Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, July 18, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १०

माझ् लहानपण कुंभारवाड्यात गेले. तेथे कुम्भारांकडे गाढवे असायची जी प्रामुख्याने नदीवरून माती आणत. रात्री कुंभार दोन गाढवांना एकमेकांना बांधून ठेवत अन आश्चर्य असे की सकाळी गाढवे खुंटीला बांधली नसतांही गाढवं तेथेच दिसत, ती कुठेही जात नसत.. आम्हाला खूपच आश्चर्य वाटायचे. एक दिवस तर बाप्याने कुंभार काकाला विचारलेच. गाढवांना खुंटीला  न बांधता एकमेकांना बांधतात. आणि गाढवे रात्रभरात कुठेही जात नाहीत, हे कसे. कुंभार काका बाप्याला म्हणाला, बाप्या, ती गाढवं आहेत. खुंटीला बांधलीत  तर खुंटी सुद्धा तोडून पळतील परंतु एकमेकांना बांधलीत तर  कुठेही जाणार नाहीत. कारण एकाने  उजवीकडे ओढले  तर दुसरा डावीकडे ओढेल अन दोघेही कुठेही न जाता तेथेच राहतील.
आपलीही अशीच स्थिती आहे. आयुष्यभर एकमेकांशी बांधलेलो असतो, एकत्र राहण्याशिवाय तरुणोपाय नाही हे माहित असूनही दोघेही कोणत्याही प्रश्नावर सहमत होत नाही, वादविवाद करण्यात धन्यता मानतो. थांबण्याची तयारी नसते, माझे तेच खरे, म्हणत भांडणात रस घेतो, प्रसंगी एकमेकांवर चिखलफेक करू लागतो. कबीरदास म्हणतात,

पखा पखी  के पेखने, सब जगत भुलाना  
निरपख होई हरि भजे, सो साध सयाना.


आम्ही पक्ष विपक्ष करत बसतो, - कोणी हिंदूचा पक्षधर तर कोणी मुसलमानांचा, कोणी जैनांचा तर कोणी अन्य कोणाचा! आम्ही विसरतो कि निरपेक्षपणे सत्कर्म केल्यास उशिरा का होईना फळ-प्राप्ती होते.  
 एकदा एक युरोपियन विचारक महात्मा गांधीना भेटण्यास आला. तो महात्मा गांधीना म्हणाला, मी तर क्रिश्चन. मी बायबल वाचलंय, मला बायबल पूर्णपणे समजलंय मध्यंतरी मी गीतेचा अभ्यास केला व गीता मला खूप आवडली. मी गीता वाचून इतका प्रभावित झालो कि मला वाटते मी हिंदू धर्म स्वीकारावा. महात्मा गांधी त्यास म्हणाले, " तु परत  जा आणि बायबल चा अभ्यास अजूनही कर. तुला न बायबल समजले आहे न गीता".  ज्याला खरोखरच बायबल वा गीतेचा अर्थ समजेल तो  कबीरदासजीच्या  म्हणण्यानुसार निरपेक्ष होईल, त्याच्या लेखी एकाच परमात्मा असेल, तो सच्चा साधू म्हणून ओळखला जाईल.  
कबीरदास जी म्हणतात कि  पक्षविरहित सत्य काय आहे ते समजलो व सत्याची कांस निरपेक्ष राहून हरीभक्तीच्या स्वरूपात धरली तर ऱ्या अर्थाने ‘सयाना म्हणजेच समजूतदार होऊ. हरिभक्ती तेव्हाच होते जेव्हा तुम्ही हिंदू, मुसलमान, आस्तिक, नास्तिक. इ च्या पल्याड जाता. याच पक्ष विपक्षाच्या विवादाला कंटाळून एक उर्दू शायर म्हणतो,
कोई मंदिर मे जा बैठे ,  कोई मस्जिद मे जा बैठे,
 कोई गिरीजा घर मे जा बैठे.   
अरे हम इंसानो से अच्छे तो परिंदे है 
कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे.

 दत्तात्रय पटवर्धन

No comments: