मला उर्दू शायरीचे वेड केव्हा लागले हे निश्चित आठवत नाही. बहुदा शालेय वयातच माझा आणि उर्दू शायरीचा संबंध आला असावा. उन्हाळ्याच्या सुटीत असाच एक पुस्तक वाचत बसलो होतो आणि एक शेर वाचण्यात आला. उन्हाळा सुरु असल्यामुळे हवा मुळीच नव्हती. झाडाच पानही हलत नव्हत. या कडाक्याच्या उन्हात सर्वजण हवेच्या झुळूकीची वाट पाहत असत.हवेची जराशी झुळूक आली कि अगदी हायसं वाटायचं. तो शेर मी दोन तीन वेळा वाचला आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शेर असा होता,
हवा चले ना चले लोग इंतजार में है ,
खुली हुवी है अभी, खिडकिया मकानो की. ---- कैसरुल जाफरी
मला वाटले की लोकांनी घराच्या खिडक्या उघडून ठेवल्या आहेत. कारण गर्मी खुप आहे. हवा येवो अथवा ना येवो परन्तु लोकांची प्रतीक्षा चालूच आहे. आणि वरवर पाहता मला वाटलं की कविने याच परिस्थितीचे वर्णन केलेलं असावं.
पुढे मोठा झालो विचारांची खोली वाढली आणि लक्षात आलं की या दोन ओळींच्या मध्ये खूप काही दडलं आहे. मग हि हवा कसली तर हि हवा आहे बेहतर जीवनाची, सच्चाई ची, बेहतर समाजाची, खुशाली ची अगदी सध्याच्या BJP च्या " अच्चे दिन आनेवाले है" या घोषणेत दडलेल्या विचारांची. आता 'खिडकिया मकानोकी' याचा संकेत कुठे आहे, तर तो ' रुधयाची कवाडे,' बुद्धीची कवाडे ' याकडे आहे.
म्हणजेच 'अच्चे दिन आनेवाले है' या प्रतीक्षेत लोकं आपल्या हृदयाची कवाडे उघडून बसली आहेत. रामराज्य यईल, सर्वदूर न्यायाचा बोलबाला असेल, समाजात असलेली श्रीमंत गरीब यांच्या तील दरी नष्ट होईल, समाजातील असमानातेला तिलांजली दिली जाईल. जगात खुशाली नांदेल. अशा हवेच्या प्रतीक्षेत माणसे आपल्या घराची दारे, खिडक्या उघडून बसले आहेत. आशा आहे या जगाच नंदनवन होण्याची , उम्मीद अजून बरकरार आहे. अशी शायरी वाचली कि वाटतं मातीच्या इवल्याश्या भांड्यात जणू समुद्र भरून ठेवला आहे.
उर्दू शायरी मध्ये अथवा कोणत्याही कवितेत संकेत कोठे आहे हे कळणे महत्वाचे असते. शायर आपल्याला कोणत्या दिशेने नेत आहे याची जाण यावी लागते.
दत्तात्रय पटवर्धन