Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Wednesday, July 9, 2014

2 प्रेमा तुझा रंग कसा?


मराठी रंगभूमीची सेवा करण्याची संधी मला मिळाली अगदी हौशी का होईना पण रंगभूमी वर विविध भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. अगदी एकांकिका,नाटक आणि आकाशवाणी वरील नभोनाट्य अशा कितीतरी माध्यमातून विविध भूमिका जगण्याचे भाग्य मला मिळाले. अभिनय करताना आपण अनुभवतो परकाया प्रवेश, त्या भूमिकेशी एकरूप होवून ती भूमिका आपण जगतो एक विलक्षण अनुभव. अभिनय करतांना मला कळलेलं, भावलेलं नाटक शब्दरूप करतांना पुनर्प्रत्ययाचा अनुभव मी घेत आहे.
अगदी कॉलेज मध्ये असतांना संधी मिळाली " प्रेमा तुझा रंग कसा?" ह्या नाटकात काम करण्याची. बच्चू ची भूमिका करण्याची . प्रा श्री वसंत कानेटकरांच्या सिद्ध हस्तलेखणीतून उतरलेली ही कलाकृती पन्नास वर्षांपेक्षाही आधी लिहिलेलं हे नाटक आजही पाहताना, वाचतांना आजच्या काळातील वाटते कोणत्याही काळात अगदी ताजे वाटते. कारण याचा विषय प्रेम, प्रेम विवाह , तो कधीही जुना होवूच शकत नाही. त्या काळात देखील प्रेम विवाहाला मान्यता नव्हती आजची परिस्थिती काही बदलली आहे असे वाटत नाही.जुन्या आणि नवीन पिढीतील संघर्ष आहे. आजच्या पिढीला गळ्यात गले घालून फिरणे, बागेत तासंतास बसणे अजिबात मान्य नाही जरी त्यांनी तेच केले असले तरी . जुन्या पिढीला वाटते आम्ही केले ते विशुद्ध प्रेम होते आता आहे तो थिल्लर पणा हे असे सतत वाटून जुनी पिढी त्याला विरोध करते. आणि ही भावना ६० वर्षांपूर्वी होती आणि आज देखील आहे आणि उद्या देखील राहणार प्रेमा तुझा रंग कसा? खरच तो कळणार तरी कसा? त्या नाटकात प्रेमाचे विविध रंग आपल्याला अनुभवायला मिळतात प्रा बल्लाळ आणि सौ प्रियंवदा यांचे परिपक्व प्रेम, तर बबडी आणि बाजाचे उथळ पण तितकेच उत्कट प्रेम, तर तमाम स्त्रियांवर जन्मो जन्मीची दुष्मनी दाखविणारा आणि मुलगी दिसताच, बोलताच तिच्या प्रेमात पडणारा आणि सतत प्रेमभंगाचे दुख उराशी बाळगणारा बच्चू आणि थोडा काळ का होईना बच्चू वर प्रेमाचा शिडकावा करणारी आणि त्याच्या हातात लग्नाची पत्रिका देवून पसार होणारी सुशील तर तरुणवयातच अंथरुणाला खिळलेल्या बायकोची सेवा करणारे साठीचे निळूभाऊ त्यांचे प्रेम . अशा विविध प्रेमाचे रंग प्रा कानेटकर आपल्या समोर मांडतात. यात प्रेमातील परिपूर्ती, राग अनुराग, प्रेमातील अतृप्ती,एकतर्फी प्रेम ,अशरीरी प्रेम, विरह कलह अशा विविध छटा देखील दिसतात आणि ते देखील त्यांनी अतिशय मार्मिक, विनोदी पद्धतीने मांडले आहे अगदी फार्सच्या ढंगाने जाणार्या या नाटकातील विनोदगर्भ उपहासाला वास्तवतेची झालर सतत लागल्या मुळे प्रत्येक प्रसंगात बहारीचे रंग उसळले आहे.
"सप्तपदीच्या नंतर प्रेमाचे गहिरे रंग उडून जातात आणि उरते ती फक्त वास्तवाची विटकरी रंगाची जळजळीत लकेर" "प्रेम विवाहात प्रेमाचे रंग उडाल्यानंतर घटस्फोटाच्या भोज्जाला सगळेच शिवून येतात" या सारखी वाक्ये प्रेमाचे गहिरे रंग उलगडत जातात.

जीवनातील प्रेमाचे गहिरे रंग ओळखण्यासाठी प्रत्येकाने अनुभवावी अशी ही नाट्यकृती, संधी मिळाल्यास नाटकात काम करून अनुभवावी, रंगमंच्यावर सादर होत असतांना त्याचा आस्वाद घ्यावा आणि तेही नाही जमले तर नक्कीच वाचून त्याचा आनंद घ्यावा
आणि आपल्या परीने प्रेमाच्या रंगत न्हावून निघावे.

सतीश कुलकर्णी

2 comments:

  1. स्त्री पुरुषांच्या आकर्षणाच आणि प्रितीच नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चाललेलं आहे आणि चालणार आहे. ते सुरु केव्हा झालं आणि संपणार केव्हा ते सांगता येणारं नाही असा या नाटकाचा संदेश आहे. हा संदेश अशा काही मर्मज्ञ, रसिक, सहानुभूतीपूर्ण, खेळकर क्वचित अवखळ शैलीनं लेखकानं रंगविला आहे कि त्याची हि हास्य प्रधान नाट्यकृती सुरु केव्हा झाली आणि केव्हा संपली ते हशा आणि टाळ्या च्या जल्लोषात प्रेक्षकांना कळणार सुद्धा नाही.

    ना. सी. फडके

    ReplyDelete
  2. ' प्रेमा तुझा रंग कसा?' या नाटकाचं तारुण्य टिकण्याचं कारण त्याच्यातल्या भाबड्या रोमँटिसिझममध्ये आहे. प्रा. बल्लाळ आणि त्यांची पत्नी प्रियंवदा हे पन्नाशीतलं जोडपं, त्यांची मुलगी बब्बड आणि तिच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न करणारा बाजीराव (कोळसेवाला) ही युवा जोडी, दरवेळी नवनव्या मुलीच्या प्रेमात पडून आपटणारा बच्चू आणि प्रेमाच्या उच्छृंखल कल्पनेत कधीतरी त्याच्याजवळ येऊन दूर निघून गेलेली सुशील हे आणखी दोन तरुण जीव अशा तीन जोड्यांच्या उपयोजनेतून कानेटकर प्रेमाचा खेळ आपल्यासमोर मांडतात. प्रेमातली परिपूतीर्, राग-अनुराग आणि प्रेमातली अतृप्ती अशा तीन अवस्थांचं त्या प्रतिनिधीत्व करतात. शिवाय त्याग, अशरीरी प्रेम, एकतफीर् प्रेम अशाही प्रेमाच्या छटा असतात. त्यासाठी आजारी बायकोचा संसार करणारे नीळकंठ गोरे (बाजीरावचे वडील) अशीही एक व्यक्तिरेखा आहे. या सात माणसांत कानेटकरांनी प्रेमाचे ठळक पॅटर्न बसवले आहेत आणि त्यांच्यावाटे प्रेमाचे जवळपास सर्व रंग दाखवले आहेत. ही सगळी माणसं सरळमागीर्. त्यांचे रागही लटकेपणाने व्यक्त होतात किंवा माफक ताणले जातात. त्यात अहंकार आहे, तोही माफक. त्यामुळे सगळ्या गोष्टींत चांगुलपणाचा धागा कायम राहतो, जो मध्यममागीर् आणि दुसऱ्याचं भलं व्हावं, असं वाटणाऱ्या प्रेक्षकांना हवाहवासा वाटतो. प्रा. बल्लाळांची दोन्ही मुलं प्रेमात पडतात तेव्हा मुलांच्या आईचा त्यांना कडाडून विरोध होतो मात्र बल्लाळांचा मूक पाठिंबा मिळतो. यानिमित्ताने जी मुक्ताफळं उधळली जातात, जे युक्तिवाद आणि प्रतिवाद होतात ते तसेच कधीतरी बल्लाळ आणि प्रियंवदा यांचे त्यांच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पालकांशी झडलेले असतात. प्रेमाच्या बाबतीत होणारी इतिहासाची पुनरावृत्ती कानेटकर नेमके हेरतात आणि अशा पद्धतीने ती नाटकात जागोजागी पेरतात की पाहणाऱ्याला तो कुठल्याही भूमिकेत असला तरी गुदगुल्या होतातच.

    धन्यवाद !

    ReplyDelete