Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label कबीर. Show all posts
Showing posts with label कबीर. Show all posts

Tuesday, November 18, 2014

0 कबीराचे दोहे भाग 14


इसाप हा झांथस च्या घरी स्वयंपाकी होतो. त्याकाळी गुलाम ठेवले जात असतं. इसाप हा असाच झांथस चा गुलाम होता. अत्यंत बुद्धीमानी, कमी उंचीचा व दिसायला अगदी कुरूपच. एके दिवशी झांथस कडे त्याचा मित्र येतो. झांथस इसापला म्हणाला कि आज माझा मित्र आलेला आहे त्याच्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ बनवशील. जेवणाची वेळ झाली तेव्हा झांथस इसापला म्हणाला कि वाढायला सुरवात कर.. इसाप वाढायला लागतो आणि झांथस ते पाहून थक्कच होतो. काय केले असेल या इसापने? त्याने सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे. यावर झांथस म्हणाला कि, इसाप हे काय सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे?
यावर इसाप म्हणाला कि, जगात जीभे एव्हडी उत्कृष्ट वस्तू दुसरी कोणतीच नाही आणि तुम्ही मला सर्वात उत्कृष्ट पदार्थ करायला सांगितले होते.
झांथस काहीच न बोलता शांत बसतो. मग रात्रीच्या भोजनासाठी सर्वात निकृष्ट पदार्थ बनवण्यास सांगतो. रात्र होते आणि दोघेजण जेवायला बसतात. पुन्हा पाहतात तो काय? पुन्हा बोकडाच्याच जीभा. यावर झांथस इसापकडे एक कटाक्ष टाकतो. त्याची प्रष्णरूपी नजर इसापला कळते व तो म्हणतो कि या जगतात जीभे एव्हडी वाईट गोष्ट काहीच नसेल. जीभच सर्वात निकृष्ट आहे.
बरोबर आहे कबीर दासजी म्हणतात,

कुटील वचन सबसे बुरा जासे होत न हार,
साधू वचन जल रूप है, बरसे अमृतधार. (कबीर दास )

या जिभेतुन जेव्हा कटू वचन बाहेर पडतात त्यावेळेस कलह निर्माण होतो परंतु ज्यावेळेस याच जिभेतुन प्रेमाचे स्नेहाचे शब्द बाहेर पडतात तेव्हा हीच जीभ मात्र मैत्री जोडते. हि जीभच आहे जी मैत्री जोडते आणि मैत्री तोडते. "अंधे का बेटा अंधा " हे शब्द जेव्हा या जिभेतुन पडतात तेव्हाच महाभारताच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जिभेला झालेली जखम तर बरी होते परंतु जीभे मुळे झालेली जखम बरी होतं नाही.
एक संस्कृत सुभाषित सुद्धा हेच सांगते,

वाग्माधुर्यात सर्वलोकप्रियत्वम, वाक्पारुश्यात सर्वलोक अप्रियत्वम,
किंवा लोके कोकीलेनोपकार: , किंवा लोके गर्दाभेणाप्रकार: ||

 मधुर बोलणारे सर्वांना प्रिय होतात. कठोर वचनाने अप्रिय होतात. कोकिळेने जगावर असे कोणते उपकार केलेले आहेत तरी तो सर्वांना आवडतो आणि गाढवाने कुणाचे काय वाईट केले कि ते कोणालाच आवडत नाही. या सर्वांच एकच कारण आहे ती म्हणजे जीभ. म्हणूनच समजदार माणसे म्हणतात "खाताना आणि बोलताना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे.

दत्तात्रय पटवर्धन

Monday, July 21, 2014

0 शायरीच्या दालनात 2


आता निदा फाजलींच्या हा शेर पाहू. ते म्हणतात –

यहीं है जिंदगी कुछ ख्वाब, चंद उम्मिदें
इन्ही खिलोनोसे तुम भी बहल सको तो चलो I

हे आयुष्य घालवण्यासाठी, विरंगुळयासाठी काही तरी हवेच मग हि स्वप्ने असोत वा आशा-आकांक्षा! लहान मुलाना जशी खेळणी लागतात तशी! सारी स्वप्ने अन आशा-आकाक्षांचा खेळ, ज्याला जमला तो जिंकला, न जमला तो हरला.

‘अज्ञात’ शायर सरळ फिलोसोफिकल होत म्हणतो-

ए आशिक जिंदगी क्या है
जिंदगी तखल्लुस है मुहब्बतका I
( १. टोपण नांव – Nickname)

जीवन सफल करण्यासाठी, आपण कबीरदासजींचा ‘ढाई आखर प्रेमका’ उपदेश पाळला पाहिजे, कारण प्रेम, मुहब्बत म्हणजेच जीवन आहे, प्रेमाने सर्व व्यवहार करा व यशस्वी व्हा.

‘असर’ लखनवी मात्र आपल्यालाच मोठ्या खुबीने असा प्रश्न विचारतात कि आपले उत्तरच आपणास उपदेश असेल. हे कसे ते बघू या -


किसी के काम न आए तो आदमी क्या है,
जो अपनी ही फिक्र में गुजरे वह जिन्दगी क्या है?
-'असर' लखनवी

देवा, खरच अश्या आयुष्याचा, अश्या जीवनाचा उपयोग तो काय जर ते आयुष्य वा जीवन दुसऱ्याच्या कारणी, सत्कारणी लागले नाही. साऱ्या जीवनभर आपलीच चिंता करीत राहिलो, स्वत: बद्दल विचार करीत राहिलो तर उपयोग तो काय? एकीकडे सामाजिक प्राणी म्हणायचे अन दुसरीकडे स्वत:च्या पलीकडे विचार सुद्धा करायचा नाही?

तर ‘अज्ञात’ शायर सरळ सरळ आम्हाला उपदेश करतात –

किजीये बर्दाश्त दोनो सुरतें
जिंदगी नगमा१ भी है, नौहां२ भी है I
(१.गीत, २.शोक)

जर आपल्या हाती, आपल्या काह्यात, जन्मणे नाही वा मरणे नाही; कधी हे जीवन संगीतमय, सुस्वर असते तर कधी ते कर्कश्य वा असह्य होते! मर्त्य मानवाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. मग ह्या दोन्हीही स्थिती सहन करण्या ऐवजी दुसरा पर्याय तो कोणता! दूरदर्शी, बुद्धिमान माणसे म्हणून ह्या दोन्हीही स्थितीत समाधानी राहतात.

राणा सहरी मात्र त्या परमात्म्याला साकडं घालताना म्हणतात कि तू दिलेलं सारं सारं मी नम्र पणे स्वीकारतो. तू दिलेली सर्व दु:खे, त्रास, प्रश्न, इ मी साहण्यास तयार आहे. तू मला माझं अंतिम गंतव्य नको देऊस, काळोखात पथदर्शक दिवा देऊ नकोस, पण न चुकता जीवनाची लढाई लढण्याची हिम्मत तरी दे, काडीचाच कां होईना आसरा तरी दे, ज्यामुळे लढाईला बळ मिळेल.

मंझील न दें, चराग न दें, हौसला तो दें,
तिनके का ही सही, मुझे आसरा तो दें I 
प्रकाश पटवर्धन 


मागे                                                           पुढे

Friday, July 18, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १०

माझ् लहानपण कुंभारवाड्यात गेले. तेथे कुम्भारांकडे गाढवे असायची जी प्रामुख्याने नदीवरून माती आणत. रात्री कुंभार दोन गाढवांना एकमेकांना बांधून ठेवत अन आश्चर्य असे की सकाळी गाढवे खुंटीला बांधली नसतांही गाढवं तेथेच दिसत, ती कुठेही जात नसत.. आम्हाला खूपच आश्चर्य वाटायचे. एक दिवस तर बाप्याने कुंभार काकाला विचारलेच. गाढवांना खुंटीला  न बांधता एकमेकांना बांधतात. आणि गाढवे रात्रभरात कुठेही जात नाहीत, हे कसे. कुंभार काका बाप्याला म्हणाला, बाप्या, ती गाढवं आहेत. खुंटीला बांधलीत  तर खुंटी सुद्धा तोडून पळतील परंतु एकमेकांना बांधलीत तर  कुठेही जाणार नाहीत. कारण एकाने  उजवीकडे ओढले  तर दुसरा डावीकडे ओढेल अन दोघेही कुठेही न जाता तेथेच राहतील.
आपलीही अशीच स्थिती आहे. आयुष्यभर एकमेकांशी बांधलेलो असतो, एकत्र राहण्याशिवाय तरुणोपाय नाही हे माहित असूनही दोघेही कोणत्याही प्रश्नावर सहमत होत नाही, वादविवाद करण्यात धन्यता मानतो. थांबण्याची तयारी नसते, माझे तेच खरे, म्हणत भांडणात रस घेतो, प्रसंगी एकमेकांवर चिखलफेक करू लागतो. कबीरदास म्हणतात,

पखा पखी  के पेखने, सब जगत भुलाना  
निरपख होई हरि भजे, सो साध सयाना.


आम्ही पक्ष विपक्ष करत बसतो, - कोणी हिंदूचा पक्षधर तर कोणी मुसलमानांचा, कोणी जैनांचा तर कोणी अन्य कोणाचा! आम्ही विसरतो कि निरपेक्षपणे सत्कर्म केल्यास उशिरा का होईना फळ-प्राप्ती होते.  
 एकदा एक युरोपियन विचारक महात्मा गांधीना भेटण्यास आला. तो महात्मा गांधीना म्हणाला, मी तर क्रिश्चन. मी बायबल वाचलंय, मला बायबल पूर्णपणे समजलंय मध्यंतरी मी गीतेचा अभ्यास केला व गीता मला खूप आवडली. मी गीता वाचून इतका प्रभावित झालो कि मला वाटते मी हिंदू धर्म स्वीकारावा. महात्मा गांधी त्यास म्हणाले, " तु परत  जा आणि बायबल चा अभ्यास अजूनही कर. तुला न बायबल समजले आहे न गीता".  ज्याला खरोखरच बायबल वा गीतेचा अर्थ समजेल तो  कबीरदासजीच्या  म्हणण्यानुसार निरपेक्ष होईल, त्याच्या लेखी एकाच परमात्मा असेल, तो सच्चा साधू म्हणून ओळखला जाईल.  
कबीरदास जी म्हणतात कि  पक्षविरहित सत्य काय आहे ते समजलो व सत्याची कांस निरपेक्ष राहून हरीभक्तीच्या स्वरूपात धरली तर खऱ्या अर्थाने ‘सयाना’ म्हणजेच समजूतदार होऊ. हरिभक्ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही हिंदू, मुसलमान, आस्तिक, नास्तिक. इ च्या पल्याड जाता. याच पक्ष विपक्षाच्या विवादाला कंटाळून एक उर्दू शायर म्हणतो,
कोई मंदिर मे जा बैठे ,  कोई मस्जिद मे जा बैठे,
 कोई गिरीजा घर मे जा बैठे.   
अरे हम इंसानो से अच्छे तो परिंदे है,   
कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे.

 दत्तात्रय पटवर्धन

Saturday, June 28, 2014

2 कबीराचे दोहे : भाग 8

जलाल्लुद्दिन रुमी तेराव्या शतकातील पर्शियातील एक सुप्रसिद्ध सुफी संत आणि कवी. तो 'बल्ख' प्रदेशातला म्हणजेच सध्याचा अफगाणिस्थानचा. आपल्या एका कवितेत तो म्हणतो. 

प्रियकराने दरवाजा ठोठावला आणि आतून प्रेयसीचा आवाज आला 'कोण आहे?" 
त्यावर प्रियकर म्हणाला, " मी आहे".  प्रियकराला वाटले आता दरवाजा उघडला जाईल. परंतु आत एक भीषण शांतता पसरली. प्रियकर बाहेर वाट  पाहत उभा राहिला. थोड्या वेळाने त्याने  पुन्हा दरवाजा वाजवला. आतून काहीच उत्तर आले नाही..पुन्हा वाजवला  पण उत्तर नाही. प्रियकर आता दरवाजा उघडला जाईल म्हणून वाट पाहत उभा राहिला. परंतु काहीही उपयोग झाला नाही. आता तर तो जोरजोरात ओरडून सांगू लागला, प्रिये, मी आहे दरवाजा उघड. थोड्या वेळाने आतून आवाज आला. येथे दोन जण सामावू शकत नाहीत. आता त्याच्या लक्षात आले कि दरवाजा काही उघडला जाणार नाही. 

प्रियकर मागे फिरला. विचारात गुंग. त्याला कळत नव्हते 'येथे दोन जण सामावू शकणार नाहीत' म्हणजे काय? विचार करत  करत उत्तराच्या शोधात जंगलात भटकला, साधना केली, उपासना केली, अनेक अग्निदिव्यातून  गेला. आणि एक दिवशी परत आला.  दरवाजा वाजवला. आतून तोच आवाज आला, 'कोण आहे?"  प्रश्न  तोच होता परंतु उत्तर बदलेल होत. उत्तर आलं 'तूच आहेस'. आणि एकदम दरवाजा उघडला. 


कबीरदासजी  म्हणतात, 
प्रेम गली अति संकरी ता  में  दो न समाय, 
जब मै था तब हरी नाही, अब हरी है मै नाही. || 

कबीरदासजी म्हणतात, या प्रेमाच्या मार्गात दोघे कधीच सामवू शकत नाहीत. 'तू' आणि  'मी ' कधीच एकत्र नांदू शकत नाहीत. प्रेम तेव्हांच होत जेव्हा ' मी'  लुप्त होतो. संपूर्ण समर्पण होऊन 'मी ' अस्तित्वहीन होत. समुद्रात पाण्याचा थेंब  पडल्यावर समुद्राचे पाणी व ‘तो’ थेंब वेगवेगळे दाखवता येईल कां? पाण्याचा तो थेंब अन समुद्राचे पाणी एकजीव होते. त्या पाण्याच्या थेंबाचे स्वतंत्र अस्तित्वच नाहीसे होते. समुद्राशी एकजीव व्हायला त्या थेंबाला त्याचं 'मी' पण व 'स्वत्व’ सोडावं लागत. समुद्रात पाण्याचा थेंब आहे परंतु त्याने आपल्या वेगळे पणाचा त्याग केलाय. समुद्र आहे तेव्हा पाण्याचा थेंब नाही आणि थेंब आहे तेव्हा समुद्र नाही.
 
परमात्म्याची भक्ती करतांना, त्याच्या ठायी पूर्ण समर्पण असावे लागते. त्या सर्वेश्वराची सेवा करतांना सर्वसंग परित्याग करावा लागतो, आपपरभावाची तिलांजली द्यावी लागते. परमात्म्याकडे नेणारा मार्ग ‘संकरी’ म्हणजे निमुळता आहे कारण तेथून एका वेळी एकच जण जाऊ शकतो. म्हणून संतसज्जन म्हणतात हे सारे मानवीय बंध येथेच सोडा, मोकळे व्हा, एकट्यानेच पुढचा प्रवास करायची तयारी करा, म्हणजे हाच मार्ग प्रशस्थ होईल. आपण आनंदाने व सहजपणे जगदिशाच्या पायी रहाल.

 दत्तात्रय पटवर्धन 
 

Thursday, June 12, 2014

3 कबीराचे दोहे : भाग ७

 बाप्याबरोबर मी असाच भटकंती करीत होतो, गप्पांमध्ये रंगलो होतो, किती अंतर चालून आलो ते गप्पांमुळे कळलेच नाही. एकदम थकवा जाणवला म्हणून एके ठिकाणी बसलो. गप्पा सुरूच होत्या. बाप्या असल्यावर विषय अमाप! तेव्हड्यात बाप्याचे लक्ष खजुराच्या झाडाकडे गेले. बाप्या म्हणाला चढतो वर, खजूर तोडून खाऊ. 
मीही होकार भरला. बाप्या झाडावर चढायला तर लागला पण तो जसजसा वर जायला लागला तसतशी भीती वाटू लागली - पाय सटकला तर, चक्कर आली तर? खजुर तर नाही वरून पाय प्लास्टरमध्ये. तो मनातल्या मनात देवाची करुणा मागू लागला.
 
आपणही बाप्यासारखेच करत असतो नाही - संकटात देवाचे स्मरण करतो, देवाकडून काही अपेक्षा असली  कि प्रार्थना करतो. बाप्याही तेच करत होता. म्हणाला, “ देवा, खजूर तोडून सुरक्षित खाली पोहचू दे, मी तुझ्या मंदिरात ५ रुपये दान करेल. बाप्याला हुरूप आला, आता तर देवाजवळ प्रार्थना केली होती. पुन्हा सरसर झाडावर चढू लागला. जसा खजूरा जवळ पोहचू लागला त्याच्या  मनात विचार आला. प्रयत्न मी करतोय, जोखीम मी घेतोय, आणि मी देवाला ५ रुपये चढावा का चढवू?  जसा हा विचार त्याच्या मनात आला बाप्या धडामकन खाली पडला. तशातही आकाशाकडे पाहून म्हणतो, " अरे देवा, थोडी गम्मतही सहन होत नाही? मी तर गमतीने म्हणालो होतो." "अरे (खजूर मिळाले असते) मी तर ५ काय १० रुपये चढवणार होतो.

कबीरदासजी म्हणतात,
 फल कारण सेवा करे, करे न मनसे काम | 
कहे कबीर सेवक नही, चहे चौगुना दाम || 

        मनुष्य सेवा  करतो, देवाची प्रार्थना करतो ती फक्त बदल्यात काही मिळण्याच्या उद्देशाने. रोज देवाला प्रसाद चढवतो, भोग चढवतो तोही देव खात नाही हे माहित असते म्हणून. देवाने जरी चुकून कां होईना थोडासा प्रसाद खाल्ला तर... मनात भाव नसतो, भक्ती नसते. सारा स्वार्थाचा मामला! कबीरदास म्हणतात असा मनुष्य सेवक होऊच शकत नाही कारण तो त्या सेवेच्या बदल्यात चौपट फळाची अपेक्षा करतात.