Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.
Showing posts with label कुटील वचन सबसे बुरा. Show all posts
Showing posts with label कुटील वचन सबसे बुरा. Show all posts

Tuesday, November 18, 2014

0 कबीराचे दोहे भाग 14


इसाप हा झांथस च्या घरी स्वयंपाकी होतो. त्याकाळी गुलाम ठेवले जात असतं. इसाप हा असाच झांथस चा गुलाम होता. अत्यंत बुद्धीमानी, कमी उंचीचा व दिसायला अगदी कुरूपच. एके दिवशी झांथस कडे त्याचा मित्र येतो. झांथस इसापला म्हणाला कि आज माझा मित्र आलेला आहे त्याच्यासाठी सर्वात उत्तम पदार्थ बनवशील. जेवणाची वेळ झाली तेव्हा झांथस इसापला म्हणाला कि वाढायला सुरवात कर.. इसाप वाढायला लागतो आणि झांथस ते पाहून थक्कच होतो. काय केले असेल या इसापने? त्याने सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे. यावर झांथस म्हणाला कि, इसाप हे काय सर्व पदार्थ बोकडाच्याच जिभेचे?
यावर इसाप म्हणाला कि, जगात जीभे एव्हडी उत्कृष्ट वस्तू दुसरी कोणतीच नाही आणि तुम्ही मला सर्वात उत्कृष्ट पदार्थ करायला सांगितले होते.
झांथस काहीच न बोलता शांत बसतो. मग रात्रीच्या भोजनासाठी सर्वात निकृष्ट पदार्थ बनवण्यास सांगतो. रात्र होते आणि दोघेजण जेवायला बसतात. पुन्हा पाहतात तो काय? पुन्हा बोकडाच्याच जीभा. यावर झांथस इसापकडे एक कटाक्ष टाकतो. त्याची प्रष्णरूपी नजर इसापला कळते व तो म्हणतो कि या जगतात जीभे एव्हडी वाईट गोष्ट काहीच नसेल. जीभच सर्वात निकृष्ट आहे.
बरोबर आहे कबीर दासजी म्हणतात,

कुटील वचन सबसे बुरा जासे होत न हार,
साधू वचन जल रूप है, बरसे अमृतधार. (कबीर दास )

या जिभेतुन जेव्हा कटू वचन बाहेर पडतात त्यावेळेस कलह निर्माण होतो परंतु ज्यावेळेस याच जिभेतुन प्रेमाचे स्नेहाचे शब्द बाहेर पडतात तेव्हा हीच जीभ मात्र मैत्री जोडते. हि जीभच आहे जी मैत्री जोडते आणि मैत्री तोडते. "अंधे का बेटा अंधा " हे शब्द जेव्हा या जिभेतुन पडतात तेव्हाच महाभारताच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जिभेला झालेली जखम तर बरी होते परंतु जीभे मुळे झालेली जखम बरी होतं नाही.
एक संस्कृत सुभाषित सुद्धा हेच सांगते,

वाग्माधुर्यात सर्वलोकप्रियत्वम, वाक्पारुश्यात सर्वलोक अप्रियत्वम,
किंवा लोके कोकीलेनोपकार: , किंवा लोके गर्दाभेणाप्रकार: ||

 मधुर बोलणारे सर्वांना प्रिय होतात. कठोर वचनाने अप्रिय होतात. कोकिळेने जगावर असे कोणते उपकार केलेले आहेत तरी तो सर्वांना आवडतो आणि गाढवाने कुणाचे काय वाईट केले कि ते कोणालाच आवडत नाही. या सर्वांच एकच कारण आहे ती म्हणजे जीभ. म्हणूनच समजदार माणसे म्हणतात "खाताना आणि बोलताना जिभेवर ताबा ठेवला पाहिजे.

दत्तात्रय पटवर्धन