Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, August 25, 2014

1 निसर्ग ! निसर्ग! निसर्ग!


paryavaran
निसर्ग आणि मानव ह्यात एक अविभाज्य असे नाते पुरातनकाला पासून चालत आले आहे व ते
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’
ह्या संत वचनातून मार्मिकपणे दर्शविले आहे. खरच हि सारी सृष्टी, सभोवतालचं प्राणीजगत आणि मानव सर्वार्थाने एकमेकावर अवलंबून नाहीत का?

      निसर्ग म्हणजेच आमच्या अस्तित्वाचा स्रोत, आनंदी, समृद्ध आणि स्वस्थ जीवनाचा ओनामा! झाडे, झुडपे, प्राणीमात्र, इ. सारे आपले नातेवाईकच. त्यांच्या सह-अस्तित्वाकडे कानाडोळा केल्यास निसर्ग तसेच प्राणीमात्राच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवेल. आपल्याला आठवत असेल कि जेव्हा पहिल्यांदा मोबाईल व टॉवर्स आले तेव्हा जणू जादू केल्यागत आश्चर्यकारक पद्धतीने चिमण्या गायब झाल्या होत्या. निसर्गाचे चक्र मानवाच्या कृतींवर अवलंबून असल्याचे हे द्योतक आहे. असे म्हणतात कि माणसाच्या पृथ्वीवर येण्याच्या आधी पासून झुरळे पृथ्वीवर होती. कुत्रे, मांजरी, गायी, इ. प्राणी माणसाचे आयुष्याचे साथीदार आहेत. म्हणूनच सह-अस्तित्व महत्वाचे.

      कोणत्याही प्राण्याचे अस्तित्व निसर्गाच्या – पर्यायाने जमीन, पाणी आणि वायू शिवाय असूच शकत नाही. निसर्ग आणि मानवी अस्तित्व हे दोन्ही पर्यायवाची शब्द आहेत असे म्हणतात हे किती खरे आहे याचा धांडोळा घेऊ या –

      जमीन – प्राणिमात्राला जमीन अन्न, वस्त्र, निवारा तर देतेच पण त्याच बरोबर पाणी खनिजे, खनिज तेल आणि वायूही देते. आम्ही जरी विज्ञानाच्या सहाय्याने कितीही प्रगती केली असली तरी आजही रोटी, कपडा आणि मकान ह्या तीन मुलभूत गरजा मानवी जीवनाला ग्रासून आहेत. आम्हाला जमीन शेती, चराई, जंगल, आणि वन्य-जीवांसाठी लागते तशीच ती शहरीकरण, परिवहन, आणि पर्यावरणासाठी लागते.

      पाणी/जल – प्राणिमात्र अन्नाशिवाय काही महिने जिवंत राहू शकतो पण पाण्याशिवाय तो काही दिवस जीवित राहू शकतो. जगातल्या सर्व संस्कृती पाण्याच्या सानिध्यात उदयास आल्या व उन्नत झाल्या. आजही मानवी समाज जिथे पाणी उपलब्ध आहे तिथेच वाढताना दिसतो. म्हणूनच ‘जल हि जीवन है’ म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. सामान्य माणसाला पाणी पिण्यासाठी, कपडे/भांडी धुण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वैपाकासाठी लागते तसेच ते जल-वाहतुकीसाठी व जल-क्रीडेसाठी ही लागते.

      शरीराच्या विविध क्रियांसाठी पाणी जरुरी असते. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्याचे कार्य घाम, मुत्र, इ. द्वारे करण्यासाठी पाणी लागते. पाण्यामुळेच मुख, नाक, त्वचेचा ओलावा राखला जातो.

हवा – मानवी जीवनात हवेचे/वायूचे महत्व अनन्य साधारण आहे. ज्याला आपण हवा/वायू म्हणून सामान्यपणे मानतो व संबोधतो ती वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण आहे. त्यालाच आपण वातावरण असेही म्हणतो. त्याचे नायट्रोजन (७८%), प्राणवायू (२१%) व अर्गोन (१%) हे प्रमुख घटक आहेत. आपल्या सभोवती असलेल्या वातावरणाच्या आवरणामुळे सगळ्या प्राणीमात्रांचे जीवन शक्य झाले आहे. आपण श्वासोश्वासाद्वारे अंदाजे ३५ पौंड वायू दर दिवशी उपयोगात आणतो.

जमीन आणि वातावरण यांच्या घडणीतील महत्वाचा दुवा म्हणजे नायट्रोजन! प्राणवायूची उपयुक्तता सर्वाना माहित आहे. तो अन्नाचे ज्वलनास मदत करतो व कार्बनशी संयोग करून प्राणवायू पुन: वातावरणात सोडतो. कार्बन डाय ओक्साइड वनस्पती शोषून घेतात व फोटो सिन्थेसिसच्या सहायाने कार्बन व प्राणवायू वेगळा करून प्राणवायू वातावरणात पुन: सोडतात.

हे परस्पर-अवलंबित्व आमच्या ऋषी मुनींनी जाणून वातावरण आणि प्राणीमात्रांचा अनुपम असा मेळ घातला ज्यायोगे अनंत काळापर्यंत निसर्ग व प्राणी जगत गुण्यागोविंदाने एकत्र नांदतील. देव ह्या संकल्पनेला प्रधान मानून, मध्यवर्ती मानून, त्यांनी वेगवेगळ्या देवांना कोणती विशिष्ट पाने, फुले, फळे आवडतात; देव व त्यांचे वाहन म्हणून विशिष्ट देव व विशिष्ट प्राण्यांच्या जोड्या लावल्या तर समुद्र व पर्वत देवादिकांची निवास-स्थाने केली. ह्या योजनेमुळे मानव त्या वृक्षांचे, प्राण्यांचे व नदी-समुद्राचे संवर्धन करू लागले, नद्यांचे पावित्र्य जपू लागले अन नकळत का होईना निसर्गाचे सानिध्य सुनिश्चित करू लागले. अन सुरु झाला अनंत कालचा सह-अस्तित्वाचा प्रवास!

परंतु मित्रानों, विज्ञानाच्या तुफानात मानव कालांतराने स्वकेंद्रित व स्वार्थी होत गेला. स्वत:च्या सुखसुविधा पलीकडे बघण्याची वृत्ती मागे पडू लागली व निसर्ग त्याचा पहिला बळी ठरला. आता तो मोठ्या गुर्मीत ‘अहं ब्रह्मास्मी’ म्हणू लागला. निसर्गाकडे एक उपयुक्त वस्तू म्हणून बघू लागला व त्याचे अस्तित्व हे मानवाच्या उपभोगासाठी आहे असे मानून मन मानेल तसे वागू लागला. सह-अस्तित्वाचे नाते नजरेआड झाले. जसजसा वातावरणाच्या खच्चीकरणाची मात्रा व वेग वाढू लागला तसतसे मानवावर नैसर्गिक आपतीचे घावही वाढू लागले, अनेकांना प्राण गमवावे लागले. विध्वंस अनेक पटीने वाढला तरीही मानव एखाद्या कोलुच्या बैलाप्रमाणे डोळ्यावर झापडं बांधल्यागत विनाशाभोवती फिरतो आहे. ना कशाचा धाक, ना कशाची तमा!

आज निसर्गचक्र बदलताना जाणवते आहे, ऋतूचक्र बदलते आहे. पावसाळा लांबणीवर पडत आहे. कुठे पूर परिस्थिती तर कुठे दुष्काळाच्या झळा, कुठे अनाकलनीय कडे-दरडी कोसळणे तर कुठे वादळे, बर्फाची वादळे! निसर्गाच्या सूचक घंटा ऐकण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हा विध्वंस जर थांबवायचा असेल तर निसर्गाचे पुनर्वसन करणे गरजेचे वाटते व त्यासाठी प्रदूषणावर इलाज करावा लागेल. प्रत्येकाने आपापल्या परीने जमेल तेव्हडे, जमेल तसे निसर्ग संवर्धन व पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. एक सामान्य माणूस म्हणून आपण तीन ‘आर’ चा अवलंब करू शकतो – 
१. रिपेअर करणे; २. री-युझ करणे; आणि ३. री-सायकल करणे.
  प्रदूषणाचे मानवी जीवनावरील परिणाम व आपण काय उपाय करू शकतो ह्याचा धांडोळा पुढच्या प्रकरणात घेऊ. 

प्रकाश पटवर्धन 

Saturday, August 23, 2014

0 कोण म्हणतो परी नसावी?


परी
कोण म्हणतो परी नसावी?
का नुसतीच बरी असावी?
तिच्या मनात राजकुमार
तर माझ्या का परी नसावी ii

स्वप्नासाठी वेळ नाही
प्रत्यक्षात दिसतात खूप
उरी घर करेल तिची
उत्सुकता आहे खूप ii

नसली रूपवान तरी          
असावी ती गुणवान            
तिच्या आगमने फुलो
घरामध्ये समाधान ii

साधी-भोळी नसावी ती
थोडी असावी तिखट
मजा तेव्हाच येईल
मिळे खटाशी खट ii

अशी कोणी आहे का हो
उमटेल का अमुचा ठसा
तिच्या मनाच्या दरबारी ii

काय म्हणता माहित नाही
बी रिलाक्सड, डोन्ट वरी,
देवा घरी देर असला   
तरी मात्र अंधेर नाही ii

त्याना मिळाली, ह्याना मिळाली
आमचीही असेल दडली
दूर कुठे वा येथे जवळी
येते आधी ती वा कवळी ii

-    प्रकाश पटवर्धन
वळून पाहताना : भाग 9

वळून पाहताना : भाग 9

Wednesday, August 20, 2014

6 गणिती : अच्युत गोडबोले.


ganiti
प्रत्येक विषयाचा आपला इतिहास असतो या इतिहासाचा पट वाचकांसमोर मांडण्याचे कौशल्य हे लेखकाचं असतं. गणित या विषयाचा हि आपला इतिहास आहे. पण गणितासारख्या रुक्ष आणि क्लिष्ट विषयाचा इतिहास  मांडणे म्हणजे लेखकाच्या कौशल्याची कसोटीच लागते. असा कंटाळवाणा विषय अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी अत्यंत मार्मिक पणे मांडला आहे. "गणिती" या प्रवासाची सुरुवात प्रस्तावनेच्या स्टेशन पासून होते. हे स्टेशन इतके भारदस्त आहे कि प्रवासी या प्रवासात इतका समरस होतो कि प्राचीन काळातील गणिताच्या स्टेशन पासून आधुनिक गणिताच्या गंतव्या पर्यंत केव्हा पोहचतो याचे भानच राहत नाही. या प्रवासात येणाऱ्या वेगवेगळ्या स्थानकांवर अनेक गणिती आपणास भेटतात. त्यांच्याशी मैत्री होते. त्यांचे गणित, त्यांचे स्वभाव, त्यांचे सिद्धांत (काही विनोदी) यांची चर्चा होते.

याच प्रवासात आपली भेट "जीनस इमुनास" या किड्याशी होते. रसेलच्या पैराडॉक्सशी होते. एका स्थानकावर तर चक्क बुटासाठी वापरणाऱ्या लेसची किव्वा पायजम्याची नाड़ी यांची गाठ भेटते आणि "थिअरी ऑफ नॉट्स"  व गणित यावर चर्चा होते. ही भेट तर मनाला थक्कच  करून टाकते. भारतीय गणिताच्या इतिहासात आपली भेट शल्वसुत्र ते आर्यभट्ट याच्याशी होते. ब्रह्मगुप्त आणि शुन्य यांचा इतिहास कळतो.

पुढील स्थानकावर ग्रीक आणि ग्रीक  गणितज्ञ यांच्याशी ओळख होते. येथे थेल्स येतो. लहानपणी ज्याची धास्ती वाटायची तो पायथागोरस सांगून जातो कि त्याने दिलेल्या "पायथागोरस प्रमेयाची" सिद्धता त्याने कधीच केली नव्हती. ती पुढे युक्लीड या गणितज्ञाने केली.  भारतात तर हि सिद्धता अकराव्या शतकात होऊन गेलेल्या भास्कराचार्य या गणितज्ञाने दिली होती. आज हे प्रमेय ३५० पेक्षाही जास्त पद्धतीने सोडवता येतं. पायथागोरस ची  गणिताबद्दलची अंधश्रद्धा, त्याचे विनोदी सिद्धांत हि वाचायला मिळतात. वर्गमुळात २ या अनैसर्गिक संख्येबद्दल त्याच मत वाचून आश्चर्यच वाटतं.

पुढील टप्प्यात झेनोचे चार पैराडॉक्स भेटतात. आपण अरिस्टोटल  बद्दल खूप ऐकलेलं आहे. परंतु त्याच्या विनोदी आणि वेडपट सिद्धांताची ओळख होते ती याच प्रवासात. त्याच मत होतं कि उन्हाळ्यात पाणी प्यायल तर उंदीर मरतात, इल मासा अचानकच शून्यात्तून जन्मतो, स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी दात असतात असे अनेक विनोदी सिद्धांत कळतात.
प्रवास पुढे पुढे सुरु असतो व आपण पान २२ वर येउन पोहचतो आणि अचंभित होतो ते गौतम बुद्धाला संख्यांच विलक्षण वेड होत हे वाचून. गौतम बुद्धाने एकावर ४२१ शुन्य असलेली अजस्त्र संख्या शोधली होती. गौतम बुद्धाने फक्त मोठ्मोठ्याच संख्या शोधल्या असे नाही तर त्यांनी सूक्ष्म संख्यांचीही कल्पना मांडली होती. एक 'योजन' म्हणजे १० किमी अंतरात किती सूक्ष्म धुळीचे कण बसू शकतील हे शोधताना त्यांनी सगळ्यात सूक्ष्म संख्येची जी कल्पना केली  होती ती आजच्या कार्बनच्या अणूच्या त्रीजेच्या आकाराची म्हणजे साधारण ०.११ नानो मीटर एव्हडी येते.

येथेच एका स्थानकावर डार्विन भेटतो व गणितज्ञाची व्याख्या सांगून जातो. तो म्हणतो, " अंधाऱ्या खोलीत अस्तित्वात नसलेल्या काळ्या मांजराला शोधत बसणारा म्हणजे गणितज्ञ."
असे रथी-महारथी आपल्याला भेटतात. कोणी गणिताचा बादशाह, कोणी जगाला कोडी घालणारा , कोणी गणिताचा शिल्पकार, तर काही गणितातील घराणी आपल्याशी या प्रवासात अच्युत गोडबोले आणि डॉ माधवी ठाकूरदेसाई यांच्या ओघवत्या भाषेत बोलून जातात आणि गणिताचा विकास आणि संशोधन किती विविध अंगानं बहरलेलं आहे आणि अजूनही त्यात किती आव्हानं आहेत याची प्रचीती सामान्य लोकांना येते.

गणिती
लेखक : अच्युत गोडबोले, डॉ. माधवी ठाकूरदेसाई
मनोविकास प्रकाशन
पृष्ठे : ४७०
किंमत : रु. २९०.


दत्तात्रय पटवर्धन 

 

Tuesday, August 19, 2014

0 त्या दहा वर्षातील गुरुदत्त.

gurudatta
अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरु दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध म्हणजेच 'त्या दहा वर्षातील गुरु दत्त '. १९५३ मध्ये गुरुदत्त नावाचा नवा तारा चित्रपट क्षेत्रात उदयास आला होता. हिंदी चित्रपट सृष्टीतील आख्यायिका बनलेला एक प्रभावी दिग्दर्शक असा ज्याचा उल्लेख केला जातो, तो गुरुदत्त.   अबरार-गुरुदत्त यांच्या १९५४-१९६४ या दशकातील सहप्रवासातून साकार झालेल्या चित्रपट निर्मिती प्रक्रियेचा सूक्ष्म वेध घेणारं पुस्तक म्हणजे "त्या दहा वर्षातील गुरु दत्त".   भारतीय चित्रपटसृष्टीत गुरु दत्त यांचे स्थान एक प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून झळकले. प्यासा, साहिब, बीबी और गुलाम, कागज के फुल, असे चित्रपट अजूनही स्मरणात आहेत. अबरार अल्वी  हे गुरु दत्त चे घनिष्ट मित्र. एका सेट वर राज खोसला आणि अबरार अल्वी यांचा सवांद चालू होता. तो सवांद ऐकून गुरु दत्त यांच्या लक्षात आले कि अबरार यांच्यात एक प्रतिभावंत कलाकार दडलेला आहे.  त्या क्षणाने गुरु  दत्त आणि अबरार अल्वी यांना जवळ आणलं आणि गुरु दत्त यांना एक जीवश्च-कंठश्च मित्र मिळाला. त्यानंतर एक प्रवास सुरु झाला आणि मग वहिदा रहेमान असो किंवा मधुबालाची विनोदी भूमिका असो या निर्णयात अबरार अल्वी यांचा विचार असायचाच.
सत्या सरन हे एक सुप्रसिद्ध पत्रकार यांनी अबरार अल्वी यांना बोलत केलं आणि गुरुदत्त यांच्या जीवनाचा वेध घेतला. आणि आपल्या ओघवत्या भाषेत अलवार पणे गुरु दत्त यांच्या संबंधातील कथा आणि दंतकथा या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर आणल्या. हा आठवणींचा खजाना म्हणजेच गुरु दत्त यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटासारखा आपल्या समक्ष ठेवला. हा कलाकार कसा निर्माण झाला? त्याच्या सृजनशीलते  मागील गूढ काय? त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचे त्याच्या चित्रपटातून किती पडसाद उमटतात? अशा  अनेक प्रश्नांचा उहापोह केलेला आहे.
वहिदा रहमान म्हणजे गुरुदत्तचा शोध अस म्हटलं जातं. हैद्राबाद येथे गुरु दत्त आणि वहिदा रेहमान यांची झालेली भेट व त्यातून तिला हिंदी चित्रपट सृष्टीत आणण्याचा विचार आणि प्रयत्न, यातूनच दोघांमध्ये झालेली भावनिक-मानसिक गुंतणूक व त्याचे त्यांच्या जीवनावर झालेला परिणाम याचेही निवेदन वाचायला मिळते.
'गुरु दत्त फिल्म्स' च्या द्वारे निर्मित चित्रपट यांची निर्मिती झाली कशी? तो तयार होताना, त्याचे कलाकार निवडताना, त्याची प्रकाशयोजना करताना, दिग्दर्शन करताना, संगीत देताना काय काय आणि कसं कसं घडतं याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. प्यासा मधील गुलाबो हि व्यक्तिरेखा अबरार यांना कशी सापडली व याच कथानक कसं तयार झालं याचं विवेचन वाचण्यासारखं आहे.
सिनेमा आणि त्याच विवेचन म्हटलं कि ती बाब एका व्यक्तीशी निगडीत राहत नाही तर त्याच्याशी संबंधित इतरांचा हि उहापोह कळत  नकळत पणे करावाच लागतो. मग  जॉनी वॉकर, मेहमूद, एस. डी. बर्मन यांच्या सारखे  प्रतिभावंत यांचीही  व्यक्तिचित्र रेखाटण्याची जवाबदारी लेखकावर येते. सत्या सरन यांनी हि जवाबदारी अगदी मुरलेल्या लेखकाप्रमाणे स्वीकारून हि व्यक्तिचित्र जिवंत उतरवली आहेत. 
सत्या सरन यांच्या या पुस्तकाचे भाषांतर मिलिंद चंपानेरकर यांनी केलेलं आहे. पुस्तक वाचताना एक निरामय आनंद मिळतो हे नक्कीच.
पुस्तक वाचून झाल्यावर प्रत्येकाला एक उर्दू शेर आठवतो,

"बड़ी गौर से सुन रहा था जमाना,
तुम्ही सो गए दासता कहते कहते |"

त्या दहा वर्षातील गुरु दत्त
लेखक : सत्या सरन
सानुवाद : मिलिंद चंपानेरकर
रोहन प्रकाशन
पृष्ठे : २५९
किंमत : रु  २५०/-

दत्तात्रय पटवर्धन

सलाम मलाला.
 मलाला 
बाप्याचे तत्वज्ञान
 बाप्याचे तत्वज्ञान 
सलाम मलाला.

सलाम मलाला.
सलाम मलाला.

Saturday, August 16, 2014

1 बाप्याचा कर्मयोग !काल बाप्या भेटला होता. आपल्या नेहमीच्याच फॉर्ममध्ये. प्रश्न विचारण्याच्या तयारीत. म्हणाला एक प्रश्न विचारतो. मी त्याला  म्हटले' अरे बाप्या तुझी प्रश्न विचारण्याची सवय गेली नाही का?'
त्यावर बाप्या म्हणतो, 'आम्ही ज्ञानाचे भुकेले,  Why? What? When? How? हे आमचे मित्र. आमच्याकडे ज्ञान खेचून आणतात. मी त्याला खूप टाळण्याचा प्रयत्न केला. पण तो जाईल तर बाप्या कसचा? त्याचे प्रश्न म्हणजे विश्वनाथन आनंद ने आपल्या विरोधकाला बुचकळ्यात टाकणारी चाल. पण माझाही नाईलाज. मी त्याला म्हटले विचार बाबा प्रश्न.

बाप्या : GOD म्हणजे काय?

माझे तर डोकेच गगरायला लागले. मी म्हणालो, " बाप्या, अरे मोठे मोठे लोक याची व्याख्या करू शकले नाहीत.मी काय सांगू? अरे तू असे प्रश्न विचार जे शब्दात सांगता येतात.'

त्यावर बाप्या म्हणाला ' असे काय आहे जे शब्दात सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट हि शब्दात व्यक्त करता येते.'

मी म्हणालो, ' अरे बाप्या असे नाही, एकदा एक विद्यार्थी देवाकडे गेला. देवाने विचारले, 'काय रे बाबा काय हवंय?'
त्यावर विद्यार्थी म्हणाला, 'मला एक प्रश्न विचारायचा  आहे?'
देव म्हणाला. ' विचार प्रश्न, पण असा प्रश्न विचार जो शब्दात सांगता येईल.'
त्यावर विद्यार्थी म्हणाला, 'असे काहीही नाही जे शब्दात सांगता येत नाही. व लगेचच आपला प्रश्न विचारला, 'देवा, मृत्यू म्हणजे काय?'
लगेचच देवाने तलवार काढली आणि त्याची मान उडवली.

बाप्या मृत्यू शब्दात व्यक्त करता येत नाही रे.

बाप्या म्हणतो,' अरे, मला शब्दात अडकवू नको. सांग GOD म्हणजे काय?

मी त्याला परत टाळण्याचा प्रयत्न केला. नंतर तो म्हणाला जाऊ दे मीच सांगतो GOD म्हणजे काय?

पुन्हा धडकी भरली. कारण याचे उत्तर म्हणजे काय सांगू. अरे, कॉलेज ला असताना zoology ची practical ची परीक्षा होती. त्याला pila  dissection  साठी आला होता. Dissection  करत असताना तो शंख जास्तच दाबला गेला व फुटला. Dissection  बाजूलाच राहिले. परीक्षक जवळ आले. सर्व प्रकार समजून गेले म्हणून सरळ प्रश्नच विचारायला  सुरवात केली.  एकही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. शेवटी परीक्षकांनी विचारले "तुम्ही किती वेळा या प्रयोगशाळेत आलात?

उत्तर : तीन वेळा
परीक्षक : केव्हा केव्हा?
बाप्या म्हणतो : मार्च, एप्रिल आणि आता पुन्हा मार्च.
अशी बाप्याची उत्तर.

असाच एकदा interview  साठी गेला. प्रश्न होता : एखादा छंद

बाप्या म्हणतो ''हो वाचनाचा '

प्रश्न : काय वाचायला आवडते.
बाप्या म्हणतो :शेक्सपिअर वाचतो. 
प्रश्न : त्याच्या पत्नीचे नाव काय?
बाप्या : सर, मी जेवडा शेक्स्पिअर वाचला त्यात त्याच्या पत्नीचे नावच कुठे आले नाही.
असा बाप्या आणि त्याचे प्रश्न आणि उत्तरं.

शेवटी नाईलाज म्हणून मी त्याला म्हणालो सांग बाबा उत्तर सांग.

तर बाप्या म्हणतो, 'अरे GOD  म्हणजे Go On Duty.

मी म्हणालो, 'अरे बाप्या, तू तर कर्मयोगच तीन शब्दात सांगितलास. 
तर लगेच म्हणतो,
'Do your duty to the extent you can, however small it may be'
  अगदी एखाद्या नाटकाच्या नायकाने फेकावी या थाटात.

परंतु खरच आहे देव काय आहे. आपल कर्तव्य करत रहा यातच देव आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा  न ठेवता आपली कामे करीत रहा.
येथे मला रवींद्रनाथ टागोरांची कविता आठवते, ते लिहितात, एकदा सुर्य म्हणतो मी इतकी वर्ष बिना थकता काम करत आहे. आता मला विश्रामाची आवश्यकता आहे. माझे काम कोण स्वीकारेल. सर्वजण स्तब्ध होऊन सूर्याकडे बघू  लागले. तेवढ्यात एक दिवा आला आणि म्हणाला, मी करेन जितके मला शक्य आहे तितके, to the extent I can! 

 दत्तात्रय पटवर्धन 

You may like to see a video

Wednesday, August 13, 2014

0 शायरीच्या दालनात ४
     ‘जिंदगी’ वर मागील भागांत आपण चर्चा केली. ‘जिंदगी’ नंतर सर्वात बहुचर्चित असा कोणता विषय असेल तर तो ‘बदन’, ‘देह’ होय. सहाजिकच देह नसला तर त्या जिंदगीला/जीवनाला अर्थ तो काय उरेल? मानवाची सारी धावपळ ह्या तनुला सांभाळण्यासाठी असते. सामन्यांचे सोडा, पण संतानीही देहाला उच्च स्थान देताना ‘आत्मा’ रामाचे मंदिर मानले आहे, वसतीस्थान मानले आहे. मन्नाडे चे ते सुप्रसिद्द चित्रपटगीत आठवा, ‘लागाचुनरी में दाग....’. कबीरदासजी ह्या देहाचे महत्व सांगतानां म्हणतात हे तलम वस्त्र देवाने देताना जितके स्वच्छ आणि निर्मल होते तसेच परत करण्याची माझी जबाबदारी आहे.

लिबास उसका अलामत की तरह था
बदन रौशन इबादत कि तरह था.

     संतानी मानवी देहाला ‘देवाचे मंदिर’ तर आत्म्याला साक्षात पांडुरंगाची उपमा दिलेली आहे. मानव जन्माचे सोने करायचे असेल तर ‘नराचा नारायण’ व्हावा म्हणून ह्या देहाचा सदुपयोग करावा लागेल. शायर येथे तोच उपदेश करीत आहे. देह हा त्या देवाच्या पवित्र भक्तीचा महोत्सव असला पाहिजे. त्या पवित्र भक्तीची आभा वा तेज शरीरात प्रतीबिबित व्हावे कारण देह केवळ दैहीक सुखासाठी नसून आत्मिक सुखाचाही सोपान आहे. म्हणून देहाचे पावित्र्य जपले पाहिजे.

शहर-ए-बदन बस रैन-बसेरा जैसा
मंजिल पे कब रुकते है बंजारे लोग.

     जन्मोजन्मीच्या प्रवासातील एक थांबा किवा स्टेशन म्हणजे ‘शहर-ए-बदन’. एक पडाव वा धर्मशाळा, थोड्या वेळ थांबण्यापुरता, थकलेल्या मुसाफिराला विश्रांती घेण्यापुरता. गंतव्य स्थानी पोहोचेस्तोवर बदलत राहायचे. येथे थांबण्याचा प्रश्नच येत नाही. देहाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोण.   

सजाते हो बदन बेकार ‘जावेद
तमाशा रूह के अंदर रहेगा.

     जावेद साहब तर सरळ सरळ निर्णयाप्रत आलेले दिसतात. ते म्हणतात कि देह हा नश्वर आहे, गंतव्य नसून प्रवासातील केवळ एक थांबा आहे, त्याची कोणतीही शाश्वती नाही, अशा देहाचे किती चोचले पुरविणार? फेशिअल काय, स्क्रीन ग्राफ्ट काय, सौना बाथ काय, गाडी काय, घोडा काय. कळत नाही का हे सगळे वर वरचे आहे. आंत वसणाऱ्या आत्मारामाचे काय? त्याचा विचार कधी करणार? जे काही १०० नंबरी आहे ते विसरता अन ‘वरलिया रंगा भूलता’? एकीकडे शाश्वताचा सतत विचार करीता अन दुसरीकडे अशाश्वत अशा ‘देहाचे, शरीराचे’ लाड पुरविण्यात सारा वेळ खर्ची घालता. स्वत:ला जगातला सर्वात बुद्धिमान, हुशार प्राणी म्हणवता, आणि अशी विरोधाभासी क्रिया करीत राहता?

     देहाचे डोहाळे कितीही पुरवले तरी तो क्षरणजन्य आहे, ह्या बाबीकडे लक्ष वेधाताना ‘नझर’ जीर्ण-शीर्ण झालेल्या देहरूपी वस्त्राची उपमा देताना म्हणतात कि ह्या जीर्ण-शीर्ण झालेल्या देह-वस्त्राला किती वेळा अन कोठे कोठे ठिगळे लावशील! अरे आता तरी त्याचा मोह सोड. क्षरते ते शरीर! ते दिवसागणिक क्षरत राहणार, जीर्ण होत जाणार! खरे तर हे जीर्ण वस्त्रच आता बदलण्याची वेळ आली आहे.

                 इस को कहां-कहां से रफू किजीये ‘नझर             
बेहेतर यहीं हैं ओढिये अब दुसरा बदन.

Sunday, August 10, 2014

0 आजची प्रसार माध्यमे


रविवार आणि बाप्याची हजेरी हे अगदी ठरलेल. मी बाप्याला विचारलं " आजच्या काळात हि अत्याधुनिक प्रसारमाध्यमे आहेत जसे इलेक्ट्रोनिक मेडिया , प्रिंट मेडिया . परंतु पूर्वीच्या काळात अशी काही प्रसारमाध्यमे  होती का? "
बाप्या म्हणाला होती ना! आमचे संत , हीच तर प्रसारमाध्यमे होती. जी कथा कीर्तने करून मनोरंजन तर करीतच परंतु समाज प्रबोधनाचे कार्य करून ज्ञानदीप प्रज्वलित हि करीत असत. आता हेच पहाना संत एकनाथ समाज प्रबोधन करीत पंजाब पर्यंत पोहचले होते. त्याचा इतका प्रभाव पडला कि त्यांच्या  अभंगांना शीख धर्मग्रंथात कायमचे स्थान मिळाले आहे. परंतु त्याकाळची प्रसारमाध्यमे आणि आजची यात जमीन आसमान इतका फरक आहे."
मी म्हणालो, "ते कसे?"
त्यावर बाप्या तयार,  म्हणाला, "एक घटना सांगतो. एकदा पोप महोदय अमेरिकेला भेट द्यायला निघाले होते. त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले कि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जरा विचारपूर्वक उत्तरे द्या. शक्यतो 'हो' किवा 'नाही' अशा प्रकारची असावीत. मित्रांचा विचार घेऊन पोप महोदय अमेरिकेला पोहचले. विमानतळावरच  पत्रकारांनी घेरले. एकाने विचारले, "Sir, are you going to visit nudist clubs in America?" यावर पोप महाशयांनी क्षणभर विचार केला आणि प्रती प्रष्ण विचारला, "Are there nudist clubs in America?" दुसऱ्या दिवशी पोप महाशय पेपर चाळायला बसले तर प्रत्येक पेपर वरील मथळा होता, "Pope asks, are there nudist clubs in America?" आजची पत्रकारिता हि अशी आहे."

आतातर बाप्या अजूनही फार्मात येउन म्हणतो, "आमच्या संतांची प्रसारमाध्यमे म्हणायची,

आम्हा हे कौतुक जगा द्यावी नित |
करावे फजित चुकती  ते ||
तुका म्हणे येथे खरयाचा विकरा,
न सरती येरा खोट्या परी ||

संत तुकाराम म्हणतात येथे होतो तो फक्त खरयाचा विकरा. येथे खोट्याला तिळमात्रही जागा नाही. अशा प्रकारे हि प्रसार माध्यमे समाजाच्या जडणघडणीत मोलाचा हातभार लावीत होती."

मी म्हणालो, "बाप्या,  मला गालिबचा एक शेर आठवतो.

सादिक हु अपने कौल में 'ग़ालिब' ख़ुदा गवाह,
लिखता हु सच की , झूठ की आदत नहीं मुझे ||

सादिक म्हणजे सत्यनिष्ठ, सत्यवादी, न्यायनिष्ठ , शुद्ध, पवित्र, वफादार, कुठे गेली ही माणसं ?"

बाप्या म्हणाला, अरे, इतक्याही दूर कशाला जातो. आताचीच  प्रिंट मीडिया ची सुरवात झाली तेव्हाची गोष्ट. शंकरराव किर्लोस्कर यांनी १९१६ मध्ये 'किर्लोस्कर खबर' हे मासिक सुरु केले त्यावेळेस संपादनाविषयी त्यांनी लिहिले आहे, "मासिकाच्या संपादनाची खुबी मी हेरली ती अशी, कि हे काम व भोजन वाढणाऱ्या गृहिणीचे काम यात विशेष अंतर नाही.एक कागदाचे पान तर दुसरे केळीचे दोन्हीवर निरनिराळ्या रुचीचे व रसांचे साहित्य व चटण्या-कोशिंबिरी वाढायच्या असतात पण त्यांची जागा व प्रमाण ठराविक पाहिजे. रोजच्या भात-भाजीच्या जोडीला एक पक्वान्न हवे आणि हे सर्व पदार्थ अगदी ताजे तवाने गरमागरम पाहिजेत. भोजनाने पोट व मन तर भरलेही  पाहिजे , पण ते आरोग्याला हितकारक ठरले पाहिजे "

" पण आज परिस्थिती उलटी आहे. चटणी-कोशिम्बिरीच्या जागी आरोग्याला हितकारक अशा बातम्या दिल्या जातात  आणि अगदी थोड्या प्रमाणात. अहितकारक बातम्या जसे  वासनाकांड, गैरप्रकार, गैरवर्तन, अफवा, प्रक्षोभक, अशा  पानाच्या मधोमध आणि पोटभर वाढली जातात."

आतातरी या प्रसार माध्यमांनी आमच्या संतांचा वारसा घेऊन खरयाचा विकरा करावा आणि खोट्याला फजित करावे आणि म्हणावे "नाचू कीर्तनाचे रंगी , ज्ञानदीप लावू जगी |"

 दत्तात्रय पटवर्धन 

बुद्धिबळातील प्यादे.
केजरीवाल आणि राजकारण.
संस्थांनी माणसे : नरेंद्र चपळगावकर
बाप्याचे तत्वज्ञान
सलाम मलाला.
 

Thursday, August 7, 2014

0 शायरीच्या दालनात ३


urdu shayri
जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याच्या कर्मप्रधान मार्गाकडे नेणारा हा विचार आहे. त्याचां हा शेर ख-या अर्थाने पथप्रदर्शक आहे, दिशादर्शक आहे ह्यात वाद नाही.

साहीर होशियारपुरी जीवनातल्या सा-या नकारात्मक बाबींनी क्षुब्ध होतात, म्हणतात –

उम्रभर रेंगते रहनेकी सजा है जीना
एक-दो दिन कि अजियत१ हो तो कोई सह लें I
(१.तक़लिफ़ )

‘साहीर’ साहेब म्हणतात कि सा-या आयुष्य निराश, निर्जीव, संथ, अन दिशाहीन घालवण्यापेक्षा, एक असा क्षण जो आत्म्याला बळ देईल, ताकत देईल, परिस्तितीशी झगडण्यासाठी आत्मिक हिम्मत देईल, तेच खरं जीवन! तोच क्षण महत्वाचा, उरलेल्या सगळ्या आयुष्यावरून ओवाळून टाकावा असा!

उम्र भर रेंगते रहने से तो बेहतर है,
एक लमहा जो तेरी रूह में वुसअत भर दे।
-'साहिर' लुधियानवी

1.वुसअत - (i) शक्ति, ताकत, सामर्थ्य (ii) उदारता (iii) विस्तार

पुनर्जन्माची संकल्पना तशी आम्हा भारतीयांना नवी नाही. पुर्नजन्म कां ह्या प्रश्नाची उत्तरे तुम्हीही मिळविली असतीलच. खालील शेरमधील पुनर्जन्माबद्दलचा विचार पटतो कां बघा -

है कूछ तो खराबियां मेरी तामिर१ में जरूर
सौ मर्तबा बनाकर मिटाया गया हुं मैं I
(१.बनाने मे)

आपल्या व्यक्तिमत्वातील असंख्य दोष दूर करण्यासाठी, शुद्धीकरणासाठी, परिपूर्णतेसाठी त्या जगन्नियंत्याने मला शेकडो वेळा घडवले असावे, असे ह्या शायराला म्हणावेसे वाटते. वेगळ्या शब्दात हा शायर मानव सदोष असल्याचे मान्य तर करीत नाही नां? शायराला असेही म्हणावेसे वाटत असावे कि आपण आधीच हे मानले अन दोष निवारणाचा सतत प्रयत्न केला तर, देवाला पुनर्निर्मितीचा त्रास घ्यावा लागणार नाही. ‘नराचा होण्या नारायण’ किवा ‘मोक्ष’ ह्या संकल्पनाच्या जवळ पोहोचणारी हि विचारधारा आहे.

उर्दूचे महान कवी, इक़्बाल मात्र त्या जन्मदात्या अल्लालाच विचारतात कि तुझ्या घरून ह्या नंदनवनात पाठवताना तू मला मनसोक्त फिरून येण्याची सूचना केली होतीस अन माझे फिरणे अजून बाकी आहे, अपूर्ण आहे म्हणून ते पूर्ण होईस्तव थांब. इक़्बाल यांच्या ह्या शेरमध्ये हा जगावेगळा ‘हौसला’ प्रतिबिंबित होतो –

बाग-ए-बहिश्त से मुझे हुक्म-ए-सफर दिया था क्यों
कर-ए-जहां दाराज है अब मेरा इंतिजार कर.

पण हे फार कमी जनानां शक्य होते. ते ‘सारे प्रवासी घडीचे’, ‘घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा’ चे बळी ठरतात, आपल्या लक्ष्यापासून क्षणा-क्षणाला दूर-दूर जातात, अन निष्फळता साहजिकच माणसाच्या पुढ्यात नैराश्य आणून ठेवते. जीवनात निराशा पदरी पडू नये म्हणून –

जिंदगी आस का सहरा१ बने तो फिर उसमे,
कुछ आरजुओंके जुराब२ भी रख  दो I
(१.वाळवंट २.मृगजळ)

दोस्तों, ‘जिंदगी’ पर क्या कुछ मश्विरा शायरोकी कलम से मिलता है?

मागे 
urdu shayari

प्रकाश पटवर्धन

Tuesday, August 5, 2014

0 अमीर खुसरो

  अब्दुल हसन यामिनोद्दिन खुसरो (१२५३-१३२५), उर्फ अमीर खुसरो जवळ जवळ ६०० वर्षा चा प्रदीर्घ काल लोपल्यावरही अजूनही समाजमनात अगदी ताजे आहेत, ते एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून. ख-या अर्थाने अष्टपैलू असलेले हे व्यक्तिमत्व सुफी संत होते, निजामोद्दीन औलिया चे मुरीद होते, पट्टीचे संगीतकार होते, सैनिक होते, भाषाविद होते, त्याकाळी भारतीय मुस्लीम-हिंदूं एकतेचे प्रतिनिधी होते, एव्हढेच नव्हे तर त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप सोडली होती.

     त्यांच्या ७२ वर्षाच्या समृद्ध आयुष्यात ११ बादशहाना दिल्लीच्या तक्तावर विराजमान होताना तसेच पायउतार होताना पाहिले. ते एकूण ७ वेळा दरबारी कवी राहिले. पर्शिअन भाषेवर प्रभुत्व असलेला हा महाकवी, संस्कृत आणि उत्तरेच्या भाषा जाणत होता. एका सुफी संताचे शिष्य असल्यामुळे, त्यांचा हिंदू-मुसलमानाकडे बघण्याचा दृष्टीकोन उदार होता. ह्या दोन्ही समाजात समान असलेला दखनी, हिंदवी वा खडी बोलीच्या माध्यमातून एकत्र आणावयाचे होते. भारतात जन्मलेले खुसरो ह्यांना भारतीयत्वाचा अभिमान होता व राष्ट्रभक्तीचा झरा त्यांच्या धमन्यातून वाहात होता. तत्कालीन भारतीय संस्कृतीचे ते सच्चे पाईक होते.

      मुस्लीम संस्कृतीचे अभिन्न अंग असलेली ‘कव्वाली’ आणि ‘गझल’ काव्य प्रकार हि देशाला देलेली खुसरोंची देणगी आहे. संगीत क्षेत्रात आपल्या अलौकिक प्रतिभेच्या जोरावर भारतीय शास्त्रीय संगीताच्या दालनात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ११ रागांची देणगी दिली. त्याच बरोबर पर्शिअन, अरेबिक आणि तुर्की संगीतातील खासियत भारतीय शास्त्रीय संगीतात आणली. खुसरो ‘तराना’ व ‘ख्याल’ हे गायन प्रकार रूढ केले आणि ‘सितार’ व ‘तबला’ वाड्याची भर टाकली.

      साहित्यिक म्हणून त्यांचे ९९ ग्रंथ लिहिल्याचे मानले जाते परंतु प्रत्यक्षात फक्त २२ ग्रंथ उपलब्ध आहेत. स्वत: कवी तसेच गायक असल्यामुळे काव्य-गायनात गेयता आणण्या साठी व संगीत सुश्त्राव्य करण्यासाठीही ह्या महामानवाचे नांव आदराने घेतले जाते. ह्या उत्तुंग कलाविष्काराने, भारतीय कला क्षेत्रात ते अजरामर झाले.

      खुसरो यांची समाधी हजरत निजामोद्दीन औलिया यांच्या समाधी जवळ आहे. 

 प्रकाश पटवर्धन

Saturday, August 2, 2014

0 कबीराचे दोहे : भाग १२

Kabir doha

मी आणि बाप्या रोज सकाळी फिरायला जातो. दिल्ली निवडणुका चा काळ होता. प्रत्येकाच्या तोंडावर निवडणूक हाच विषय होता. त्यातल्या त्यात अरविंद केजरीवाल  म्हणजे प्रत्येकाचा आवडता विषय.
बाप्या म्हणाला, "३०-४० वातानुकुलीत लावून थंड झालेल्या शीला दीक्षित सरकारला कोणी सत्तेवर बसवण्यास तयार नाही.  मग आता उरले आहेत दोनच पक्ष आप  आणि भाजप."

मी म्हणालो," बाप्या, यात कोणता पर्याय योग्य. भाजप तर तसा जुना पक्ष, अनुभवलेला. अरविंद केजरीवाल  नवीन आणि तडफदार, इमानदार. प्रयत्न करायला हरकत नाही. नाहीतरी आपण आजपर्यंत प्रयत्नच करीत होतो ना ?"
बाप्या म्हणाला," काहीच हरकत नाही परंतु जनता मात्र एखाद्या घडाळ्याच्या लंबाका प्रमाणे भाजप आणि आप या दोन टोकांकडे  हेलकावे घेत आहे."  "बघावे निवडणुका झाल्यावर काय होते ते!"

ठरल्या प्रमाणे निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. नियमा नुसार घडाळ्याचा लंबक मध्यावर येउन थांबला. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल नाही.

बाप्या म्हणाला, " आतातर गंमतच झाली. शीला दीक्षित सरकार तर ठरल्याप्रमाणे थंड बस्तानात जाऊन पडली. आप आणि भाजप मध्यावर येउन थाबली." "आता काय होईल ? पुन्हा निवडणुका कि अजूनकाही ----"

मी म्हणालो, " राजकारणात काय घडेल हे देवालाही सांगणे कठीण. कॉंग्रेस आप ला समर्थन देईल आणि पुन्हा  निवडणुकीचा खर्च होऊ नये म्हणून आम्ही असे करतोय,  त्याबद्दल शेखी मिरवतील." "कॉंग्रेस मात्र, ज्या केजरीवालांनी  भ्रष्टाचारी, लुच्चे लफंगे या पदव्या दिल्या, त्यांनाच खांद्यावर बसवून मुख्यमंत्री पदावर बसवतील आणि केजरीवाल  ते मान्य करतील."

पुढे घडले तसेच. केजरीवाल  मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जादूची छडी फिरवावी आणि सर्व कामे व्हावीत अशा थाटात कामास सुरवात केली. पाण्याचा मुद्दा हातात घेतला, लगेचच वीज पुरवठ्याचा मुद्दा घेतला. त्याच बरोबर लोकपाल विधेयक टेबल वर आणले असे अनेक मुद्दे  एका झटक्यानिशी  हातावेगळी करण्याचा प्रयत्न केला.    मग काय व्हायचे तेंच झाले. एक ना धड भाराभर चिंध्या. सत्ता सोडून जावे लागले. एकही कार्य पूर्ण झाले नाही.

यावर मी बाप्याला म्हणालो मला एक कथा आठवते., " एकदा एका माकडांच्या समूहाने ठरवले कि आपण शेती करायची. मानवाने जंगल तोड केल्यामुळे आपल्याला अन्नाचा तुटवडा होतो. (राजकारण काय फक्त कॉंग्रेस आणि भाजप नेच करायचे?) त्यांनी जमीन मिळवली व  नांगरली. त्यात पेरणी केली. परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी माती उकरून पाहिली कि कोंब फुटले का? पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच. कोंब फुटण्याची इतकी घाई झाली कि रोजरोजच्या उकराण्याने ती बीजे अंकुरित झाली नाहीत आणि नष्ट झाली. " "असेच काहीसे केजरीवाल  यांच्या बाबतीत झाले."

बाप्या म्हणाला, "आमचा कबीर दास जर यांनी वाचला असता तर नक्कीच शहाणपण आलं असतं,"

"कबीरदास म्हणतात,              धीरे धीरे रे मना, धीरे सबकुछ  होय |                          
                                               माली सींचे सौ घड़ा, ऋतु आए फल होय  ||

कबीरदासजी म्हणतात, अरे मना  ( मन खुप चंचल असल्यामुळे मनाला उद्देशून) जरा धीर धर , इतका अधीर नको होउस. माळ्याला शंभर घडे पाणी द्याव लागतं. देखभाल करावी लागते. वाट पहावी लागते तेव्हा कुठे ऋतू (योग्य वेळ ) आल्यावर  त्या वृक्षांना फळ येत.

असा हा कबीर दोहा आमचे केजरीवाल यांनी  आत्मसात  केल्या असत्या तर त्यांच्यावर असा विदारक प्रसंग उद्भवला नसता.
दत्तात्रय पटवर्धन