Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Friday, July 4, 2014

0 संस्थांनी माणसे : नरेंद्र चपळगावकर


भारताला स्वातंत्र मिळाले त्यावेळेस भारतात जवळपास ६०० संस्थाने होती. स्वातंत्र मिळाल्यावर बहुसंख्य संस्थानं भारतात विलीन झाली. काश्मीर, जुनागड, त्रावणकोर आणि हैद्राबाद हि चार संस्थाने सहजपणे विलीन झाली नाहीत. त्यांची स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याची अभिलाषा होती. जुनागड व त्रावणकोर हि संस्थानं थोड्या प्रयत्नानंतर खालसा झाली. काश्मीर व हैद्राबाद खालसा करण्यास आम्हाला काय कराव लागलं याचा इतिहास सर्वश्रुत आहेच.

असं म्हणतात, इतिहास दोन प्रकारे सांगता येतो. महत्वाच्या घटना क्रमवारीने सांगून, त्यांची कारण मीमांसा करून अथवा इतिहास घडवणा-या व्यक्तिमत्वांचा परिचयाद्वारे. नरेंद्र चपळगावकर यांनी हा दुसरा मार्ग अवलंबिला आहे. "संस्थांनी माणसे" या पुस्तकातील व्यक्तिचित्राणातून तत्कालीन इतिहास आणि तो इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या अंतरंगावर भेदक प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे व त्या ते सफल झाले आहेत हे पुस्तक वाचल्यावर वाचकाच्या ध्यानात येते. निजाम, हैद्राबाद संस्थानाचा सर्वेसर्वा. विचार करा या अधिपतीचे राहणीमान कसे असेल. तुम्ही नक्कीच म्हणाल कि ते एखाद्या राजासारखे असेल. मात्र हा अधिपती अगदी गबाळा राहत असे. वास्तविकता हि कल्पनेपेक्षा अनेकवेळा वेगळीच असते, याचा अनुभव आपल्याला निजामाचं व्यक्तिचित्रण वाचताना येतो. त्यातलंच दुसरं पात्र-एका सामान्य घरात जन्मलेला, फाटक्या अंगाचा कासीम रिझवी. त्याची जगावेगळी क्रूरता जी त्याच्याच नातवाच्या वक्तव्यावरून कळून येते, तो म्हणतो, "इस्लाम चा अर्थ शांतता आणि निरपराध माणसांची हत्या करणे इस्लामला मान्य नाही व इस्लामचे नाव घेत आम्ही मानवी रक्त सांडण्याचे पाप करीत आहोत. काय दुर्दैव आहे! माझ्या आजोबांच्या आत्म्याला ईश्वराने शांती द्यावी. या सर्वाचा उल्लेख या पुस्तकात येतो.

दारिद्र्याशी झगडत आपल्या कर्तृत्वाने आणि सचोटीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पोहोचलेले न्या. केशवराव कोरटकर याचं व्यक्तिचित्रण आहे. हिंदू मुस्लिम भेद मनात न मानता हिंदू विद्यार्त्यावरही तेव्हडेच प्रेम करणारा नवाब ही त्यात आहे. पाकिस्तान व हैद्राबाद संस्थानाच्या हिताची जवाबदारी स्वीकारणारा पण कसलेच विशेष गुण नसलेला आणि सुदैवाने एक संधी मिळालेला व्यापारीही यात आहे. या मुस्लिम राज्यात अपवाद म्हणून पंतप्रधान झालेला आणि सांकृतिक कसरतीचा एक भाग म्हणून काही हिंदू व तेव्हढ्याच मुस्लिम स्त्रियांसह विवाह करणारा महाराजा किशनचंद यात आहे. याच संग्रहातील सर वॉल्टन या इंग्रज माणसाच व्यक्तिचित्रण, तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांची वृत्ती व एकंदर दृष्टिकोना वर लख्ख प्रकाशझोत टाकतो.

नरेंद्र चपळगावकर यांनी इतिहासाचे तपशील व आवश्यक संदर्भ देत आपल्या रसाळ भाषेत इतिहासासारखा रुक्ष विषय समर्थपणे वाचकांसमोर मांडण्याचे काम यशस्वीरीत्या हाताळल्याचे निदर्शनात येते.

संस्थानी माणसं
नरेंद्र चपळगावकर
मौज प्रकाशन
पृष्ठे : १५०
मुल्य : रु 200

 दत्तात्रय पटवर्धन 

Wednesday, July 2, 2014

0 वळून पाहताना : भाग 9




सियाचेन ग्लेसिअर्सचा प्रश्न सतत १५-१६ वर्षे सैनिकी कारवायानी तसेच राजनयिक पद्धतीने सोडविण्यात पाकला आलेले अपयश धुवून काढण्यासाठी जनरल मुशर्रफ यांच्या डोक्यातून निघालेली ही बेफाम कल्पना होती. सन १९८८-८९ मध्ये प्रथमत: ती मुशर्रफ यांनी तत्कालीन पाकिस्थानी पंतप्रधान – बेनझीर भुत्तो – यांच्या समोर ठेवली पण बहुदा अव्यवहार्य म्हणून त्यांनी ती बाजूला सारली असावी म्हणून ही योजना बासनात पडून होती. मात्र मुशर्रफ सेना प्रमुख झाल्याबरोबर कारगिल योजना पुढे आणण्यात झाली. ह्याची अंमलबजावणी अत्यंत गुप्त स्वरूपात फक्त थळसेनेच्या मुख्यालयात चार उच्चाधीकाऱ्यात शिजली. ह्या योजनेची गुप्तता येव्हड्या मोठ्या प्रमाणावर होती कि नौसेना तसेच वायुसेनेच्या मुख्याधिकाऱ्याना सुद्धा ह्याची कल्पना नव्हती.

     उत्तर काश्मीरच्या हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांच्या प्रदेशात हिवाळ्यातील अत्यंत विपरीत हवामानात समुद्र सपाटीपासून सुमारे १६,००० ते २१,००० फुट उंचीवरील (48 C), येथील ठाणी खाली करणे व हिवाळ्यानंतर परतणे अशी दोन्ही सैन्यांची नेहमीची स्वीकृत पद्धत होती. जनरल मुशर्रफ यांनी नेमक्या ह्याच पद्धतीचा (गैर)फायदा घेण्याचे ठरविले. विशेष असे कि मुशर्रफ स्पेशल सर्विस ग्रुपचे (एस,एस,जी.) ब्रिगेड कमांडर म्हणून नियुक्त झाले ते सन १९८७. ते सियाचेनच्या युद्धापासून ह्या क्षेत्रात कार्यरत होते. सियाचेनच्या सततच्या पराभवाचा सल त्यांना बोचत असणारच. कारगिल परिसर हिवाळ्यात सुमारे सात महिने बर्फाच्छादित असतो व झोजीला खिंड बंद झाल्यामुळे इतर प्रांतापासून वेगळा होतो हे मुशर्रफ जाणून होते.    

     योजनेची रूपरेषा अशी होती कि उत्तर काश्मीरच्या कारगिल नामक क्षेत्रात दोन्ही सैन्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे हिवाळ्यात  तीन महिन्यात जेव्हा ह्या क्षेत्रातील भारतीय ठाणी अतिशय असाधारण हवामानामुळे भारतीय सैनिक सोडून जातील तेव्हा  पाकिस्तानी सैनिकांनी मुजाहीदिनाच्या रुपात ह्या खाली केलेल्या क्षेत्राचा ताबा घुसखोरी करून घ्यावयाचा, तेथील गिरिशिखरावर ठाण मांडून, जवळून जाणाऱ्या (एन.एच.१) - श्रीनगर-लेह हा एकमात्र महामार्ग(supply line) हल्ल्याच्या टप्प्यात आणून त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवावयाचे, श्रीनगरचा लेह्शी संपर्क तोडायचा, ज्यायोगे सियाचेनच्या भारतीय सैनिकांची रसद तुटेल व भारत सरकार सियाचेन प्रश्नी नाक मुठीत धरून चर्चेला तयार होईल. भारताकडून दुसरी आघाडी उघडली जाण्याची शक्यताही त्यांनी विचारात घेतली होती. पण नुकत्याच मिळालेल्या आण्विक ताकतीमुळे भारत असे साहस करणार नाही अशी पाकला शक्यताच नाही पण खात्री होती. जर युध्द घोषित झाले तरीही पाकीस्थानकडे त्यास तोंड देण्याची क्षमता असल्याची दर्पोक्ती सेनाधिकारी करीत होते.         

     कारगिलचे चयन करण्यामागे वरील एकच उद्देश नव्हता. एल.ऑ.सी. पासून स्कर्डू शहर फक्त १७३ कि.मी. अंतरावर आहे व येथून कारगिल क्षेत्रातील पाकिस्तानी सैन्याला रसद पुरविणे सहज शक्य आहे. तसेच श्रीनगरचे कारगिलपासून अंतर मात्र २०५ कि.मी. असल्याने असे मध्यवर्ती ठिकाण काब्ज्यात ठेवणे पाकीस्थानला  श्रेयस्कर होते. पाकिस्तानला ह्या ठिकाणाहून श्रीनगर काबीज करणेही भविष्यात सोप्पे होईल. कारगिलचा प्रदेश साऱ्या देशापासून वेगळा होतो तो हिवाळ्यातील सात महिन्यात, जेव्हा बर्फ-वृष्टीने झोजीला पास/खिंड बंद होते व आश्या कारवाया सुखेनैव केल्या जाऊ शकतात.  

            कारगिलची लढाई ही दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रामधील लढाई होती. ‘ऑपरेशन बद्र’ म्हणून पाकिस्थानी सैन्यांनी घुसखोरी केल्यामुळे  जवळ-जवळ १५० कि.मी. लांबीच्या पटटयात लढली गेलेली ही लढाई अति उंचीवरील पर्वतीय संग्राम (High altitude warfare) मानली जाते. ह्या लढाईत पाकिस्थाननी १८ आर्टिलरी रेजिमेंटसची योजना ५,००० समर्पित सैनिकासह केलेली होती. सन १९९९, ३ में ला भारतीय सैनिकाना पाकिस्थानी घुसखोरीची सूचना मिळाली. एक पांच जणांची टीम निरीक्षणासाठी पाठवली गेली व ते सारे सैनिक पकडले गेले, त्यानां हाल-हाल करून मारण्यात आले. १० मेला पाकिस्थानी द्रास, काकसार, मुश्कोह भागांत दिसून आल्यावर,  २६ मेला भारतीय वायुदलाने पाकिस्थानी चौक्यांवर हल्ले चढविले. मात्र अति उंच पर्वतीय क्षेत्रातील बंधनामुळे २७ व २८ मेला आपली दोन फायटर विमाने व एक एम/17 पाडल्या गेली. त्यात लेफ्ट.नचिकेत युद्धकैदी म्हणून पकडले गेले. तर एम.आय/17 चे चार क्रू शहीद झाले. जून ९ ला भारतीय सैन्याला बटालिक सेक्टर मध्ये दोन महत्वाची ठाणी घेण्यात यश आले.

     जून १५ ला, US प्रेसिडेंट क्लिंटन यांनी हस्तक्षेप करीत पाकिस्तानला सैन्य कारगिल क्षेत्रातून मागे घेण्यास सागितले. जून २९ ला टायगर हिल जवळील दोन महत्वाची ठाणी आपल्या सैन्याच्या हाती आली. जुलाई ४ ला भारतीय सैन्याने टायगर हिलवर पुन: तिरंगा फडकवला. दुसऱ्या दिवशी द्रास वर कब्जा झाला. US प्रेसिडेंटच्या आवाहनास प्रतिसाद देत पाकीस्थानने आपले सैन्य मागे घ्यायची घोषणा केली व जुलाई ११ पासून सैन्य परतण्याचा कार्यक्रम सुरु झाला. २९ जुलाई ला हा कारगिलचा संग्राम समाप्त झाल्याची विधिवत घोषणा, आपला सर्व प्रांत परत मिळविल्यावर, करण्यान आली. पाकिस्थानच्या आरोपाप्रमाणे भारताने ९०० वर्ग कि.मी. इतके पाकिस्तानी क्षेत्र कब्जात केले, तर भारताने ‘जैसे थे’ म्हणजेच युध्द पूर्व स्थिती निर्माण केली.  

     ह्या युद्धाचा एक भाग म्हणून भारतीय नौसेनेने पाकीस्थानच्या सर्व बंदरात आपल्या आरमाराच्या सहाय्याने गस्त घालण्यास सुरवात केली व पाकचा सागरी व्यवहार बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती. पाकिस्थानी सैन्याने माघार घेताना भारतीय हद्दीत सुमारे ८,००० भू-सुरुंग पेरलेले होते. भारनिय सैन्याने जवळ-जवळ २५० तोफा घुसखोरांना पिटाळण्याच्या कामी तैनात केल्या होत्या. बोफोर्स तोफांनी ह्या लढाईत उत्कृष्ठ कामगिरी केली. जुलाई २६ हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्धात “परमवीर चक्र” हा सर्वोच्च सैनिकी सम्मान चार सैनिकांना दिला गेला त्यापैकी दोन मरणोपरांत होती.

     आंतरराष्ट्रीय अभिप्राय –

o   G8 तसेच EU समूहाने भारताची बाजू घेत पाकिस्थानची LOC चा भंग केल्याबद्दल भर्सना केली;
o   ASEAN Regional Forum ने भारताची बाजू घेतली;
o   चीनने सुध्दा पाकिस्थानने आपले सैन्य परत घ्यावे असा सल्ला दिला;
o   भारत-अमेरिका तसेच इज़राइलचे संबंध सुधारले;

नवाझ शरीफ व मुशर्रफ यांच्यातील संबंध कारगिलमुळे दिवसे-दिवस बिघडत चालले होते व ऑक्टोबर १२ ला जनरल मुशर्रफ यांनी रक्तहीन क्रांती करत शरीफना पदच्युत करून सत्ता आपल्या हाती घेतली.

बेनझीर भुत्तो यांनी कारगिलच्या कारवाईला ‘पाकिस्थानची सर्वात मोठी घोडचूक’ तर लेफ्ट. जनरल अली कुली खान यांनी ‘पूर्व पाकिस्थान पेक्षा भयंकर अशी असफलता’ म्हटले आहे.  
          
    कारगिलच्या लढाईत आपले प्राण अर्पण करणाऱ्या अनेक वीरांचे यथोचित स्मारक द्रास शहरापासून सुमारे ५ कि.मी वर भारतीय सेनेने ‘टोलोलिंग हिल्स’ च्या पायथ्याशी उभे केले आहे.

प्रकाश पटवर्धन 

Tuesday, July 1, 2014

0 शायरीचा गुलदस्ता : भाग ८


गझल वाचताना आपल्या लक्षात आले असेल कि प्रत्येक गझलेत दोन-दोन ओळींचे शेर असतात. यातील प्रत्येक ओळीला मिसरा म्हणतात. गझलेतील पहिला शेर याला 'मतला' म्हणतात. 'मतला'  म्हणजे उदय. शेवटच्या  शेराला मक्ता म्हणतात. मक्ता म्हणजे अस्त. गझलेत मतला आणि मक्ता आवश्यक असतात , जसे गाण्यात 'मुखडा ' महत्वाचा.   अनुभवाने आपण हे हि जाणले असेल कि प्रत्येक शेर चा अर्थ हा भिन्न असतो. एका  शेराचा दुसऱ्या शेराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो. म्हणजेच प्रत्येक शेर , स्वतंत्र कविता असते. यामुळेच गझलेला शीर्षक  नसतं. त्यातील विचार, कल्पना, व्यक्त केलेली भावना वेगवेगळी असते. अशा कारणामुळेच प्रत्येक शेर हा एखाद्या सुभाषित सारखा प्रसंगानुरूप वापरता येतो..  गझल हि पक्क्या वृत्तात बांधली जाते. एकंदर मात्रा, वजन, उच्चारण, काफिया, रदीफ इत्यादींचा क्रम हि बंधने एखाद्या सैनिकाच्या तुकडी प्रमाणे शिस्तीत संचालन करीत असतात. त्यामुळे गझलेची गेयता हे एक सौदर्यस्थळ आहे.
गझलेतील दुसरे सौंदर्यस्थळ म्हणजे काफिया. काफिया म्हणजे यमक ( Rhyming Word ). यात तुकबंदी महत्वाची असते.  तुक म्हणजे अन्त्यानुप्रास. काफिया बदलत  असतो. जसे,

हाले-दिल मैने जो दुनिया को सुनांना चाहा,
मुझको हर शख्स ने दिल अपना दिखाना चाहा |
अपने ऐबो को  छुपाने के लिए दुनिया में ,
मैंने हर शख्स पे इलजाम लगाना  चाहा |

कर्रार नूरी यांच्या गझलेतील हे दोन शेर. या दोन शेरात सुनांना , दिखाना, लगाना हे काफिया आहेत. यात "आना' ची तुकबंदी साधली  आहे. काफिया हा शब्द 'कफू' या शब्दापासून आलेला आहे. 'कफू' म्हणजे 'अनुकरण करणे' वरील शेरातील काफियात 'आना' चे अनुकरण झालेले आहे. या काफिया मागून येणारा  (ओळीच्या शेवटी ) जो शब्द असतो त्याला रदीफ म्हणतात. रदीफ हा अरबी शब्द याचा अर्थ 'घोड्यावर घोडेस्वराच्या मागे बसणारा, म्हणून काफिया मागून येणारा तो रदीफ एखाद्या गझलेत रदीफ नसतो त्याला 'गैर मुरद्दफ गझल ' म्हणतात. काफिया बदलत असतो परंतु रदीफ बदलत नाही.
शेरातील प्रत्येक ओळीला मिसरा म्हणतात. पहिल्या ओळीला मिसरा-ए-उला तर दुसऱ्या ओळीला 'मिसरा-ए-सानी म्हणतात . गझलेतील शेवटचा शेर ज्यात शायराचे उपनाव ( तखल्लुस ) असते त्याला 'मक्ता' म्हणतात. गालिबच्या एका गझलेतील हा शेर पहा,
है  और भी दुनिया में सुख़नवर बहुत अच्छे ,
कहते है, गालिबका है अंदाजे-बयां और ||

यात गालिबन आपले नाव अत्यंत कुशलतेने वापरलेले आहे.

--- ग़ालिब म्हणतो, जगात खूप चांगले , उत्कृष्ठ, नावाजलेले कवी आहेत परंतु गालिबचा 'अंदाजे-बयां' वेगळाच आहे. इथे गालिब या शब्दाचा अर्थ 'विजेता' असाही होतो. म्हणजे आपण असाही अर्थ कथु शकतो कि 'एखाद्या विजेत्याचा 'अंदाजे-बयां' सर्वांपेक्षा काही वेगळाच आहे. 
  “winners don't do different things , they do things differently”

दत्तात्रय पटवर्धन 
विजया यादव 
शायरीचा गुलदस्ता : भाग ७,  शायरीचा गुलदस्ता : भाग ६,  शायरीचा गुलदस्ता भाग ५,  
 शायरीचा गुलदस्ता भाग ४