अगदी कॉलेज मध्ये असतांना संधी मिळाली " प्रेमा तुझा रंग कसा?" ह्या नाटकात काम करण्याची. बच्चू ची भूमिका करण्याची . प्रा श्री वसंत कानेटकरांच्या सिद्ध हस्तलेखणीतून उतरलेली ही कलाकृती पन्नास वर्षांपेक्षाही आधी लिहिलेलं हे नाटक आजही पाहताना, वाचतांना आजच्या काळातील वाटते कोणत्याही काळात अगदी ताजे वाटते. कारण याचा विषय प्रेम, प्रेम विवाह , तो कधीही जुना होवूच शकत नाही. त्या काळात देखील प्रेम विवाहाला मान्यता नव्हती आजची परिस्थिती काही बदलली आहे असे वाटत नाही.जुन्या आणि नवीन पिढीतील संघर्ष आहे. आजच्या पिढीला गळ्यात गले घालून फिरणे, बागेत तासंतास बसणे अजिबात मान्य नाही जरी त्यांनी तेच केले असले तरी . जुन्या पिढीला वाटते आम्ही केले ते विशुद्ध प्रेम होते आता आहे तो थिल्लर पणा हे असे सतत वाटून जुनी पिढी त्याला विरोध करते. आणि ही भावना ६० वर्षांपूर्वी होती आणि आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार प्रेमा तुझा रंग कसा? खरच तो कळणार तरी कसा? त्या नाटकात प्रेमाचे विविध रंग आपल्याला अनुभवायला मिळतात प्रा बल्लाळ आणि सौ प्रियंवदा यांचे परिपक्व प्रेम, तर बबडी आणि बाजाचे उथळ पण तितकेच उत्कट प्रेम, तर तमाम स्त्रियांवर जन्मो जन्मीची दुष्मनी दाखविणारा आणि मुलगी दिसताच, बोलताच तिच्या प्रेमात पडणारा आणि सतत प्रेमभंगाचे दुख उराशी बाळगणारा बच्चू आणि थोडा काळ का होईना बच्चू वर प्रेमाचा शिडकावा करणारी आणि त्याच्या हातात लग्नाची पत्रिका देवून पसार होणारी सुशील तर तरुणवयातच अंथरुणाला खिळलेल्या बायकोची सेवा करणारे साठीचे निळूभाऊ त्यांचे प्रेम . अशा विविध प्रेमाचे रंग प्रा कानेटकर आपल्या समोर मांडतात. यात प्रेमातील परिपूर्ती, राग अनुराग, प्रेमातील अतृप्ती,एकतर्फी प्रेम ,अशरीरी प्रेम, विरह कलह अशा विविध छटा देखील दिसतात आणि ते देखील त्यांनी अतिशय मार्मिक, विनोदी पद्धतीने मांडले आहे अगदी फार्सच्या ढंगाने जाणार्या या नाटकातील विनोदगर्भ उपहासाला वास्तवतेची झालर सतत लागल्या मुळे प्रत्येक प्रसंगात बहारीचे रंग उसळले आहे.
"सप्तपदीच्या नंतर प्रेमाचे गहिरे रंग उडून जातात आणि उरते ती फक्त वास्तवाची विटकरी रंगाची जळजळीत लकेर" "प्रेम विवाहात प्रेमाचे रंग उडाल्यानंतर घटस्फोटाच्या भोज्जाला सगळेच शिवून येतात" या सारखी वाक्ये प्रेमाचे गहिरे रंग उलगडत जातात.
जीवनातील प्रेमाचे गहिरे रंग ओळखण्यासाठी प्रत्येकाने अनुभवावी अशी ही नाट्यकृती, संधी मिळाल्यास नाटकात काम करून अनुभवावी, रंगमंच्यावर सादर होत असतांना त्याचा आस्वाद घ्यावा आणि तेही नाही जमले तर नक्कीच वाचून त्याचा आनंद घ्यावा
आणि आपल्या परीने प्रेमाच्या रंगत न्हावून निघावे.
सतीश कुलकर्णी

