परवाना म्हणजे इश्क़ परेशान! दोघेही प्रेमाग्नित जळत आहेत -

हुस्न और इश्क का नैरंग खुदा ही जाने,
शम्अ जलती है कि दिल जलता है परवाने का।

-साकिब लखनवी

1.नैरंग -  माया, जादू 

वरील सगळ्या प्रश्नांना अवघ्या चार ओळीत देतानां अकबर इलाहाबादी म्हणतात
इस अंजुमन में आकर राहत नसीब किसको,
परवाना भी जलेगा और
शम्म भी जलेगी,
जन्नत बना सकेगा हरगिज न कोई इसको,
दुनिया यूँ ही चली है 'अकबर' यूँ ही चलेगी।
-अकबर इलाहाबादी

1.अंजुमन - महफिल, बज्म

     ह्या जगात येणारा प्रत्येक जण ‘राहत’ शोधतोय. शम्म काय अन परवाना काय, सारे ह्याच मार्गावरून आले अन ह्याच मार्गाने जाणार! अगदी स्वर्ग बनवण्याचे प्रयत्नही असेच सुरु राहणार. शेवटी हि दुनिया आजपर्यंत अशीच होती अन अशीच पुढेही राहणार.

दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव 

शायरीचा गुलदस्ता : भाग ६
 शायरीचा गुलदस्ता भाग ५
 शायरीचा गुलदस्ता भाग ४
 शायरीचा गुलदस्ता भाग ३
 शायरीचा गुलदस्ता. भाग २
 शायरीचा गुलदस्ता. भाग १
 

No comments: